ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते गुरबख्श सिंह ग्रेवाल यांचे निधन; खेळाडू ते प्रशासक असा समृद्ध प्रवास संपला
विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या सख्ख्या भावासोबत बलबीर सिंह ग्रेवाल एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
Gurbaksh Singh Grewal passed away : ऑलिम्पिक पदक विजेते माजी भारतीय हॉकीपटू गुरबख्श सिंह ग्रेवाल यांचे शुक्रवारी झिरकपूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने भारतीय हॉकीविश्वावर शोककळा पसरली आहे. गुरबख्श सिंह ग्रेवाल हे मेक्सिको सिटी ऑलिम्पिक 1968 मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे महत्त्वाचे सदस्य होते. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या सख्ख्या भावासोबत बलबीर सिंह ग्रेवाल एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. भारतीय हॉकीच्या इतिहासात अशी कामगिरी करणाऱ्या मोजक्या भावंडांमध्ये त्यांची गणना केली जाते.
खेळाडू म्हणून यशस्वी कारकीर्दीनंतर गुरबख्श सिंह ग्रेवाल यांनी क्रीडा प्रशासनातही मोलाची भूमिका बजावली. पश्चिम रेल्वेमध्ये क्रीडा अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी राजस्थानातील अनेक गुणी खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडता आली. मुंबईतून निवृत्त झाल्यानंतरही ते हॉकीशी सक्रियपणे जोडलेले राहिले. त्यांनी मुंबई हॉकी असोसिएशन चे मानद सचिव म्हणून काम करत खेळाच्या विकासासाठी सातत्याने योगदान दिले. खेळाडू आणि प्रशासक या दोन्ही भूमिकांमधून त्यांनी भारतीय हॉकीला नवी दिशा दिली.
दरम्यान, हॉकी इंडिया ने त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपल्या शोकसंदेशात त्यांनी म्हटले आहे की, गुरबख्शजींनी मैदानावर एक खेळाडू आणि मैदानाबाहेर मार्गदर्शक म्हणून भारतीय हॉकीची निष्ठेने सेवा केली. देशासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाची आठवण कायम राहील. त्यांच्या कुटुंबीयांप्रती हॉकी इंडियाने मनःपूर्वक संवेदना व्यक्त केल्या आहेत.