संदीप माहेश्वरींनी बाजार उठवलेल्या विवेक बिंद्रांचे बिझनेस मॉडेल नेमके कसे होते?

संदीप माहेश्वरींनी बाजार उठवलेल्या विवेक बिंद्रांचे बिझनेस मॉडेल नेमके कसे होते?

फेमस यूट्यूबर आणि लाईफ कोच विवेक बिंद्रा (Vivek Bindra) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पातळ्यांवर त्यांना संकटाला तोंड द्यावे लागत आहे. एका बाजूला विवेक बिंद्रा यांच्यावर पत्नीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यावरुन त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला फेमस यूट्यूबर आणि मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी (Sandeep Maheshwari) यांनी विवेक बिंद्रा यांच्यावर स्कॅम केल्याचा आणि तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याच दोन घटनांमुळे सोशल मिडीयावर मागील काही दिवसांपासून #stopvivekbindra असा हॅशट्यॅग ट्रेन्डिंगला आला आहे.

याच पार्श्वभूमीवर विवेक बिंद्रा नेमके कोण आहेत? त्यांचे बिझनेस मॉडेल काय आहे? आणि त्यांच्यावर नेमके आरोप काय आहेत? या गोष्टी पाहणे महत्वाचे आहे.

विवेक बिंद्रा नेमके कोण आहेत?

41 वर्षीय विवेक बिंद्रा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल कॉलेजमधून कॉमर्समध्ये डिग्री घेतली आहे. नोएडा स्थित एमटी विद्यापीठातून एमबीए आणि फिलॉसॉफीमध्ये पीएचडी पूर्ण केली. सुरुवातीला त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये बिझनेस कोचिंग देऊन आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर 2010 मध्ये त्यांनी स्वतःती बिझनेस कोचिंग आणि ट्रेनिंग फर्म सुरु केली. इथूनच त्यांचे यशाची शिडी चढू लागले. 2013 मध्ये ते यूट्यूबर आले. सुरुवातीला त्यांनी मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून स्वतःची ओळख तयार केली.

त्यानंतर लीडरशिप ट्रेनिंग, बिझनेस कोच म्हणून लेक्चर्सचे व्हिडीओ अपलोड करायला सुरुवात केली. कालांतराने त्यांनी ‘बडा बिझनेस’ नावाची कंपनी सुरु केली. यातून त्यांनी स्टार्टअप्सच्या आयडिया आणि ट्रेनिंग देणारे, बिझनेसच्या आयडिया देणाऱ्या कोर्सेसची सुरुवात केली. हे कोर्स आधी फ्री आणि नंतर पेड स्वरुपात केले. आज त्यांची हीच कंपनी भारतातील सर्वात मोठी बिझनेस ट्रेनिंग देणारी कंपनी बनली आहे. आज ते या बडा बिझनेस नावाच्या कंपनीचे सीईओ आहेत.

याशिवाय विवेक बिंद्रा ट्विटर आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही प्रचंड फेमस आहेत. यूट्यूबवरती त्यांचे दोन कोटी 13 लाख फॉलोअर्स आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही त्यांचे तेवढेच फॉलोअर्स आहेत. त्यांचे व्हिडिओही सतत टामईलाईनमध्ये दिसत असतात.

विवेक बिंद्रांचे बिझनेस मॉडेस कसे होते?

कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, विवेक बिंद्रा आंतरराष्ट्रीय मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. सोबतच ते लीडरशिप कन्सल्टंट, कॉर्पोरेट ट्रेनर आणि बिझनेस कोच म्हणूनही ओळखले जातात. पण अगदी सोप्या शब्दात समजून घेतल्यास,विवेक बिंद्रा आणि त्यांची कंपनी ‘तीन लोकांना जोडा’सारख्या व्यवसायाचे ट्रेनिंग देतात. मात्र, त्यांनी त्यांच्या एका व्हिडिओमध्ये दावा केला आहे की, त्यांच्या कंपनीने हे काम मे महिन्यात थांबवले होते. पण हा मे कोणत्या वर्षातील हे मात्र सांगितलेले नाही.

