Land For Job Scam : लालू, राबडीसह संपूर्ण कुटुंबाला मोठा दिलासा; जामीन मंजूर
बिहार : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव ( lalu yadav) , त्यांची पत्नी राबडी देवी आणि त्यांची मुलगी आणि आरजेडी खासदार मीसा भारती यांना नोकरीसाठी जमीन प्रकरणात जामीन मिळाला आहे. (Land For Job Scam) राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) लालू यादव, मिसा भारती आणि राबडी देवी यांना ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन देण्याच्या प्रकरणातील ३ आरोपी मंगळवारी (15 मार्च) दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर झाले. सुनावणी सुरू झाल्यावर सर्व आरोपींनी कोर्टात न्यायाधीशांसमोर हात वर करून हजेरी नोंदवली.
न्यायालयाने जामीन मंजूर केला
यानंतर लालू यादव, मिसा भारती आणि राबडी देवी यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. तिघांची याचिका मान्य करत न्यायालयाने सर्व आरोपींना ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्याचे आदेश दिले.
लालू यादव यांनी रेल्वेमंत्री असताना नोकरीच्या बदल्यात लोकांकडून जमीनी घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने गेल्या वर्षी १८ मे रोजी लालू यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
सीबीआय आणि ईडीची चौकशी
यापूर्वी 6 मार्च रोजी सीबीआय पाटणा येथील राबडी देवी यांच्या निवासस्थानी पोहोचली होती, जिथे त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांची चौकशी केली होती. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ७ मार्चला सीबीआयचे पथक मीसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. सीबीआयने घोटाळ्याप्रकरणी लालू यादव यांची चौकशी केली होती.
चौकशीनंतर तीन दिवसांनी ईडीच्या पथकाने लालू यादव, तेजस्वी यादव आणि त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या जवळपास 15 ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान ईडीने दावा केला होता की, तपासादरम्यान 600 कोटींच्या आर्थिक गुन्ह्याची माहिती समोर आली आहे. ईडीने सांगितले की 1 कोटी रोख, 1900 डॉलर्स, 540 ग्रॅम सोने आणि 1.5 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.