Rajasthan Election : राजकुमारीची जादू कायम! दणदणीत विजयासह आता CM पदासाठी शर्यतीत
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या राजघराण्यातील राजकुमारी दिया कुमारी (Diya Kumari) यांनी भाजपकडून (BJP) दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांनी जयपूरच्या विद्याधर नगर मतदारसंघातून काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते सीताराम अग्रवाल यांचा तब्बल 71 हजार मतांनी पराभव केला. दिया कुमारी यांना 1 लाख 58 हजार 516 मते मिळाली. तर काँग्रेसच्या सीताराम यांना केवळ 87 हजार 148 मते मिळाली. (Diya Kumari, a royal princess in the chief ministerial race in Rajasthan)
या विजयासह आता खासदार असलेल्या दिया कुमारी या पुन्हा एकदा आमदार बनल्या आहेत. यापूर्वी 2013 च्या विधानसभा निवडणुकीत त्या सवाई माधोपूरमधून भाजपकडून निवडून आल्या होत्या. पण 2018 च्या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आले होते. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या राजसमंदच्या खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्या आमदार बनल्या आहेत.
Election Results 2023 LIVE : राजस्थानमधील भाजपचा आश्वासक चेहरा वसुंधरा राजे विजयी
कोण आहेत दिया कुमारी?
जयपूरच्या राजकुमारी दिया कुमारी महाराजा सवाई सिंह आणि राणी पद्मिनी देवी यांच्या एकुलत्या एक कन्या आहेत. 1971 मध्ये जन्म झाल्यानंतर त्यांचे नवी दिल्लीतील मॉडर्न स्कूल, मुंबईतील जीडी सोमाणी मेमोरियल स्कूल आणि जयपूरच्या महाराणी गायत्री देवी गर्ल्स पब्लिक स्कूल इथून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये डेकोरेटिव्ह आर्ट्सचा कोर्स पूर्ण केला.
आपल्या सौंदर्यासाठी आणि राजकीय कुशाग्रतेसाठी प्रसिद्ध असलेल्या दिया यांचा राजकीय प्रवासही अतिशय नेत्रदीपक राहिला आहे. 2013 मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी त्याच वर्षी सवाई माधोपूरमधून विधानसभेची निवडणूक लढवली आणि आमदार झाल्या. यानंतर 2019 मध्ये राजसमंद मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि खासदार बनल्या.
Eknath Shinde : राहुल गांधींना धडा शिकवला, आता काँग्रेस हद्दपारचं मिशन
दिया कुमारी सध्या राजस्थान भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश प्रभारी आहेत. राजकारणाव्यतिरिक्त दिया कुमारी स्वतःची एनजीओही चालवतात. यासोबतच त्यांना शाळा आणि हॉटेल व्यवसायातही विशेष रस आहे. दिया कुमारी यांना आता माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा पर्याय मानला जात असून राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. आजच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची घोषणाबाजीही केली.