‘तीन लोकांना जोडा’ बिझनेस मॉडेल कसे काम करते?

तीन लोकांना जोडण्याच्या या कामात तुम्हाला कंपनीची उत्पादने एका निश्चित किंमतीवर खरेदी करावी लागतात. यानंतर तुमचे सहकारी, नातेवाईक किंवा कोणालाही तुमच्याकडून खरेदी करण्यास सांगावे लागते. यासाठी तुम्हाला कोण तरी एका मोठ्या सेमिनारमध्ये घेऊन जाते. इथे तुम्हाला काही स्वप्न दाखविली जातात. यात “जर तुम्ही या बिझनेसमध्ये आला तर तुम्हाला वर्ल्ड टूरला पाठवले जाईल. लाखो रुपयांची कमाई होईल. तुम्ही तुमची ड्रीम कार खरेदी करू शकाल. मोठ्या घरात राहू शकाल. तुम्ही घरी बसून लाखो रुपये कमवाल. या सर्व स्वप्नांना भुलून तुम्ही त्यांच्या बिझनेसमध्ये जाता. त्यानंतर त्यातील काही टक्के रक्कम तुम्हाला या सेमिनारपर्यंत घेऊन आलेल्या व्यक्तीला मिळते. आता तुम्हालाही तेच करावे लागते, जे सेमिनारपर्यंत घेऊन आलेल्या व्यक्तीने केलेले असते. म्हणजे काय तर तेच कंपनीचे सामान विकायचे आणि तीन लोक जोडायची. या तीन लोकांना जोडल्याचे कमिशन तुम्हाला मिळते.

विवेक बिंद्राच्या कंपनीने कोणती उत्पादने विकली?

अनेकदा ‘तीन लोकांना जोडा’ बिझनेस मॉडेलमधील कंपन्या दैनंदिन वस्तू विकतात. ज्यामध्ये तेल, साबण, स्वयंपाकघरातील वस्तू किंवा कपडे अशा गोष्टी असतात. सेमिनारला गेल्यानंतर अनेकांना वाटते की आपण या सर्व वस्तू बाहेरच्या मार्केटमधून तर विकत घेतो, मग ते येथून का घेऊ नये? यातून आपली कमाईही होऊ शकेल. पण विवेक बिंद्रा आणि त्यांच्या कंपनीने इथे थोडा वेगळा विचार केला. दैनंदिन गोष्टींऐवजी त्यांनी स्टार्टअप्स आयडिया आणि ट्रेनिंग देणारे, बिझनेस आयडिया देणारे विविध प्रकारचे कोर्सेस विकायला सुरुवात केली. वेगवेगळ्या किमतीत हे कोर्सेस विकले जात होते. तुमचे जे बजेट असेल त्या किंमतीनुसार कोर्स असतील याची काळजी घेतली गेली.

आधी काही या तरुणांना हे कोर्स विकत घ्यायला लावले. त्यानंतर त्यांना हे कोर्स आणखी तीन व्यक्तींना विकायला लावले. त्या तीन व्यक्तींनी कोर्स विकत घेतल्यानंतर त्याचे कमिशन तुम्हाला ट्रान्सफर केले जाते. हा कमिशनचा आकडा मोठा असायचा. जेवढ्या रक्कमेचा कोर्स तेवढे कमिशन.यातून बिंद्रा यांनीही मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवली. विवेक बिंद्राची सध्य स्थितीमध्ये एकूण संपत्ती सुमारे 90 कोटी रुपयांच्या घरात आहे. दर महिन्याला ते 40 ते 50 लाख रुपये कमावू लागले. विवेक बिंद्रा यांचे सध्या दिल्लीत मोठे घर आहे. याशिवाय मुंबई आणि नोएडामध्ये अनेक रिअल इस्टेट मालमत्ता आहेत, सध्या ते नोएडामध्ये राहायला आहेत. .

बिझनेस मॉडेल कुठे फसले?

