कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत असलेले डी.के. शिवकुमार महाराष्ट्र काँग्रेससाठी तारणहार कसे ठरले?

डी. के शिवकुमार हे फक्त कर्नाटक काँग्रेसचे नेते नाहीत, तर गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र काँग्रेससाठी तारणहारच्या भूमिकेत दिसू लागलेत.

  • Written By: Published:
Untitled Design 102

DK Shivakumar become the savior for Maharashtra Congress? : कर्नाटकच्या राजकारणात सध्या एकच नाव सध्या चर्चेत आहे, ते म्हणजे डी. के. शिवकुमार. कर्नाटकच्या राजकारणात त्यांना डीकेशी या टोपणनावानेही ओळखलं जातं. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री सिध्दरामया राजीनामा देणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल होऊन डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदासाठी 2023 पासूनच त्यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र त्यावेळी काँग्रेस हायकमांडने सिद्धरामय्या यांच्यावर विश्वास दाखवला आणि डी. के. शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं. पण आता परिस्थिती बदलत असल्याचं दिसतय. दिल्लीतील बैठक, काँग्रेस हायकमांडच्या हालचाली आणि कर्नाटकातील वाढतं राजकीय दडपण यामुळे पुन्हा एकदा शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना उधाण आलंय.

मात्र, कर्नाटकच्या या राजकीय घडामोडींमध्ये महाराष्ट्रासाठी देखील एक मोठा अँगल दडलाय. कारण डी. के शिवकुमार हे फक्त कर्नाटक काँग्रेसचे नेते राहिलेले नाहीत, तर गेल्या काही वर्षांत महाराष्ट्र काँग्रेससाठी देखील एक तारणहारच्या भूमिकेत दिसू लागलेत.

त्यामागचं कारण म्हणजे त्यांचं निवडणूक व्यवस्थापन

कर्नाटकमध्ये काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यात डि. के. शिवकुमार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा मजबूत किल्ला उद्ध्वस्त करत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं. त्या विजयामागे बूथ लेव्हलवरील मजबूत संघटना, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क, आक्रमक प्रचार आणि स्थानिक पातळीवर तयार केलेलं निवडणूक व्यवस्थापन हे डी.के. शिवकुमार यांचं मोठं शस्त्र होतं. त्यामुळेच काँग्रेसमध्ये त्यांची ओळख फक्त नेता म्हणून नाही, तर इलेक्शन मॅनेजर म्हणून तयार झालीये.

कॅप्टन भोंदू बाबाचा पर्दाफाश करणार ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ ; मोशन पोस्टर प्रदर्शनाद्वारे चित्रपटाची घोषणा…

देशातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक

विशेष म्हणजे, डी. के. शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांपैकी एक मानले जातात. 2023 च्या विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती तब्बल 1,413 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं समोर आलं होतं. यामध्ये स्थावर मालमत्ता, व्यावसायिक गुंतवणूक, कृषी जमीन, आलिशान मालमत्ता आणि मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणुकीचा समावेश आहे. त्यामुळेच कर्नाटक काँग्रेसमध्ये त्यांना केवळ राजकीयदृष्ट्या नाही, तर आर्थिकदृष्ट्याही अत्यंत प्रभावशाली नेता मानलं जातं. राजकीय व्यवस्थापनासोबतच संसाधन उभारणी आणि संघटन सांभाळण्यामध्येही त्यांचा मोठा प्रभाव मानला जातो.

हाच फॉर्म्युला आता महाराष्ट्रात वापरण्याचा प्रयत्न सुरू 

महाराष्ट्र काँग्रेस गेल्या काही वर्षांत सातत्याने कमकुवत होत गेलीये. अनेक मोठे नेते पक्ष सोडून गेले, संघटना ढासळली, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला आणि निवडणुकांमध्ये पराभवांची मालिका सुरू झाली. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर काँग्रेस आणखी बचावात्मक झाली होती. अशा परिस्थितीत पक्षाला पुन्हा उभं करण्यासाठी काँग्रेस हायकमांडने कर्नाटक मॉडेलकडे पाहायला सुरुवात केलीये.

लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये डि.के. शिवकुमार यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावल्याचं काँग्रेसमधील सूत्रांकडून सांगितलं गेलंय. महाविकास आघाडीमध्ये समन्वय राखणे, स्थानिक नेत्यांमधील वाद कमी करणे, बूथ पातळीवरील रचना मजबूत करण्यासाठी सूचना देणे आणि कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी त्यांनी अनेक बैठका घेतल्या. विशेष म्हणजे, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये असलेल्या गटबाजीच्या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

नीट पेपर फुटी प्रकरणात पुण्यातून आणखी एक अटक; गॉड नंबरने सेव्ह असलेल्या तेजस शहाला उचललं

डी.के. शिवकुमार यांची वेगळी शैली 

ते फक्त सभांमध्ये भाषण करणारे नेते नाहीत, तर निवडणुकीतील प्रत्येक छोट्या समीकरणावर लक्ष ठेवणारे रणनीतीकार म्हणून ओळखले जातात. कोणत्या मतदारसंघात कोणता मुद्दा चालेल, कोणत्या नेत्याला कसं हाताळायचं, निधी व्यवस्थापन कसं करायचं आणि कार्यकर्त्यांना मैदानात कसं उतरवायचं यामध्ये त्यांचा हातखंडा मानला जातो.

महाराष्ट्र काँग्रेससमोर सध्या सर्वात मोठं आव्हान म्हणजे संघटना पुन्हा उभी करणं. भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या महायुतीसमोर काँग्रेसला नव्याने लढावं लागणार आहे. अशावेळी काँग्रेसमध्ये एक विश्वास निर्माण होताना दिसतोय की, कर्नाटकात भाजपला रोखणारा फॉर्म्युला महाराष्ट्रातही उपयोगी पडू शकतो. आणि म्हणूनच डि.के. शिवकुमार यांच्याकडे केवळ कर्नाटकातील नेता म्हणून नाही, तर महाराष्ट्र काँग्रेसला पुनरुज्जीवित करू शकणारा नेता म्हणून पाहिलं जात आहे.

आता जर कर्नाटकात नेतृत्वबदल झाला आणि डि.के. शिवकुमार मुख्यमंत्री झाले, तर त्यांचा राजकीय प्रभाव आणखी वाढणार हे निश्चित मानलं जात आहे. दक्षिणेत काँग्रेस मजबूत करण्याबरोबरच महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यातही ते पक्षासाठी मोठी भूमिका बजावू शकतात, अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. म्हणूनच आज कर्नाटकात मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असलेले डी. के. शिवकुमार हे महाराष्ट्र काँग्रेससाठीही तारणहार म्हणून पुढे येताना दिसत आहेत.

follow us