ग्वाल्हेरमध्ये भरधाव अनियंत्रित ट्रकचा कहर! 15 जणांचा मृत्यू, 28 जखमी, आठ पोलीस कर्मचारी निलंबित

नवरात्रीनिमित्त मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना भरधाव ट्रकने चिरडले. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून, 28 जखमी झाले आहेत.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design 68 (2)

Havoc caused by a speeding, out-of-control truck in Gwalior : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक भीषण रस्ते अपघात घडला आहे. नवरात्रीनिमित्त शीतला माता मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना भरधाव ट्रकने चिरडले. या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून, २८ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले असून, पोलीस विभागातही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

ग्वाल्हेरमधील चिनाउर रोडवरील शीतला माता मंदिराजवळ शनिवारी मध्यरात्रीनंतर सुमारे दीड वाजता हा अपघात घडला. नवरात्रोत्सवामुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. त्याचवेळी तांदळाने भरलेला ट्रक अनियंत्रित झाला. अवजड वाहनांना रोखण्यासाठी लावलेले बॅरिकेड्स तोडून ट्रक भाविकांच्या दिशेने गेला आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराला तसेच बाहेरील भिंतीला धडकला.

या अपघातात महिला, मुले आणि वृद्धांसह १५ जणांचा मृत्यू झाला, तर २८ जण जखमी झाले. जखमींना तातडीने विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून, सात जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. आतापर्यंत ११ मृतांची ओळख पटली आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पोलीस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात पोहोचवले. या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.

अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबाराचं बिश्नोई कनेक्शन, सलमानचं नाव घेत बॉलिवूडमधलं पुढचं टार्गेट सांगितलं

दरम्यान, जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ट्रक अनियंत्रित का झाला आणि प्रतिबंधित मार्गात त्याने प्रवेश कसा केला, याचा तपास करण्यात येणार आहे. आरटीओ पथकाकडून ट्रकच्या तांत्रिक स्थितीचीही तपासणी केली जाणार आहे.

या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या निर्देशानुसार झाशी रोडचे सीएसपी रवी भदौरिया यांना पदावरून हटवण्यात आले आहे. तसेच, तीन ठाणेदारांसह आठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंदिर परिसरात अवजड वाहनांना प्रवेश कसा मिळाला, तसेच गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रणासाठी पुरेशी व्यवस्था होती का, याचीही चौकशी केली जाणार आहे.

ग्वाल्हेरमधील या भीषण दुर्घटनेमुळे धार्मिक स्थळांवरील सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे. आता चौकशीत अपघाताचे नेमके कारण काय समोर येते आणि यासाठी कोण जबाबदार ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us