कुणाला लॉटरी तर कुणाला अचानक मिळाली खुर्ची; देशातील महिला मुख्यमंत्र्यांची खास स्टोरी

Women Chief Ministers in India : तब्बल 27 वर्षांनंतर भाजपने दिल्लीची सत्ता काबीज केल्यानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. धक्कातंत्रात तरबेज असलेल्या भारतीय जनता पार्टीने दिल्लीतही असंच सरप्राईज दिलं. अरविंद केजरीवाल यांना पराभूत करून मैदान मारलेल्या परवेश वर्मांनाच मुख्यमंत्रिपद मिळेल याची दाट शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, भाजपने दीर्घकालीन राजकारणाचा विचार करून भाजपाच्या मुशीत घडलेल्या रेखा गुप्ता यांना मु्ख्यमंत्री केलं.
रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री करण्यामागे भाजपाची अनेक राजकीय गणितं दडलेली आहेत. काळ जसजसा पुढे सरकेल तसतशी याची उत्तर मिळतीलही. परंतु, रेखा गुप्ता यांच्या रुपाने देशात 18 वी महिला मुख्यमंत्री मिळाली असेच म्हणता येईल. आज याच निमित्ताने देशातील काही प्रमुख महिला मुख्यमंत्र्यांच्या खास स्टोरी जाणून घेऊ या..
यूपी बाहेरच्या महिला नेत्या थेट मुख्यमंत्री
देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुचेता कृपलानी यांचे नाव घेतले जाते. उत्तर प्रदेशातील नसतानाही त्यांनी या राज्याचे मुख्यमंत्री करण्यात आले. कृपलानी यांचा जन्म पंजाबात झाला होता. परंतु, त्या बंगाली होत्या आणि त्यांचे शिक्षण दिल्लीत झाले होते. तरीही उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना हटवून त्यांच्या हाती राज्याची कमान देण्यात आली होती.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वेळ अशी आली होती की पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सत्तेला त्यांच्याच पक्षातील लोक आव्हान देऊ लागले होते. यात यूपीचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रभानू गु्प्ता आघाडीवर होते. गुप्ता यांच्या आव्हानामुळे भयभीत झालेल्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांनी थेट कामराज प्लॅन आखला. या प्लॅनअंतर्गत जुन्या लोकांना आपापल्या पदांचा राजीनामा द्यायचा होता. त्यामुळे चंद्रभानू गुप्ता यांना देखील राजीनामा देणे भाग पडले.
आमदारकीला दोनदा पराभूत, पण आता थेट CM पदापर्यंत मजल; कोण आहेत रेखा गुप्ता?
यानंतर उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री कुणाला करायचे असा प्रश्न काँग्रेससमोर होता. पार्टीत फूट पडलेली होती. चौधरी चरण सिंह, कमलापती त्रिपाठी, हेमवीत नंदन बहुगुणा यांसारखे दिग्गज दावेदार होते. परंतु, गुप्ता या लोकांना मुख्यमंत्री होऊ देण्यास इच्छुक नव्हते. अशात अचानक काँग्रेसने महिला मुख्यमंत्री करण्याचा निर्धार केला आणि सुचेता कृपलानी यांना संधी मिळाली.
केजरीवालांची तुरुंगवारी अन् आतिशींनी लॉटरी
आम आदमी पार्टीच्या आतिशी मार्लेन यांचा मुख्यमंत्री बनण्याचा किस्सा खास आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना पहिल्यांदा पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. नंतर 2020 मधील विधानसभा निवडणुकीत कालकाजी मतदारसंघातून आतिशी निवडून आल्या. पुढे 2023 मध्ये त्यांना शिक्षण खात्याचे मंत्री करण्यात आले. मनिष सिसोदिया यांना तुरुंगात जावे लागल्याने त्यांचे खाते आतिशींना देण्यात आले. नंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील तुरुंगाची हवा खावी लागली. तुरुंगात असतानाही बरेच दिवस त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिली नव्हता. नंतर त्यांना जामीन मिळाला पण त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपद स्वीकारलं नाही. यामुळे आतिशी यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली.
