Karanatak Election : स्टार प्रचारक यादीतून पटोलेंना डच्चू, दोन्ही चव्हाणांना मात्र संधी
Karanatak Election 2023 : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सध्या कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता आहे. पण काही सर्व्हेनुसार यावेळेस कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार येणार असे बोलले जात आहे. त्यावरुन आता जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. आज सकाळीच भाजपकडून कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी 40 स्टार प्रचारकांची यादी जारी करण्यात आली आहे. त्यानंतर आता काँग्रेसकडूनदेखील 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी- वॉड्रा, राहुल गांधी अशा दिग्गज नेत्यांची नावे आहेत. पण या यादीमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण यांची नावे या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
भारताविरुद्धच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूंचा समावेश
#KarnatakaAssemblyElection2023 | Congress issues a list of star campaigners for the upcoming election.
Party president Mallikarjun Kharge, UPA chairperson Sonia Gandhi, Rahul Gandhi, Priyanka Gandhi Vadra, state chief DK Shivakumar, LoP Siddaramaiah, Jagadish Shettar, Shashi… pic.twitter.com/kQARlZZ4aL
— ANI (@ANI) April 19, 2023
त्यामुळे अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे. मात्र या कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारासाठी नाना पटोलेंना काँग्रेसकडून डच्चू देण्यात आल्याने अंतर्गत गटबाजीची चर्चा रंगली आहे. याचे कारण नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचारासाठी नाना पटोलेंना संधी मिळेल असे बोलले जात होते. पण त्यांना या स्टार प्रचारकांच्या यादीतून डावलण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गट-तट आहेत का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
त्यातच गेल्या काही दिवसांपासून नाना पटोलेंवर पक्षातीलच काही नेत्यांनी आरोप केले आहेत. नागपूरमधील काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी तर नाना पटोलेंवर थेट आरोप केले आहेत. त्याच्याआधी सत्यजित तांबे यांच्या विधानपरिषेदच्या उमेदवारीवरुन देखील नाना पटोले हे वादात सापडले होते. त्यामुळेच नाना पटोलेंना कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून लांब ठेवले आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Cabinet Meeting : बैठकीतील महत्वाचे निर्णय कोणते; वाचा थोडक्यात
दरम्यान, भाजपनेदेखील आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह एकुण 40 नेत्यांची नावे आहेत. त्यामुळे कर्नाटक निवडणुकीत चांगलीच चुरस दिसून येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांचे देखील नाव आहे.