आठवड्याला 70 तास काम; नारायण मूर्तींनी दिलेल्या सल्ल्यावर मोदी सरकारनं सांगितलं प्लॅनिंग
70 Hour Work Week : देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy)मागील महिन्यापासून चर्चेत आहेत. भारतीय तरुणांनी आठवड्याला 70 तास काम केलं पाहिजे, म्हणजेच दररोज 10 तास काम केलं पाहिजे, असं वक्तव्य इन्फोसिसचे (infosys)सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी एका पॉडकास्टमध्ये (podcast)केलं. त्यानंतर हा मुद्दा आता संसदेमध्ये (Parliaments)गाजला आहे. मोदी सरकारने त्यावर आपलं मत स्पष्ट केलं आहे. सरकारनं त्याचं प्लॅनिंग देखील सांगितलं आहे.
नारायण मूर्ती यांनी सांगितलेल्या आठवड्याला 70 तास कामाच्या कल्पनेवर सोमवारी संसदेत तीन विरोधी खासदारांनी प्रश्न उपस्थित केला. या खासदारांच्या प्रश्नांना प्रश्नांना केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameshwar Teli)यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी सांगितले की, आठवड्यातील 70 तास काम करण्यासंबंधीचा असा कोणताही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाही.
विशेष म्हणजे नारायण मूर्ती यांनी गेल्या महिन्यात इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांच्याशी ‘द रेकॉर्ड’ या पॉडकास्टवर बोलताना म्हणाले होते की, जेव्हा देशातील तरुण आठवड्यातून 70 तास काम करतील तेव्हाच भारत देश प्रगत देशांशी स्पर्धा करू शकेल.
नारायण मूर्ती म्हणाले की, सध्या भारतातील कामाची उत्पादकता जगात सर्वात कमी आहे. तर आमची सर्वात मोठी स्पर्धा चीनबरोबर आहे. त्यामुळे तरुणांना अतिरिक्त तास काम करावे लागेल, ज्या पद्धतीने जपान आणि जर्मनीने दुसऱ्या महायुद्धानंतर केले होते.
नारायण मूर्ती यांच्या कल्पनेबाबत देशभरात नवा वाद सुरू झाला आहे. उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी त्यावर भाष्य केलं आहे. चर्चेत असलेल्या या मुद्द्यावर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. आता या प्रकरणी संसदेत तीन विरोधी खासदारांनी सरकारचे मत जाणून घेण्यासाठी प्रश्न उपस्थित केले. त्यावर कामगार आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
मूर्ती यांच्या सल्ल्यावर काँग्रेसचे खासदार कोमटी वेंकट रेड्डी, भारत राष्ट्र समितीचे मन्ने श्रीनिवास रेड्डी आणि वायएसआरसीपी नेते कनुमुरु रघु रामा कृष्णा राजू या तीन खासदारांनी प्रश्न उपस्थित केले.