देशात पहिल्यांदाच ‘खुशी विभाग’ सुरू होणार? लोकांच्या हॅप्पीनेसवर मोजली जाणार प्रगती…

Happiness Department उत्पन्न वाढत असलं, तरी मानसिक ताण, सामाजिक एकटेपणा, असमानता आणि जीवनातील असमाधान कायम राहू शकतं. त्यामुळे...

  • Ninad K
  • Written By: Published:
Kerala government Happiness Department

Government Planning To Creating Happiness Department : एखाद्या देशाची किंवा राज्याची प्रगती मोजताना अर्थव्यवस्थेचा आकार, उत्पन्न, रोजगार आणि विकासकामांना महत्त्व दिलं जातं. पण या सगळ्या प्रगतीच्या केंद्रस्थानी असलेला माणूस खरंच आनंदी आहे का? त्याचं जीवन किती सुखकर आहे? त्याला मानसिक समाधान मिळतंय का? या प्रश्नांचा विचारही विकास मोजताना व्हायला हवा, अशी नवी संकल्पना पुढे येत आहे. याच विचारातून आता नागरिकांच्या आनंदासाठी स्वतंत्र सरकारी विभाग स्थापन करण्याची तयारी सुरू झाली आहे. या विभागाच्या माध्यमातून लोकांच्या आनंदावर आणि जीवनमानावर सरकारी योजनांचा किती परिणाम होतो, याचं मूल्यमापन केलं जाणार आहे.

ब्रँडेड वस्तू वापरणारे खरंच कॉन्फिडंट असतात? साध्या वस्तू वापरणाऱ्यांची मानसिकता कशी असते?

काय आहे ‘आनंदम’ योजना? कोणत्या राज्यात होणार सुरुवात?

नागरिकांच्या आनंदाला विकासाचा महत्त्वाचा निकष मानण्याच्या दिशेने केरळ सरकारने ‘आनंदम’ नावाचा स्वतंत्र ‘हॅप्पीनेस डिपार्टमेंट’ अर्थात आनंद विभाग स्थापन करण्याची योजना आखली आहे. हा विभाग स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित खात्याअंतर्गत काम करणार असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य मंत्री के. एम. शाजी यांच्या मते, लोकांमध्ये आनंद आणि सुखसमृद्धी वाढवणं, तसेच सरकारच्या कल्याणकारी आणि विकास योजनांचा नागरिकांच्या आनंदावर होणारा परिणाम तपासणं, ही या विभागाची प्रमुख उद्दिष्टं असतील.

या विभागांतर्गत विविध उपक्रम राबवण्याची योजना आहे. त्यामध्ये ‘हॅप्पीनेस सेंटर’ उभारण्याचाही समावेश आहे. ग्रामपंचायती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांना एकत्र बसता येईल, संवाद साधता येईल आणि सामाजिक संबंध अधिक दृढ करता येतील, अशा जागा निर्माण करण्याचा विचार आहे. सध्या या नव्या विभागाची रचना तयार करण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

GDP नव्हे, तर आनंदही विकासाचा निकष

एखाद्या देशाची आर्थिक प्रगती मोजण्यासाठी GDP हा महत्त्वाचा निकष मानला जातो. देशात किती उत्पादन होतं, अर्थव्यवस्था किती वेगाने वाढते आणि आर्थिक व्यवहारांचा विस्तार किती होतो, यावरून प्रगतीचा अंदाज घेतला जातो. मात्र, GDP वाढला म्हणजे नागरिकांचं जीवन अधिक आनंदी झालं, असं नेहमीच म्हणता येत नाही.

उत्पन्न वाढत असलं, तरी मानसिक ताण, सामाजिक एकटेपणा, असमानता आणि जीवनातील असमाधान कायम राहू शकतं. त्यामुळे विकास मोजताना केवळ आर्थिक आकडेवारीवर अवलंबून न राहता नागरिकांचं आरोग्य, सामाजिक सुरक्षितता, मानसिक समाधान आणि जीवनमान यांचाही विचार करायला हवा, अशी भूमिका या संकल्पनेमागे आहे.

केरळ सरकारच्या या प्रस्तावामागेही हाच विचार असल्याचं सांगितलं जात आहे. नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ मिळतोय का, त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल होतोय का आणि सामाजिक पातळीवर त्यांचं जीवन अधिक सुखकर होतंय का, याचा अभ्यास करण्यावर भर दिला जाणार आहे.

आयफोन वापरणाऱ्यांचा स्वभाव कसा असतो? रंजक माहिती एकदा वाचाच…

भूतानने 1972 मध्ये मांडली होती ‘ग्रॉस नॅशनल हॅप्पीनेस’ची संकल्पना

नागरिकांचा आनंद हाच विकासाचा महत्त्वाचा निकष असावा, ही संकल्पना नवी नाही. भूतानचे चौथे राजा जिग्मे सिंग्ये वांगचुक यांनी 1972 मध्ये ‘ग्रॉस नॅशनल हॅप्पीनेस’ (Gross National Happiness – GNH) ही संकल्पना मांडली होती. या विचारानुसार, देशाची प्रगती केवळ आर्थिक वाढीवरून ठरवता कामा नये.

नागरिकांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, सांस्कृतिक जतन, सुशासन आणि जीवनातील समाधान यांनाही तितकंच महत्त्व दिलं पाहिजे. म्हणजेच, अर्थव्यवस्था किती मोठी झाली यासोबतच नागरिकांचं जीवन किती चांगलं झालं, हेदेखील तपासलं पाहिजे. याच व्यापक विचाराच्या दिशेने आता इतर ठिकाणीही प्रयत्न होत असून, केरळमध्ये प्रस्तावित असलेला ‘आनंदम’ विभाग हा त्याच दृष्टिकोनातून पाहिला जात आहे.

‘आनंद’ मोजता येणार का?

एखाद्या राज्याचा GDP, उत्पन्न किंवा रोजगाराची आकडेवारी मोजणं तुलनेने सोपं असतं. मात्र, माणसाचा आनंद मोजणं अधिक गुंतागुंतीचं आहे. एका व्यक्तीला आनंद देणारी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीसाठी तितकी महत्त्वाची असेलच असं नाही. त्यामुळे नागरिकांच्या आनंदाचं मूल्यमापन करताना आरोग्य, शिक्षण, सामाजिक संबंध, आर्थिक सुरक्षितता आणि जीवनातील समाधान अशा अनेक निकषांचा विचार करावा लागेल.
केरळ सरकारच्या प्रस्तावित ‘आनंदम’ विभागाचं यश केवळ तो सुरू झाला की नाही, यावर ठरणार नाही. सरकारी योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात प्रत्यक्ष किती सकारात्मक बदल घडतो, लोकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी आणि एकमेकांशी संवाद साधण्यासाठी किती चांगल्या संधी मिळतात आणि त्यांचं जीवनमान किती सुधारतं, यावर त्याचं यश अवलंबून असेल.

आयुष्यात आर्थिक प्रगती महत्त्वाची आहेच, पण त्या प्रगतीचा फायदा घेणारा माणूस समाधानी आणि आनंदी आहे का? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. केरळचा ‘आनंदम’ प्रयोग प्रत्यक्षात उतरल्यास विकासाकडे पाहण्याचा हा वेगळा दृष्टिकोन किती प्रभावी ठरतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

follow us