अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केले आर्थिक सर्वेक्षण 2025-26, जीडीपी 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज
आर्थिक वर्ष 2027 मध्ये देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) विकास दर 6.8 ते 7.2 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज.
Finance Minister Nirmala Sitharaman presents Economic Survey 2025-26 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत आशादायी चित्र मांडले आहे. आर्थिक वर्ष 2027 मध्ये देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) विकास दर 6.8 ते 7.2 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. हा अंदाज भारताचा मजबूत आर्थिक पाया आणि स्थिर वाढीची दिशा दर्शवणारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आर्थिक सर्वेक्षणात गेल्या काही वर्षांत राबवण्यात आलेल्या धोरणात्मक सुधारणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. या सुधारणांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेची मध्यम मुदतीतील वाढीची क्षमता सुमारे 7 टक्क्यांपर्यंत पोहोचली असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे. देशांतर्गत मागणी, गुंतवणूक आणि समष्टि आर्थिक स्थिरतेमुळे आर्थिक वाढीशी संबंधित जोखीम सध्या संतुलित स्थितीत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आर्थिक सर्वेक्षण 2025-26 हे 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या काही दिवस आधी संसदेत मांडण्यात आले आहे. या सर्वेक्षणात सरकारच्या मागील वर्षभरातील कामकाज, देशाची आर्थिक स्थिती, विकासाची गती आणि भविष्यातील प्रमुख आव्हाने यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे.
अर्थसंकल्पापूर्वी सादर होणाऱ्या आर्थिक सर्वेक्षणाला विशेष महत्त्व असते. कारण याच अहवालातून आगामी आर्थिक वर्षासाठी सरकारच्या धोरणात्मक प्राधान्यक्रमांची दिशा स्पष्ट होते. जागतिक पातळीवरील आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, हे सर्वेक्षण केवळ सध्याच्या परिस्थितीचे मूल्यांकन करत नाही, तर भविष्यातील धोरणे आणि सूक्ष्म आर्थिक व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक ठरते.
अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स सापडला; काय होते कॅप्टन शांभवीचे शेवटचे शब्द?
पुरवठा साखळीतील सुधारणा आणि जीएसटी दरांचे तर्कसंगतीकरण यामुळे आगामी काळात महागाई नियंत्रणात राहण्याची शक्यता असल्याचेही आर्थिक सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे किमतींवरील दबाव मर्यादित राहील आणि सामान्य ग्राहकांना दिलासा मिळत राहील, असा सरकारचा विश्वास आहे.
दरम्यान, आर्थिक सर्वेक्षणात भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीवर विशेष भर देण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताची सातवी सर्वात मोठी निर्यात श्रेणी असलेले इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र आर्थिक वर्ष 2025 पर्यंत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. आर्थिक वर्ष 2026 च्या पहिल्या सहामाहीत इलेक्ट्रॉनिक्स निर्यात 22.2 अब्ज डॉलर्सवर पोहोचली असून, लवकरच हे क्षेत्र भारतातील दुसरे सर्वात मोठे निर्यात क्षेत्र ठरण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार, या उल्लेखनीय वाढीमागे देशांतर्गत उत्पादन आणि निर्यातीत झालेली लक्षणीय वाढ कारणीभूत आहे. विशेषतः मोबाईल फोन उत्पादनाने या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आर्थिक वर्ष 2015 मध्ये मोबाईल फोन उत्पादनाचे मूल्य सुमारे 18 हजार कोटी रुपये होते, ते आर्थिक वर्ष 2025 पर्यंत वाढून 5.45 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ही जवळपास 30 पट वाढ ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे यश आणि भारताच्या उत्पादन क्षमतेतील मोठी झेप अधोरेखित करते.
