पुण्याच्या नसरापूरपासून हैदराबादपर्यंत नराधमांचा सुळसुळाट; लेडी ‘सिंघम’ ने 3 तासांत 40 लांडगे ठेचले!

Women Safety साधी साडी, हातात एक छोटी बॅग आणि चेहऱ्यावर सामान्य प्रवाशासारखी अस्वस्थता घेऊन एक स्त्री एकटीच बसची वाट पाहत उभी होती.

  • Written By: Published:
पुण्याच्या नसरापूरपासून हैदराबादपर्यंत नराधमांचा सुळसुळाट; लेडी 'सिंघम'ने 3 तासांत 40 लांडगे ठेचले!

Hyderabad Woman Cop Midnight Operation : मध्यरात्री 12:30 ची वेळ हैदराबादच्या दिलसुखनगर बस स्टॉपवर भयाण शांतता… अधूनमधून दूरवर कुत्र्यांचं भुंकणं आणि वाऱ्याचा सुसाट आवाज याशिवाय तिथे काहीच नव्हतं. साधी साडी, हातात एक छोटी बॅग आणि चेहऱ्यावर सामान्य प्रवाशासारखी अस्वस्थता घेऊन एक स्त्री एकटीच बसची वाट पाहत उभी होती.

आई, तुम्ही गेल्यावर तात्या मला ओढून घ्यायचे… पर्वती प्रकरणाlत मुलीच्या एका वाक्याने आई-वडील सुन्न!

एकीकडे महाराष्ट्र चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचारांनी हादरलेला असतानाच हैदराबादच्या रस्त्यावर मध्यरात्रीच्या काळोखात एक ‘अग्नीपरीक्षा’ सुरू होणार होती. पण त्या अंधारालाही ठाऊक नव्हतं की, आज सावज स्वतःहून शिकारीला बाहेर पडलंय! रस्त्यावर उभी असलेली ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नव्हती तर, मलकाजगिरीच्या पोलीस आयुक्त व्ही. सुमती होत्या.

एकीकडे ‘महिला सुरक्षा’ या विषयावर मोठमोठी भाषणं दिली जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात परिस्थिती किती विदारक आहे, याची प्रचिती सुमती यांनी रात्रीच्या अंधारात एकट्याने रस्त्यावर उतरून केलेल्या ‘रिअॅलिटी चेक’ मधून केली आहे आणि समोर जे आलं त्याने संपूर्ण पोलीस प्रशासन आणि समाज हादरून गेला आहे.

फाशी नाही त्याला बाळाची हत्या केली त्याच जागेवर…,आरोपी कांबळेच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय?

नेमकं काय घडलं?

“माझ्या शहरात माझी बहीण-मुलगी सुरक्षित आहे का?” हे तपासण्यासाठी पोलीस आयुक्त व्ही. सुमती यांनी खाकी वर्दी कपाटात ठेवली आणि ‘ती’ बनून रस्त्यावर उतरल्या. कोणताही सरकारी ताफा नाही, सायरनचा आवाज नाही की हातात बंदूक नाही. पण काही अंतरावर अंधारात त्यांचे ‘खास’ शिकारी म्हणजे साध्या वेशातील पोलीस दबा धरून बसले होते. रात्रीचे साडेबारा वाजलेले असताना आयुक्त सुमती एका सामान्य महिलेप्रमाणे हैदराबादच्या दिलसुखनगर बस स्टॉपवर जाऊन उभ्या राहिल्या. हे केवळ एक ‘ऑपरेशन’ नव्हते, तर रात्रीच्या प्रवासात महिलांना नक्की काय सोसावे लागते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न होता.

अंधारातून बाहेर आले 40 लांडगे

आयुक्त सुमती बस स्टॉपवर उभ्या राहिल्या आणि काही वेळातच त्याठिकाणी विकृतीचा बाजार भरला. पुढील तीन तासांत जे घडलं ते सुन्न करणारं होतं. कारण एकटी स्त्री दिसताच या ‘सभ्य’ समाजातील विकृतीचे विषारी दात बाहेर येऊ लागले. पहिल्या 10 मिनिटांत काही दुचाकीस्वारांनी वेग कमी केला. नजरेने शरीराचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला. त्यानंतर पुढील 60 मिनिटांमध्ये मद्यधुंद तरुणांच्या टोळ्या, गांजाच्या नशेत धुंद असलेले टपोरी आणि ऑफिस सुटलेले ‘पांढरपेशी’ लांडगे सुमती यांच्या जवळ घुटमळू लागले.

एवढेच नव्हे तर, काहींनी “कुठे जायचंय?”, “सोडू का?”, अशा अश्लील शब्दांचा भडिमार सुरू केला. पहाटे साडे तीन वाजेपर्यंत चाललेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये थोड्या थोडक्या नव्हे तर, 40 पुरुषांनी त्यांच्याशी अयोग्य प्रकारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यात केवळ गुन्हेगार नव्हते, तर सुशिक्षित म्हणवणारे विद्यार्थी आणि आयटी कर्मचारीही होते. पण, जसा ‘मॅडम’नी इशारा दिला, तशी अंधारात दबा धरून बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी झडप घातली आणि या 40 जणांना ताब्यात घेतले. भररस्त्यात जेव्हा त्यांना समजलं की, समोर उभी असलेली स्त्री सामान्य नागरिक नसून शहराची पोलीस आयुक्त आहे, तेव्हा त्या नराधमांची बोबडीच वळली.

कोंबडी, कुत्रा, शेळीवरही अत्याचार; नरसापूर प्रकरणातील नराधमाचा विकृत इतिहास समोर

25 वर्षांपूर्वीचा इतिहास आणि आजही तीच ‘गलिच्छ’ नजर!

धक्कादायक बाब म्हणजे, व्ही. सुमती यांनी 25 वर्षांपूर्वी काझीपेटमध्ये डीएसपी असतानाही अशीच मोहीम राबवली होती. आज आयुक्त पदावर असतानाही त्यांना पुन्हा तेच करावं लागलं. याचा अर्थ, अडीच दशके उलटली तरी रात्रीच्या वेळी एकट्या महिलेकडे पाहण्याची या समाजाची ‘नजर’ बदललेली नाही, हीच या व्यवस्थेची सर्वात मोठी हार आहे.

महाराष्ट्रात चिमुकल्या मुली सुरक्षित नाही, ही जखम ताजी असताना सुमती यांनी केलेलं हे धाडस गुन्हेगारांच्या मुळावर घाव घालणारं आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने स्वतःला ‘टार्गेट’ बनवून समाजाचं जे गलिच्छ रूप समोर आणलं आहे, त्याचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. पण प्रश्न उरतोच की, एका महिलेला सुरक्षित वाटण्यासाठी प्रत्येक वेळी पोलीस आयुक्तांनाच रस्त्यावर उतरावं लागणार का? आणि प्रत्येक शहराच्या पोलीस आयुक्तांनी सुमती यांच्यासारखं धाडस दाखवलं, तरच बदलापूर काय किंवा नुकत्याच पुण्यातील नसरापूरमध्ये झालेल्या घटनांची पुनरावृत्ती थांबेल अशीच भावना नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

follow us