मोठी बातमी! आता कागदपत्रांशिवाय काढता येतील 5 लाख रुपये; EPFO कडून नियमात बदल

EPFO Rule Change : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ने देशतील साडेसात कोटी सभासदांना मोठा दिलासा दिला आहे. पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या नियमात बदल झाला आहे. आता या खात्यातून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ करून पाच लाख रुपये करण्यात आली आहे. याआधी ही मर्यादा फक्त एक लाख रुपये होती. म्हणजेच आता कोणत्याही कागदपत्रांविना पीएफ खातेधारक पाच लाख रुपये त्यांच्या खात्यातून काढू शकतात.
पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी काही नियम आहेत. यातील महत्वाच्या नियमांत बदल करण्यात आला आहे. याआधी आजारपण, रुग्णालयाचा खर्च यांसाठीच पैसे काढता येत होते. परंतु, यात बदल झाले आहेत. आता विवाह, शिक्षण आणि घर खरेदी करण्यासाठी देखील पीएफ ऑटो क्लेम सुविधा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. आतापर्यंत क्लेम सेटलमेंट होण्यासाठी दहा दिवसांचा वेळ लागत होता परंतु आता तीन ते चार दिवसांतच रक्कम हातात मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांना सरकारचं गिफ्ट! ईपीएफओच्या बैठकीत होणार पीएफच्या व्याज वाढीचा निर्णय
रिपोर्ट्सनुसार श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांच्या अध्यक्षतेत CBT ची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. EPFO सदस्य या वर्षात मे किंवा जून महिन्याच्या अखेरपर्यंत यूपीआय (UPI PF Withdraw) आणि एटीएमच्या (ATM PF Withdraw) माध्यमातून पीएफ काढू शकतील अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.
1 लाख नाही 5 लाख काढता येतील
ईपीएफओने एप्रिल 2020 मध्ये पीएफ सदस्यांना ऑटो क्लेम सुविधा देण्यास सुरुवात केली होती. याअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात 50 हजार रुपये काढता येत होते. यानंतर मे 2024 मध्ये रकमेच्या मर्यादेत वाढ करून 1 लाख रुपये करण्यात आली. वर्षभर हाच नियम होता. परंतु आता यामध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे. पीएफ खातेदार थेट पाच लाख रुपये काढू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली आहे.
पीएफ क्लेम रिजेक्शन रेटमध्ये सातत्याने घसरण होत आहे. आधीच्या काळात पीएफ क्लेम नाकारले जाण्याचे प्रमाण 50 टक्क्यांच्या आसपास होते. आता हेच प्रमाण 30 टक्क्यांवर आले आहे. ईपीएफओ कडून नियम अधिक सोपे केले जात असल्याने क्लेम मंजूर होण्याचे प्रमाण वाढले असून खातेधारकांचा ताणही कमी झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.
ईपीएफओ सदस्यांसाठी मोठी बातमी; देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार
UPI मुळे ऑटो क्लेमही सोपं..
ईपीएफओ सभासदांना एटीएम बरोबरच UPI माध्यमातून पीएफचे पैसे काढण्याची सुविधा दिली जाऊ शकते असे सुमिता डावरा यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. यामुळे UPI वर पीएफ खात्यात किती रक्कम शिल्लक आहे याची माहिती खातेधारकांना मिळेल. या खात्यातून त्यांना पैसेही काढता येतील. इतकेच नाही तर खातेधारकांना त्यांच्या पसंतीच्या बँकेत पीएफचे पैसे ट्रान्सफर देखील करता येतील.