सीएम झाल्यानंतर जयललिता विधानसभेत
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री स्व. जयललिता यांना अभिनेत्री किंवा राजकारणी बनायचं नव्हते. त्यांना वकील व्हायचे होते. नशीबाने मात्र त्यांच्या बाबतीत काही वेगळंच लिहीलेले होते. जयललिता दोन वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आईने त्यांना बंगळुरूत आजी आजोबांकडे सोडले. नंतरच्या काळात त्यांनी संध्या या नावाने तामिळ चित्रपटात अभिनयाला सुरुवात केली. तामिळ सुपरस्टार एमजी रामचंद्रन यांच्याबरोबर त्यांची जोडी हिट ठरली. नंतरच्या काळात एमजी रामचंद्रन स्वतः राजकारणात आले त्यांनी जयललिता यांनाही राजकारणात आणले. एमजी रामचंद्रन यांनीच एआयएडीएमके या राजकीय पक्षाची स्थापना केली.
सन 1998 ची गोष्ट आहे. 25 मार्च रोजी तामिळनाडू विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला जात होता. याआधीच्या निवडणुकीत एआयएडीएमके पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. जयललिता याच विरोधी पक्षनेत्या बनल्या होत्या. द्रमुकचे एम. करुणानिधी मुख्यमंत्री होते. बजेट भाषण सुरू होताच जयललिता आणि त्यांच्या पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी कुणीतरी एक फाइल थेट सीएम करुणानिधी यांच्या दिशेने फेकली. यामुळे त्यांचा चष्मा खाली पडून फुटला. हा प्रकार पाहून जयललिता सभागृहाच्या बाहेर पडत असताना तत्कालीन मंत्री मुरगन त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. जयललिता यांना रोखण्याचा प्रयत्न केला. जयललिता सभागृहाबाहेर पडल्या आणि मुख्यमंत्री बनल्यानंतरच पुन्हा विधानसभेत येऊ अशी शपथ त्यांनी घेतली.
Delhi New CM : मोठी बातमी! रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री तर परवेश वर्मा उपमुख्यमंत्री
सन 1991 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर झालेल्या निवडणुकीत जयललिता यांनी काँग्रेसबरोबर आघाडी केली. या निवडणुकीत एआयएडीएमके काँग्रेस आघाडीला 234 पैकी 225 जागांवर विजय मिळाला. यानंतर जयललिता राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या.
दिल्लीच्या दोन सीएमचं हरियाणा कनेक्शन
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री सुषमा स्वराज दोघींचेही हरियाणाशी अतूट नाते आहे. सन 1977 मध्ये सुषमा स्वराज यांनी केवळ 25 वर्षांच्या वयात हरियाणातून निवडणूक जिंकली होती. कमी वयातच त्या चौधरी देवीलाल यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाल्या. आताच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता देखील हरियाणातील जिंद येथील आहेत.
12 ऑक्टोबर 1998 रोजी पक्षाच्या आदेशानुसार सुषमा स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. त्यांना सरकार चालवण्यासाठी फक्त 52 दिवस मिळाले. पुढे विधानसभा निवडणुका होत्या. पक्षाला मजबूत करायचे होते. तरीही अत्यंत कमी कार्यकाळात जनतेशी संबंधित मुद्द्यांवर सुषमा स्वराज यांनी भरपूर काम केले.
देशातील आतापर्यंतच्या महिला मुख्यमंत्री आणि कार्यकाळ
सुचेता कृपलानी उत्तर प्रदेश : 3 वर्ष 162 दिवस
नंदिनी सत्पथी ओडिशा : 4 वर्ष 185 दिवस
शशिकला काकोडकर गोवा : 5 वर्ष 258 दिवस
अनवरा तैमूर आसाम : 206 दिवस
व्हीएन जानकी तामिळनाडू : 23 दिवस
जे. जयललिता तामिळनाडू : 14 वर्षे 124 दिवस
मायावती उत्तर प्रदेश : 7 वर्ष 5 दिवस
राजिंदर कौर पंजाब : 83 दिवस
सुषमा स्वराज दिल्ली : 52 दिवस
शीला दिक्षित दिल्ली : 15 वर्षे 15 दिवस
राबडी देवी बिहार : 7 वर्षे 190 दिवस
उमा भारती मध्यप्रदेश : 259 दिवस
वसुंधरा राजे राजस्थान : 10 वर्ष 9 दिवस
ममता बॅनर्जी पश्चिम बंगाल : 13 वर्षांपासून सत्तेत
आनंदीबेन पटेल गुजरात : 2 वर्ष 77 दिवस
महबूबा मुफ्ती जम्मू काश्मीर : 2 वर्ष 76 दिवस
आतिशी मार्लेना दिल्ली : 21 सप्टेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025