माझ्याशिवाय आयपीएल यशस्वी झाली नसती; शशी थरूरांपासून स्क्रिप्टेड वादांपर्यंत ललित मोदींचे खळबळजनक दावे
ललित मोदी यांनी एका मुलाखतीत आयपीएलच्या निर्मितीपासून ते कोची फ्रँचायजी वाद अशा अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे.
Lalit Modi’s sensational claims : क्रिकेट विश्वातील सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक कामे करणाऱ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासाशी संबंधित अनेक वादग्रस्त आणि धक्कादायक दावे पुन्हा एकदा समोर आले आहेत. आयपीएलचे संस्थापक आणि माजी आयुक्त ललित मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या एका विस्तृत मुलाखतीत आयपीएलच्या निर्मितीपासून ते कोची फ्रँचायजी वाद आणि स्पर्धेच्या लोकप्रियतेमागील कथित रणनीतीपर्यंत अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे क्रिकेट आणि राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
आयपीएलची कल्पना माझीच; माझ्याशिवाय हे यश शक्य नव्हते
ललित मोदी यांनी मुलाखतीदरम्यान सर्वप्रथम आयपीएलच्या यशामध्ये आपल्या भूमिकेवर भर दिला. त्यांनी स्पष्ट शब्दांत दावा केला की, आयपीएलची संकल्पना, तिची रचना आणि जागतिक स्तरावरील ब्रँडमध्ये झालेले रूपांतर यामागे त्यांचेच नेतृत्व होते. मोदी म्हणाले, लोक आज आयपीएलला जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणतात. पण हे यश एका दिवसात आलेलं नाही. त्यामागे अनेक वर्षांचं संशोधन, जगभरातील क्रीडा लिग्सचा अभ्यास आणि व्यावसायिक नियोजन होतं. मी जसा होतो तसा नसतो, तर आयपीएल कधीच या उंचीवर पोहोचली नसती.
त्यांनी पुढे सांगितले की, टी 20 क्रिकेट लोकप्रिय होण्यापूर्वीच त्यांनी फ्रँचायजी आधारित क्रिकेट लीगची संकल्पना बीसीसीआयसमोर मंडळी होती. सुरुवातीला अनेकांना हा प्रयोग अपयशी ठरेल असं वाटत होतं. मात्र 2008 मध्ये स्पर्धा सुरू झाल्यानंतर क्रिकेटच्या व्यावसायिक जगात क्रांती घडली.
बीसीसीआयला खूप अधिकार दिल्याची खंत
ललित मोदी यांनी आयपीएलच्या प्रशासकीय संरचनेबाबत देखील भाष्य केलं. भारत सोडताना काही महत्वाच्या गोष्टी अपूर्ण राहिल्याची खंत आज देखील वाटते, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते आयपीएल ही स्वतंत्र कंपनी म्हणून चालवली जाणे आवश्यक होते. बीसीसीआयला आर्थिक लाभ मिळत राहावा, मात्र लीगचे प्रशासन फ्रँचायजी मालक आणि बीसीसीआय यांच्या संयुक्त भागीदारीत असायला हवे होते. मी आयपीएलसाठी स्वतंत्र संविधान तयार केले होते. मात्र त्यावेळी मी काही अटींवर ठाम राहिलो नाही. मी बीसीसीआयला आवश्यकतेपेक्षा जास्त अधिकार दिले. आज पुन्हा संधी मिळाली तर मी त्यामध्ये बदल करेन, असं मोदी म्हणाले.
एअरपोर्टवर फोटो काढताना सावध रहा; DGCA चे कडक निर्देश, उल्लंघन केल्यास विमानप्रवासावरही येऊ शकते बंदी
कोची आयपीएल वादावर 16 वर्षांनंतर नवा दावा
मुलाखतीतील सर्वात मोठी खळबळ कोची आयपीएल फ्रँचायजी संदर्भातील विधानांमुळे उडाली. 2010 मध्ये कोची टस्कर्स केरळ संघाच्या मालकी संरचनेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्याच वादावर आता मोदी यांनी नव्याने भाष्य केले आहे. त्याच्या दाव्यानुसार, कोची फ्रँचायजीच्या कन्सोर्टियममधील सर्व भगधारकांशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र सुनंदा पुष्कर या बैठकीला उपस्थित नव्हत्या. त्याच वेळी त्यांना सुनंदा पुष्कर यांना दिलेल्या हिस्स्याबाबत शंका निर्माण झाली. मी विचारलं की सुनंदा पुष्कर कोण आहेत? त्यांना 25 टक्के हिस्सा का देण्यात आला आहे? मला या प्रश्नांची उत्तरं हवी होती. मात्र त्यानंतर घटनांना अचानक वेग आला, असा दावा मोदी यांनी केला.
