लोकशाही देशात पुन्हा स्वागत; कामावर रुजू झाल्यानंतर डॉ. संग्राम पाटील यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

कुटुंबापासून दूर राहणं, नोकरीबाबतची अनिश्चितता, न्यायासाठी सुरू असलेला संघर्ष यामुळे मानसिक ताण वाढल्याचे संकेत त्यांच्या लिखाणातून मिळतात.

  • Written By: Published:
Untitled Design 96

Dr. Sangram Patil’s social media post sparks discussion : मुंबई पोलिसांनी लावलेल्या लूक आऊट सर्क्युलरमुळे तब्बल चार महिने भारतात अडकून राहावं लागलं. आपल्या विरोधात खोटी केस दाखल करण्यात आली, आणि न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच पुन्हा परदेशात जाऊन नोकरीवर रुजू होता आलं. असा गंभीर दावा करत डॉ. संग्राम पाटील यांनी सोहस्ल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे. युकेमध्ये परतल्यानंतर महिनाभराने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून, त्यांच्या या पोस्टची सध्या मोठी चर्चा होत आहे. मुंबईमध्ये माझ्याविरोधात नोंदवलेल्या खोट्या केसच्या निमित्ताने मुंबई पोलिसांनी LOC लावून मला चार महिने भारतात डांबून ठेवले होते.

या एका वाक्याने सुरू होणारी डॉ. संग्राम पाटील यांची फेसबुक पोस्ट अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. आपल्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा आधार घेत मुंबई पोलिसांनी लूक आऊट सर्क्युलर जारी केल्यामुळे परदेशात जाण्याचा मार्ग बंद झाला होता, असा दावा त्यांनी केला आहे. डॉ. पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून युनाइटेड किंग्डममध्ये वास्तव्यास असून तेथे ते व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. मात्र, मुंबईत दाखल झालेल्या एका प्रकरणामुळे त्यांना अचानक भारतातच थांबावं लागलं. त्यांच्या मते, या प्रकरणात त्यांना विनाकारण अडकवण्यात आलं आणि त्याचे परिणाम त्यांना वैयक्तिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर भोगावे लागतील.

डॉ. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, अखेर बॉम्बे हायकोर्टात धाव घेतल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला. न्यायालयाच्या आदेशानंतर लूक आऊट सर्क्युलर हटवण्यात आलं आणि त्यानंतरच त्यांना पुन्हा युकेला परतता आलं. चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ते आपल्या नोकरीवर रुजू झाले आणि कुटुंबियांसोबत देखील पुन्हा एकत्र राहू शकले. मात्र चार महिन्यांचा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक कठीण कलांपैकी एक होता, असं त्यांच्या पोस्टमध्ये जाणवतं. परदेशात असलेल्या कुटुंबापासून दूर राहणं, नोकरीबाबतची अनिश्चितता आणि न्यायासाठी सुरू असलेला संघर्ष यामुळे मानसिक ताण वाढल्याचे संकेत त्यांच्या लिखाणातून मिळतात.

युकेमध्ये परत आल्याला आता एक महिना पूर्ण झाल्याचं सांगताना डॉ. पाटील यांनी एक अत्यंत मार्मिक निरीक्षण नोंदवलं आहे. इकडे मित्रमंडळी आणि सहकारी मला म्हणतात, वेलकम बॅक इन अ डेमोक्रॅटिक कंट्री, हे शब्द ऐकताना मनाला वेदना होतात, असं त्यांनी म्हटलं आहे. या एका वाक्यातून त्यांनी भारतीय व्यवस्थेबद्दलचा आपला अनुभव आणि मनातील सल व्यक्त केल्याचे दिसून येत आहे. लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांच्या अधिकारांबाबत आणि तपास यंत्रणांच्या अधिकारांच्या वापराबाबत नव्याने चर्चा निर्माण होण्याची शक्यता या पोस्टमुळे व्यक्त केली जात आहे.

तरी देखील या सर्व संघर्षानंतरही डॉ. पाटील यांनी निराशेऐवजी आशेचा सूर कायम ठेवला आहे. आपल्या पोस्टच्या शेवटी त्यांनी बालपणी गायलेले हम होंगे कामयाब या गीताच्या काही ओळी देखील पोस्ट केल्या आहेत.

हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब
हम होंगे कामयाब एक दिन
हो हो मन में है विश्वास पुरा है विश्वास
हम होंगे कामयाब एक दिन

या ओळींचा उल्लेख करत त्यांनी संघर्षाच्या काळात विश्वास गमावू नये, असा संदेश दिल्याचं दिसून येतं. अन्यायाविरोधातील लढाई सुरूच राहील आणि सत्य अखेरीस समोर येईल, असा आशावादही त्यांच्या शब्दांतून जाणवतो.

मोठी बातमी : देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 14 भाविक ठार

दरम्यान, डॉ. संग्राम पाटील यांच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. काहींनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून काहींनी संपूर्ण प्रकरणातील वस्तुस्थिती समोर येण्याची गरज व्यक्त केली आहे. नेमकं हे प्रकरण काय होतं, LOC जारी करण्यामागची कारणं काय होती आणि न्यायालयाने कोणत्या आधारावर हस्तक्षेप केला, याबाबतची अधिकृत माहिती पुढे आल्यानंतरच या प्रकरणाचं संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, चार महिन्यांच्या संघर्षानंतर व्यक्त झालेल्या या भावनिक पोस्टने अनेकांना विचार करायला भाग पाडलं आहे.

follow us