प्रणित मोरेच्या शोमध्ये 370 रुपयांच्या बिर्याणीच वक्तव्य करणं भोवलं, कंपनीने तरुणाला दाखवला बाहेरचा रस्ता

महिलांबाबत केलेल्या अपमानास्पद आणि आक्षेपार्ह वक्तव्यामुळे एका तरुणाला अखेर त्याच्या कंपनीने नोकरीवरून काढून टाकले आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 70

Gurugram  370 Biryani Controversy : 370 रुपयांची बिर्याणी… गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेला हा शब्दप्रयोग आता एका तरुणाच्या करिअरवरच भारी पडला आहे. महिलांबाबत केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि अखेर त्या तरुणाला त्याच्या कंपनीने नोकरीवरून काढून टाकले आहे. या संपूर्ण वादाची सुरुवात झाली मराठी स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरेच्या लाईव्ह शोमधून. शोदरम्यान प्रेक्षकांशी संवाद साधताना हिमांशू जांगडा नावाच्या तरुणाने त्याच्या डेटिंगचा एक अनुभव सांगितला. त्याने एका तरुणीला 370 रुपयांची चिकन बिर्याणी खाऊ घातल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर त्याने केलेले वक्तव्य अनेकांच्या संतापाचे कारण ठरले.

हिमांशूने सांगितले की, त्या तरुणीला घरी सोडण्याऐवजी त्याला तिच्यावर खर्च केलेले 370 रुपये वसूल करायचे होते. त्याच्या म्हणण्यानुसार, पहिली भेट असल्यामुळे तो तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला नाही, मात्र तिच्याशी शारीरिक जवळीक साधून ते पैसे वसूल करण्याची त्याची मानसिकता होती. महिलांकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन अनेकांना धक्कादायक वाटला आणि या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. क्लिप व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अनेकांनी हिमांशूच्या वक्तव्याला महिलांचा जाहीर अपमान ठरवत त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. वाढता विरोध पाहता हिमांशू जांगडाने सार्वजनिक माफी मागितली, आपले इन्स्टाग्राम अकाउंट बंद केले, मात्र त्यानंतरही वाद शांत झाला नाही.

प्रशासनातील ‘हिरोगिरी’वर झगडे यांची नाराजी? सोशल मीडियावरील पोस्टमुळे तर्कवितर्कांना उधाण

दरम्यान, हिमांशू जांगडा ज्या कंपनीत कार्यरत होता, त्या स्टारविक डिझाईन कंपनीने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. कंपनीचे संस्थापक विवेक विश्वकर्मा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करत हिमांशूला तात्काळ बडतर्फ करण्यात आल्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, गेल्या 24 तासांत त्यांना या प्रकरणासंदर्भात शेकडो फोन, ई-मेल आणि संदेश प्राप्त झाले. व्हायरल झालेली क्लिप त्यांनी स्वतः पाहिली असून त्यातील वक्तव्ये अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही भाषा आणि विचार कंपनीच्या मूल्यांशी अजिबात सुसंगत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

विशेष म्हणजे, कंपनीने महिला कर्मचाऱ्यांशी आणि इतर सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कार्यालयात हिमांशूविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट झाले. कार्यालयीन वातावरणात त्याचे वर्तन व्यावसायिक आणि आदरयुक्त होते. मात्र कामाच्या ठिकाणाबाहेर केलेल्या या वक्तव्यामुळे कंपनीच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याने आणि ग्राहकांप्रती असलेल्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर त्याला सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विवेक विश्वकर्मा यांनी सांगितले. याचबरोबर त्यांनी हिमांशूने आपल्या चुकीतून धडा घ्यावा, आत्मपरीक्षण करावे आणि समाजानेही त्याला सुधारण्याची संधी द्यावी, असे मत व्यक्त केले. मात्र सोशल मीडियावरील अनेकांनी या भूमिकेशी असहमती दर्शवत अशा वक्तव्यांना कोणतीही सहानुभूती मिळू नये, असे मत नोंदवले आहे.

2027 ठरणार विक्रमी उष्णतेचे वर्ष? WMO चा धक्कादायक इशारा; गॉडझिला एल निनो मुळे जगभर दुष्काळाची भीती

या संपूर्ण वादात आणखी एक नाव चर्चेत आले ते म्हणजे कॉमेडियन प्रणित मोरे. शोदरम्यान हिमांशूचे वक्तव्य ऐकून हसल्याबद्दल आणि त्याला तात्काळ रोखले नसल्याबद्दल नेटकऱ्यांनी प्रणित मोरेलाही लक्ष्य केले. वाढत्या टीकेनंतर प्रणित मोरेनेही सार्वजनिकरित्या माफी मागत आपली भूमिका स्पष्ट केली. एका स्टेजवरील काही सेकंदांच्या वक्तव्याने सोशल मीडियावर वादळ निर्माण केले, सार्वजनिक रोष ओढवून घेतला आणि अखेर एका तरुणाची नोकरीही गेली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विनोदाची मर्यादा आणि महिलांविषयीचा दृष्टिकोन या तिन्ही मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू करणारे 370 रुपयांच्या बिर्याणीचे हे प्रकरण सध्या देशभर चर्चेचा विषय ठरत आहे.

Tags

follow us