सुनंदा पुष्करबद्दल चौकशी करू नकोस; शशी थरूरांवर गंभीर आरोप
ललित मोदी यांनी दावा केला की, त्यांनी सुनंदा पुष्कर यांच्या भूमिकेबाबत चौकशी करण्याची भूमिका घेतल्यानंतर तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांचा त्यांना फोन आला. मोदींच्या म्हणण्यानुसार शशी थरूर माझे मित्र होते. त्यांनी मला फोन करून सुनंदा पुष्कर यांच्याबद्दल प्रश्न विचारू नकोस असं सांगितलं. तसेच चौकशी सुरू ठेवल्यास माझ्या घरावर छापा टाकला जाईल, अशी धमकी देखील दिली. हा दावा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असला तरी यावर अद्याप शशी थरूर किंवा संबंधित व्यक्तीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
करारावर स्वाक्षरीसाठी दबाव आणला गेला?
मोदी यांनी पुढे असा आरोप केला की, कोची फ्रँचायजीचा करार मंजूर करण्यासाठी त्यांच्यावर विविध स्तरांतून दबाव आणला जात होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही काँग्रेस नेत्यांकडून त्यांना फोन येत होते. त्याचबरोबर बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष शशांक मनोहर यांनी देखील करारावर तात्काळ स्वाक्षरी करण्यास सांगितले होते. पहाटे दोन वाजता मला फोन आला आणि करारावर सही करण्यास सांगण्यात आले. मी स्पष्टपणे नोंद करून ठेवली की, ही स्वाक्षरी दबावाखाली केली जात आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.
पुढील काही तासांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन, महाराष्ट्रात पावसाचा इशारा, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट
दुसऱ्याच दिवशी उघड झाले नात्याचे रहस्य
ललित मोदी यांच्या म्हणण्यानुसार, करारावर स्वाक्षरी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देशातील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर यांच्या नात्याबाबतच्या बातम्या झळकल्या. त्या सकाळी मला संपूर्ण घाईमागचं कारण समजलं, असं मोदी यांनी सांगितलं.
रेटिंग्स घसरल्या की आम्ही वाद निर्माण करायचो
मात्र मुलाखतीतील सर्वात धक्कादायक दावा आयपीएलच्या लोकप्रियतेशी संबंधित होता. मोदी यांनी कबूल केले की, स्पर्धेची लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी काही वाद मुद्दाम पुढे आणले जात असत.सर्व काही पूर्णपणे योगायोगाने घडत नसे. जेव्हा आम्हाला वाटायचं की रेटिंग्स घसरत आहेत, तेव्हा एखादा वाद चर्चेत आणला जायचा. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे प्रभावी ठरत असे, असा दावा त्यांनी केला.
दक्षिण आफ्रिकन कर्णधाराच्या अफेअरची बातमी मुद्दाम लीक?
मोदी यांनी उदाहरण देताना सांगितलं की, दक्षिण आफ्रिकेच्या एका कर्णधाराचे चिअरलिडरसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती त्यांच्या टीमपर्यंत पोहोचली होती. आम्ही ती बातमी माध्यमांपर्यंत पोहोचवली. त्यातून मोठा वाद निर्माण झाला. लोकांची उत्सुकता वाढली आणि स्पर्धेचे रेटिंग्स देखील वाढले. नंतर त्या क्रिकेटपटूने त्या चिअरलिडरशी लग्न केले. पण सुरूवातीला ही माहिती बाहेर जाण्यामागे आमची रणनीती होती, असं त्यांनी सांगितलं.
पुन्हा चर्चेत आलेला आयपीएलचा वादग्रस्त इतिहास
ललित मोदी यांच्या ताज्या मुलाखतीममुळे आयपीएलच्या सुरूवातीच्या काळातील अनेक वाद पुन्हा चर्चेत आले आहेत. कोची फ्रँचायजी वाद, शशी थरूर यांच्यावरील आरोप, बीसीसीआयशी असलेले मतभेद आणि स्पर्धेतील कथित स्क्रिप्टेड वाद या सर्व मुद्द्यांमुळे क्रिकेटविश्वात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. तथापि, या सर्व दाव्यांची स्वतंत्र पडताळणी झालेली नसून ललित मोदी यांनी केलेले वैयक्तिक आरोप आणि दावे आहेत. संबंधित व्यक्तींकडून अधिकृत प्रतिक्रिया आल्यानंतरच या प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होऊ शकेल.