EPFO चा सगळ्यात धांसू प्लान! रिटायरमेंटनंतर दर महिन्याला मिळणार नियमित उत्पन्न

EPFO Update नोकरी करताना प्रत्येक महिन्याला पगारातून कापला जाणारा PF हा कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेचा महत्त्वाचा आधार असतो.

  • Ninad K
  • Written By: Published:
EPFO Systematic Withdrawal Plan

EPFO Money Withdrawal Plan Update :  नोकरी करताना प्रत्येक महिन्याला पगारातून कापला जाणारा PF हा कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेचा महत्त्वाचा आधार असतो. अनेक वर्षे नोकरी केल्यानंतर निवृत्तीच्या वेळी या खात्यात मोठी रक्कम जमा झालेली असते. मात्र, निवृत्त झाल्यानंतर ही संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढायची की पुढील आयुष्यासाठी तिचं नियोजन करायचं, असा प्रश्न अनेक कर्मचाऱ्यांसमोर असतो.  मात्र, आता याच प्रश्नावर EPFO ने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

निवृत्तीनंतर PF ची संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढण्याऐवजी दर महिन्याला ठराविक रक्कम काढण्याची सुविधा देण्याच्या प्रस्तावाला EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने मंजुरी दिली आहे. यासाठी सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लान सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या PF मधील बचतीतून नियमित उत्पन्न मिळवण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.

काय आहे EPFO चा नवीन SWP प्लॅन?

SWP म्हणजेच सिस्टिमॅटिक विड्रॉल प्लान. या सुविधेमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या PF खात्यात जमा असलेली संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढण्याची गरज राहणार नाही. त्याऐवजी गरजेनुसार ठराविक कालावधीनंतर काही रक्कम काढता येईल. समजा  एखाद्या कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वेळी PF खात्यात 30 लाख रुपये जमा आहेत. निवत्तीनंतर तुम्हाला घरखर्च, औषधोपचार, वीजबिल आणि इतर दैनंदिन खर्चांसाठी दर महिन्याला पैशांची गरज आहे.  अशावेळी संपूर्ण 30 लाख रुपये एकदम काढण्याऐवजी SWP अंतर्गत ठराविक रक्कम टप्प्याटप्प्याने काढता येऊ शकते. यामुळे उर्वरित रक्कम खात्यात कायम राहील आणि लागू नियमांनुसार त्यावर व्याज मिळू शकते. मात्र, दर महिन्याला किती पैसे काढता येतील, किमान शिल्लक किती ठेवावी लागेल आणि पैसे काढण्याच्या अटी काय असतील, याची सविस्तर माहिती अद्याप EPOF कडून जाहीर करण्यात आलेली नाही.

खातेदाराचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला काय फायदा?

EPFO च्या या प्रस्तावातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेचा विचार. समजा, एखाद्या कर्मचाऱ्याने निवृत्तीनंतर SWP सुविधेअंतर्गत दर महिन्याला PF मधून पैसे काढण्यास सुरुवात केली. मात्र, काही वर्षांनी त्याचा मृत्यू झाला अशा परिस्थितीत PF खात्यात उरलेल्या रकमेबाबत नॉमिनी किंवा अवलंबितांना पर्याय मिळू शकतो. उपलब्ध माहितीनुसार, नॉमिनीला उर्वरित संपूर्ण रक्कम काढण्याचा किंवा नियमित हप्त्यांमध्ये पैसे मिळवत राहण्याचा पर्याय देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे या सुविधेचा फायदा केवळ निवृत्त कर्मचाऱ्यांनाच नाही, तर त्यांच्या कुटुंबालाही होणार आहे.

EPFO च्या SWP सुविधेचा अर्थ असा नाही की निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना संपूर्ण PF रक्कम एकाच वेळी काढता येणार नाही. हा एक अतिरिक्त पर्याय असणार आहे. ज्यांना निवृत्तीनंतर एकरकमी पैसे हवे आहेत, ते लागू नियमांनुसार तो पर्याय निवडू शकतील. तर ज्यांना नियमित उत्पन्नाची गरज आहे, त्यांच्यासाठी SWP उपयोगी ठरणार आहे. म्हणजेच, निवृत्तीनंतर आपल्या आर्थिक गरजेनुसार पैसे कसे वापरायचे, याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य कर्मचाऱ्यांना मिळू शकतं.

नवीन सुविधा कधीपासून सुरू होणार?

EPFO च्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने SWP सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र, प्रत्यक्ष सुविधा कधीपासून सुरू होणार, किती रक्कम काढता येणार? पैसे काढण्याचा कालावधी किती असेल आणि त्यासाठी कोणत्या अटी असतील, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप येणे बाकी आहे. त्यामुळे सध्या ही सुविधा प्रत्यक्ष सुरू झाल्याचं समजू नये.

follow us