आधी झालं जोरदार स्वागत नंतर बेदम मारहाणीत नवरदेवाचा मृत्यू; लग्न सोहळ्यातील धक्कादायक घटना

Uttar Pradesh News : लग्न सोहळा असेल आणि त्यात नाचगाणं नसेल असं घडतंच नाही. नवरदेवाची वरात सोबत डीजे अन् नाचणारी मंडळी असं चित्र ठिकठिकाणी दिसतं. पण याच नाचगाण्यामुळे एखाद्याचा जीव गेला तर.. ऐकून वाईट वाटतंय ना. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझीपूरमध्ये घडली आहे. येथे जयमाला कार्यक्रमाच्या आधी डीजेवर नृत्य करण्याच्या कारणावरुन वाद झाला. वाद खूप वाढला नंतर बेदम मारहाण करून नवरदेवाचीच हत्या करण्यात आली.
गाझीपुरातील जगदीशपूर गावात ही थरारक घटना घडली. त्रिलोकपूर गावातून राकेश रामची वरात जगदीशपूर गावात पोहोचली. वधू पक्षाने वऱ्हाडींचं जोरदार स्वागत केलं. नंतर डीजेच्या तालावर नाचत सगळे जण मुलीच्या घरी पोहोचले. येथे सुरुवातीला द्वार पूजा आणि अन्य कार्यक्रम उत्साहात पार पडले. नंतर जयमाला कार्यक्रम सुरू होणार होता. याच दरम्यान वधू पक्षाकडील एक नातेवाईक डीजेवर नृत्य करत होता. कोणत्या तरी कारणावरून त्याचे आणि वऱ्हाडी मंडळींचे वाद झाले.
सुरुवातीला किरकोळ वाटणारा वाद वाढत गेला. वाद वाढत असल्याचे पाहून नवरदेवाच्या वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. वाद घालणाऱ्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण, नशेत असलेल्या युवकांनी त्यांनाच लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. वडिलांना वाचवण्यासाठी नवऱ्या मुलाने मध्यस्थी केली. नंतर आरोपींनी वडिलांना सोडून नवऱ्या मुलाला मारण्यास सुरुवात केली.
धक्कादायक! टरबूजांतून कोट्यावधींची गांजा तस्करी; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
याच दरम्यान एका युवकाने हातातील बंदुकीच्या सहाय्याने नवरदेवाच्या डोक्यावर वार केला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच बेशुद्ध झाला. तशाच अवस्थेत त्याला गाझीपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर केले. राकेश रामवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. परंतु, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शुक्रवारी रात्री उशिरा उपचारा दरम्यान राकेशचा मृत्यू झाला. या बातमीने दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक युवक हातात बंदूक घेऊन नाचताना दिसत आहे. याच पिस्तूलाच्या हँडलने नवरदेवाच्या डोक्यावर मारण्यात आल्याचे लोकांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी बेकायदेशीर पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण गावात जोरदार चर्चा सुरू आहे.