भारतापेक्षा चीन अधिक व्यवस्थित, पण भारताची सर्वात मोठी ताकद लोकशाही; इंद्रा नूयींच्या वक्तव्याची चर्चा
इंद्रा नूयी यांनी भारतात राहिल्या असत्या तर कदाचित एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओ पदापर्यंत पोहोचू शकल्या नसत्या, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
Discussion surrounding Indra Nooyi’s statement : भारतीय वंशाच्या उद्योगक्षेत्रातील दिग्गज आणि पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नुयी यांनी भारत, चीन आणि अमेरिका यांची तुलना करत केलेल्या वक्तव्यामुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेतील गुणवत्तेला प्राधान्य देणाऱ्या व्यवस्थेचे कौतुक करताना त्यांनी भारतात राहिल्या असत्या तर कदाचित एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओ पदापर्यंत पोहोचू शकल्या नसत्या, असे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच चीन हा भारताच्या तुलनेत अधिक सुव्यवस्थित आणि सोयीस्कर देश असल्याचं त्यांनी म्हटलं.
हुव्हर इन्स्टिट्यूशनला दिलेल्या मुलाखतीत इंद्रा नुयी म्हणाल्या की, अमेरिकेतील गुणवत्ता आणि कर्तुत्वाला महत्व देणाऱ्या व्यवस्थेमुळेच त्यांना जागतिक स्तरावर मोठे यश मिळाले. एक स्थलांतरित व्यक्ती जवळपास रिकाम्या हाताने अमेरिकेत येते आणि पुढे जाऊन एका प्रतिष्ठित अमेरिकन कंपनीची सीईओ बनते, अशी संधी जगातील फार कमी देशांमध्ये मिळते. मी भारतातच राहिले असते, तर कदाचित सीईओ बानू शकले नसते, असे त्या यावेळी म्हणाल्या.
भारत आणि चीनची तुलना करताना त्यांनी चीनमध्ये पर्यटक म्हणून राहणे भारताच्या तुलनेत अधिक सोपे असल्याचे सांगितले. जर तुम्हाला स्वच्छ, निटनिटके आणि शिस्तबद्ध वातावरण आवडत असेल, तर भारतात राहणे थोडे कठीण वाटू शकते. मात्र भारताचे वैशिष्ट्यच त्याच्या गोंधळात आहे. एकदा तो स्वभाव आवडला की पुन्हा पुन्हा भारतात यावेसे वाटते, असे त्या म्हणाल्या. भारतीय रस्त्यांवरील वाहतूक आणि वाहनांमध्ये वावरणाऱ्या गायींचा उल्लेख करत त्यांनी, भारतीय कोणत्याही परिस्थितीत मार्ग काढण्याची क्षमता ठेवतात, असेही नमूद केले.
पवार साहेब सांगतील ते धोरण अन् बांधतील ते…; भाजप प्रवेशाच्या चर्चांना कोल्हेंचा ठाम नकार
महिलांच्या संधींबाबत बोलताना इंद्रा नूयी म्हणाल्या की, 1960 आणि 1970 च्या दशकातील भारत आजच्या भारतापेक्षा खूप वेगळा होता. त्या काळात महिलांच्या सामाजिक आणि व्यावसायिक संधी मर्यादित होत्या आणि बहुतेक महिला घरापुरत्याच सीमित राहत होत्या. मात्र, आपल्या वडिलांनी आणि आजोबांनी नेहमी मोठी स्वप्ने पाहण्याची आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची प्रेरणा दिली. त्यामुळेच अमेरिकेत जाऊन स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करता आले, असे त्यांनी सांगितले.
चीनने केंद्रीकृत प्रशासनाच्या बळावर वेगाने प्रगती केली असली, तरी भारताची सर्वात मोठी ताकद ही त्याची लोकशाही व्यवस्था असल्याचेही नूयी यांनी अधोरेखित केले. लोकशाहीमुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया वेळखाऊ असते, पण सत्तेचे शांततापूर्ण हस्तांतरण आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण हीच भारताची खरी ताकद असल्याचे त्यांनी म्हटले.
भारत-अमेरिका संबंधांवर भाष्य करताना त्यांनी दोन्ही देशांना नैसर्गिक भागीदार संबोधले. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून येथे मोठी युवा लोकसंख्या, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले मनुष्यबळ तसेच सॉफ्टवेअर, अभियांत्रिकी आणि एआय क्षेत्रातील मोठी प्रतिभा आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत हा अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले.
चेन्नई येथे जन्मलेल्या इंद्रा नूयी यांनी आयआयएम कोलकाता येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले. पुढे त्यांनी पेप्सिकोच्या सीईओ आणि चेअरपर्सन म्हणून काम करत कंपनीचा जागतिक विस्तार घडवून आणला. आज त्या जगातील सर्वात यशस्वी कॉर्पोरेट नेतृत्वांपैकी एक म्हणून ओळखल्या जातात.