गाडीचं मायलेज तुम्ही किंवा मी तपासूच शकत नाही; E20 च्या वादात गडकरींनी संभ्रम वाढवला
E20 Row E20 पेट्रोलमुळे मायलेज कमी होत असल्याच्या चर्चेदरम्यान नितीन गडकरी यांनी केलेल्या एका विधानाने नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे.
Average car Owner Can’t Check Mileage On Their Own Says Nitin Gadkari : E20 पेट्रोलमुळे मायलेज कमी होत असल्याच्या चर्चेदरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या एका विधानाने नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. “सामान्य वाहनचालक स्वतः गाडीचं अचूक मायलेज तपासू शकत नाही. त्यासाठी कंपनीच्या अधिकृत डीलरकडे असलेल्या मशीनची गरज असते,” असं गडकरी म्हणाले. मात्र, वाहनतज्ज्ञांच्या मते, सामान्य वाहनधारकही एका सोप्या पद्धतीने गाडीचं प्रत्यक्ष मायलेज बऱ्यापैकी अचूक मोजू शकतो. मग नेमकं खरं काय? जाणून घेऊया…
ABP न्यूजला दिलेल्या मुलाखतीत मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराने 2023 मध्ये खरेदी केलेल्या आणि बहुधा E20 मानकांनुसार असलेल्या आपल्या E20-सुसंगत कारचं शहरातील मायलेज 11 किमी प्रति लिटरवरून 7 किमी प्रति लिटरपर्यंत घसरल्याचा दावा केला. त्यावर गडकरी यांनी, “हे मायलेज नेमकं कसं मोजलं?” असा प्रश्न विचारला. पत्रकाराने डॅशबोर्डवरील मायलेज रीडिंगचा आधार घेतल्याचं सांगितल्यानंतर गडकरी यांनी स्पष्ट केलं की, तुम्ही आणि मी स्वतः गाडीचं अचूक मायलेज तपासू शकत नाही. ते फक्त कंपनीच्या अधिकृत डीलरच्या मशीनवरच तपासता येतं.”
दरम्यान, केंद्र सरकारने नुकतंच स्पष्ट केलं आहे की E20 पेट्रोलमुळे काही वाहनांमध्ये 3 ते 5 टक्क्यांपर्यंत मायलेज कमी होऊ शकतं. मात्र, सोशल मीडियावर होत असलेले 20-30 टक्के मायलेज घटल्याचे दावे योग्य नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे.
चालक घरी अचूकपणे मायलेज तपासू शकतात का?
पूर्णपणे नाही. पण त्यांना बऱ्यापैकी विश्वसनीय अंदाज मिळू शकतो. आजच्या आधुनिक गाड्यांमध्ये ECU (Engine Control Unit) आणि विविध सेन्सर्सच्या आधारे डॅशबोर्डवर मायलेज दाखवलं जातं. हा आकडा पूर्णपणे चुकीचा नसतो, मात्र तो अंदाजे (Estimated) असतो. अनेक वाहनांमध्ये डॅशबोर्डवरील मायलेज आणि प्रत्यक्ष मायलेजमध्ये 2 ते 5 टक्क्यांपर्यंत फरक असू शकतो.
गाडीचं वास्तव मायलेज तपासण्यासाठी ‘टँक-टू-टँक’ पद्धत सर्वाधिक विश्वासार्ह मानली जाते. यामध्ये सर्वप्रथम पेट्रोल टँक पूर्ण भरून घ्यायचा आणि ट्रिप मीटर शून्यावर आणायचा. त्यानंतर गाडी नेहमीप्रमाणे किमान 150 ते 200 किलोमीटर चालवायची. पुन्हा त्याच पेट्रोल पंपावर टँक फुल करून दुसऱ्यांदा किती लिटर पेट्रोल भरलं गेलं, याची नोंद घ्यायची. ट्रिप मीटरवर दाखवलेलं एकूण अंतर दुसऱ्यांदा भरलेल्या पेट्रोलच्या लिटरने भागलं की गाडीचं प्रत्यक्ष मायलेज मिळतं. वाहनतज्ज्ञांच्या मते, ही पद्धत प्रत्यक्ष इंधन वापरावर आधारित असल्याने सर्वाधिक अचूक मानली जाते.
डीलरच्या मशीनमध्ये नेमकं काय तपासलं जातं?
गडकरी यांनी उल्लेख केलेलं कंपनीचं डायग्नोस्टिक मशीन प्रत्यक्ष रस्त्यावरचं मायलेज मोजत नाही. हे मशीन…इंजिनमधील बिघाड, फ्यूल इंजेक्टरची स्थिती, ऑक्सिजन सेन्सर आणि एअर फ्लो सेन्सर तसेच ECU योग्य प्रकारे काम करत आहे का, हे तपासतं म्हणजेच, मायलेज कमी होण्यामागे तांत्रिक बिघाड आहे का, हे शोधण्यासाठी हे मशीन उपयुक्त ठरतं.
याशिवाय मायलेजवर वाहतुकीची गर्दी, शहर किंवा महामार्गावरील ड्रायव्हिंग, एसीचा वापर, टायरमधील हवेचा दाब, वाहनातील वजन आणि वाहन चालवण्याची पद्धत अशा अनेक बाबींचाही परिणाम होत असतो. त्यामुळे केवळ डॅशबोर्डवरील आकडा किंवा एका-दोन दिवसांच्या अनुभवावरून इंधनाच्या गुणवत्तेबाबत निष्कर्ष काढणं योग्य ठरत नाही.
एकूणच, E20 पेट्रोलवरून सुरू झालेल्या वादात गडकरी यांच्या विधानामुळे मायलेज मोजण्याची योग्य पद्धत पुन्हा चर्चेत आली आहे. गडकरी यांनी अचूक मायलेजसाठी अधिकृत डायग्नोस्टिक उपकरणांचा उल्लेख केला असला, तरी वाहनतज्ज्ञांच्या मते टँक-टू-टँक पद्धत ही सामान्य वाहनधारकासाठी सर्वात विश्वासार्ह आणि व्यवहार्य पद्धत आहे. डॅशबोर्डवरील आकडे हे मार्गदर्शक असले तरी अंतिम सत्य मानता येत नाही. त्यामुळे E20 पेट्रोलमुळे गाडीचं मायलेज कमी झाला असा निष्कर्ष काढण्यापूर्वी योग्य पद्धतीने मायलेज तपासणे आणि आवश्यक असल्यास अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये वाहनाची तपासणी करून घेणे अधिक योग्य ठरेल.
#WATCH | एथेनॉल-पेट्रोल से घटता है माइलेज? नितिन गडकरी ने दिया जवाब
केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितिन गडकरी EXCLUSIVE इंटरव्यू@MeghaSPrasad @nitin_gadkari #NitinGadkari #Ethanol #E20Petrol pic.twitter.com/C05xRqmKYL
— ABP News (@ABPNews) July 14, 2026