हा बिझनेस तेजीत असतानाच या महिन्यात संदीप माहेश्वरी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक ‘बिग स्कॅम एक्सपोज’ म्हणून व्हिडीओ अपलोड केला. यात संदीप माहेश्वरी दोन मुलांशी बोलताना दिसत आहेत. ते एका ‘बड्या यूट्यूबर’ च्या कोर्सला जाऊन त्यांना कसे नुकसान सहन करावे लागले याबाबतचा अनुभव ती दोन मुले सांगत असतात. यातील एक मुलगा म्हणतो की “तिथे बिझेनमनऐवजी सेल्समन बनवत आहेत. माईंड डायव्हर्ट करतात. तिथे फक्त त्यांचेच प्रोडक्ट विकायचे असतात. आधी तुम्ही नक्कीच बिझनेसमन व्हाल असे आश्वासन दिले जाते. पण तसे काहीही होत नाही. 50, हजार रुपये भरून कोर्सला गेलो होतो. मग हे उत्पादन म्हणून इतरांना विकावे लागते. याच गोष्टीला मल्टी लेव्हल मार्केटिंग म्हणतात.

त्यानंतर दुसरा मुलगा त्याचा अनुभव सांगू लागतो, ” तो म्हणतो, माझ्या एका पाहुण्यांचे ऐकून मी या ‘बडा यूट्यूबर’ च्या कोर्सला गेलो. 35 हजार रुपये देत प्रवेश घेतला. मात्र विविध प्रकारचे कोर्स तिथे होते. अगदी एक लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंतचे कोर्स उपलब्ध आहेत. यात तुम्हाला ट्रेनिंग दिले जाते. पण ट्रेनिंग घेतल्यावर कळले की ते त्यांचेच प्रोडक्ट विकायचे असते. यावर तुम्हाला कमिशन मिळते. ज्या पाहुण्यांचे ऐकून मी या कोर्सला गेलो होते त्यांना ते कमिशन मी गेल्यानंतर मिळाले. थोडक्यात तुम्हाला सेल्समन बनविले जाते. पण मला 35 हजार रुपये देऊन एक रुपयाही कमावता आला नाही. तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर हा कोर्स दुसऱ्या कोणाला तरी विका आणि तुमचे पैसे कमवा किंवा मग तुमच्या 35 हजारांवर पाणी सोडा.

#stopvivekbindra

यात संदीप माहेश्वरी यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. पण हा थेट विवेक बिंद्रा यांच्यावर हल्लाबोल असल्याचे लोकांनी ओळखले. जसे लोकांनी ओळखले तसेच बिंद्रा यांनीही ओळखले. त्यांनी तात्काळ यूट्यूब कम्युनिटीवर एक भली मोठी पोस्ट करत माहेश्वरींना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. बिंद्रा यांनी माहेश्वरींना बदनामीची नोटीस पाठविली. तर बिंद्रा यांनी काही लोकांना आपल्या घरी पाठविले. हा व्हिडीओ डिलीट करण्यासाठी आपल्यावर दबाव आहे, आपल्याला धमक्या येत असल्याचा आरोप केला.

यानंतर दोघांमधील आरोप-प्रत्यारोपांनी आगीचे स्वरुप धारण केले. यूट्यूबवर बिंद्रा यांच्याविरोधात एक मोहीम सुरु झाली. बिंद्रा यांच्यामुळे आपली किती आणि कशी फसवणूक झाली, याचे दावे करणारे तरुण व्हिडीओच्या माध्यमातून समोर येऊ लागले. #stopvivekbindra असा हॅशट्यॅग ट्रेन्डिंगला आला. माध्यमांनीही या विषयाला उचलून धरले. यानंतरच बिंद्रा यांच्या यूट्यूब चॅनेलचा रिच कमालीचा कमी झाल्याचे सांगितले जात आहे. अशात गत शुक्रवारी संध्याकाळी पत्नीला मारहाण केल्याचा आरोपात विवेक बिंद्राविरोधात एफआयआर दाखल झाल्याची बातमी आली. यानंतर त्यांच्याविरोधातील मोहिमेला आणखी धार आल्याचे पाहायला मिळत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या