2027 ठरणार विक्रमी उष्णतेचे वर्ष? WMO चा धक्कादायक इशारा; गॉडझिला एल निनो मुळे जगभर दुष्काळाची भीती

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार 2026 मध्ये या हवामान प्रणालीचा प्रभाव सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकतो.

  • Written By: Published:
Untitled Design 69

Fears of worldwide drought due to Godzilla’ El Niño : हवामानातील एक भीषण आणि विनाशकारी बदलाचं मोठं संकट सध्या जगासमोर उभं ठाकलं आहे. शास्त्रज्ञांनी ज्याला गॉडझिला एल निनो असे नाव दिले आहे, तो आता संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार सप्टेंबर 2026 मध्ये या हवामान प्रणालीचा प्रभाव सर्वोच्च पातळीवर पोहोचू शकतो. त्यामुळे 2026 चा उत्तरार्ध आणि संपूर्ण 2027 हे वर्ष विक्रमी उष्णता, तीव्र दुष्काळ आणि हवामानातील अभूतपूर्व अस्थिरतेचे ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अचानक वाढू लागते, तेव्हा ‘एल निनो’ ही स्थिती निर्माण होते. सामान्यतः व्यापारी वारे उबदार पाणी आशियाच्या दिशेने ढकलतात. मात्र एल निनो सक्रिय झाल्यानंतर ही संपूर्ण व्यवस्था विस्कळीत होते. महासागराच्या प्रचंड भागाचे तापमान वाढल्याने त्याचा परिणाम थेट पृथ्वीच्या हवामानावर होतो. जागतिक तापमान वाढते, उष्णतेच्या लाटा तीव्र होतात, जंगलांमध्ये वणवे पेटतात आणि अनेक भागांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होते. जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानुसार वर्षाच्या मध्यापर्यंत एल निनो सक्रिय होण्याची शक्यता 80 टक्के असून, वर्षाच्या उत्तरार्धात हा धोका तब्बल 90 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.

मोठी बातमी – बीडमध्ये भीषण दुर्घटना, भाविकांची बोट उलटून 50 जण बुडाले

या संकटाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता भारतासह संपूर्ण दक्षिण आशियाला आहे. कारण एल निनोचा थेट परिणाम भारतीय मान्सूनवर होतो. एल निनो सक्रिय झाल्यानंतर भारतातील पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता वाढते. यामुळे शेती, पिण्याचे पाणी, वीज निर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागानेही आपल्या पावसाच्या अंदाजात कपात केली आहे. आधी सरासरीच्या 92 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता, मात्र नव्या आढाव्यानंतर तो 90 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. ही घट दिसायला लहान वाटत असली तरी कृषीप्रधान भारतासाठी तिचे परिणाम अत्यंत गंभीर ठरू शकतात.

हवामान तज्ज्ञांच्या मते संकट इथेच थांबणार नाही. पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल अर्थात आयओडी हा आणखी एक महत्त्वाचा घटक परिस्थिती अधिक गंभीर करू शकतो. हिंदी महासागरातील तापमानातील असमतोलामुळे निर्माण होणारी ही स्थिती एल निनोसोबत एकत्र आली तर दुष्काळाची तीव्रता आणखी वाढण्याची भीती आहे. एका बाजूला अमेरिका, मेक्सिको, इक्वेडोर आणि पेरूच्या किनारपट्टी भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुराचा कहर पाहायला मिळू शकतो, तर दुसऱ्या बाजूला आशिया, ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियामध्ये भीषण दुष्काळ, पाण्याची टंचाई आणि उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होऊ शकतात. त्याचा अप्रत्यक्ष फटका भारतालाही बसण्याची शक्यता आहे.

म्हणजेच रामायणातील सुरसेप्रमाणे जगाचा मार्ग अडवणारे हे हवामान संकट आता अधिक मोठे आणि भीषण रूप धारण करत आहे. पुढील काही महिने आणि विशेषतः 2027 हे वर्ष केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी मोठे आव्हान ठरणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण निसर्गाच्या या महाकाय आव्हानासमोर जगाची खरी परीक्षा आता सुरू होणार आहे.

follow us