गेल्या काही महिन्यापासून उत्तर प्रदेश (UP) आणि उत्तरप्रदेश मधील राजकारण (UP Politics) हा मोठा मुद्दा बनत चालला आहे. सध्या उत्तर प्रदेशात चालू असलेल्या स्थानिक निवडणुका आणि आगामी काळातील लोकसभा विधानसभा निवडणूका यामुळे या चर्चा पुन्हा जोर धरत आहेत.
सध्या उत्तर प्रदेशमध्ये 4 आणि 11 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. 13 मे रोजी याचे निकालही लागतील. सत्ताधारी भाजप (BJP) जास्तीत जास्त पालिका जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेले सपा (SP) , बसपाही (BSP) आपली पूर्ण ताकद लावून मैदानात उतरले आहेत.
सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यात बसपाने महापौरपदासाठी 17 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यापैकी 11 मुस्लिम चेहरे आहेत. यामुळे बसपाच्या मायावती (Mayawati) यांच्या नव्या सोशल इंजिनिअरिंगची चर्चा सुरु झाली आहे. मायावतींचं हे सोशल इंजिनिअरिंग (Social Engineering) काय आहे ? त्यांना याचा खरंच फायदा होईल का ?
मौत के सौदागर ते विषारी साप; पंतप्रधान मोदींवर कॉंग्रेसची ‘एवढ्या’ वेळा आक्षेपार्ह टीका
उत्तर प्रदेशातील 2012 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बसपाला पुन्हा मोठा विजय मिळवता आला नाही. यामुळे आगामी निवडणूका लक्ष्य ठेवून मायावती अशी समीकरणे जुळवत असल्याच्या चर्चा आहे. पालिका निवडणुका समोर असताना बसपा मुस्लिमांना सोबत घेऊन नवा डाव टाकणार का ? अशा चर्चा उत्तर भारतात आहेत.
बसपाकडून ओबीसींसाठी राखीव असलेल्या जागांवर मुस्लिम चेहरे उतरवले आहेत. रिंगणात उतरलेल्या 17 उमेदवारांपैकी 11 मुस्लिम आणि इतर 6 हिंदू उमेदवार आहेत, त्यापैकी तीन इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी आहेत आणि तेच दोन उमेदवार अनुसूचित जातीचे आहेत.
बहुजन समाजवादी पक्षाने सोशल इंजिनिअरिंगचा पहिला प्रयोग २००७ साली केला होता. त्याच्या आधी बसपा DS 4 च्या मदतीने राजकारण करत असे. त्यावेळी त्याची घोषणा होती, “ठाकूर, ब्राह्मण, बनिया छोड, बाकी सब हैं डीएस-4” पण २००७ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाने पहिल्यांदा ब्राह्मण समाजाला मोठ्या प्रमाणात तिकीटे दिली. त्यावेळचे त्याचे सोशल इंजिनिअरिंग हिट ठरले.
२००७ या प्रयोगामुळे पक्षाची प्रतिमा बदलली आणि फक्त बहुजनांऐवजी हा सर्वांचा पक्ष म्हणून मान्यता मिळण्यात त्यांना यशही आले. याच निवणुकीत बसपाने पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन केले. मात्र २०१२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचा आलेख झपाट्याने खाली आला. आज यूपीमध्ये केवळ एक आमदार आहे.
मौत के सौदागर ते विषारी साप; पंतप्रधान मोदींवर कॉंग्रेसची ‘एवढ्या’ वेळा आक्षेपार्ह टीका
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मायावतींकडून पुन्हा एकदा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला गेला. निवडणुकीत बसपाच्या निवडणूक प्रचाराची धुरा पक्षाचा ब्राह्मण चेहरा असलेल्या सतीश मिश्रा यांच्याकडे दिली पण अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही. बसपाला केवळ एक जागा जिंकता आली होती.
तेव्हापासून मायावतींनी पक्षातील ब्राह्मण नेत्यांपासून अंतर राखायला सुरुवात केली होती. पक्षातील काही ब्राह्मण नेत्यांना त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला. त्यावेळी मायावती नव्या समीकरणावर काम करत असल्याची चर्चा झाली होती.
सध्या चालू असेलल्या पालिका निवडणुकीमध्ये बसपाकडून खुल्या गटातून फक्त एका उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. ते म्हणजे नवल किशोर नाथानी. त्यांना गोरखपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे, ते बनिया समुदायातून येतात. याशिवाय अनुसूचित जातीसाठी राखीव ठिकाणी दोन दलित चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे.
पण ओबीसींसाठी राखीव असलेल्या चार महापौरपदाच्या जागांवर मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिली आहे. तर महिलांसाठी राखीव असलेल्या तीनपैकी दोन ठिकाणी मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे एकंदरीत मायावती यांच्याकडून नवी समीकरणे जुळवली जात असल्याचं बोललं जात आहे.
त्यामुळे दलित-मुस्लिम युतीचा पक्षाला फायदा होईल, असा दावा बसपा नेत्यांकडून केला जात आहे. तर दलित-मुस्लिम हा प्रयोग समाजवादी पक्षाच्या मुस्लीम-यादव यांच्यापेक्षाही ताकदवान असल्याचं त्यांच मत आहे.
या समीकरणामधून मायावती जुनी सोशल इंजिनिअरिंग सोडून सोडून नव्या रणनीतीवर काम करत असल्याचं दिसतं आहे. यातून मायावती दलित-मुस्लिम युती करण्याच्या प्रयत्नात आहेत. मागच्या काही दिवसात मायावतींनी अनेक मुस्लिम नेत्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. यात नुकतीच हत्या झालेल्या अतिक अहमद यांच्या पत्नी शाइस्ता परवीन यांचाही समावेश आहे. सोशल मीडियावरही त्या मुस्लिमांचे प्रश्न जोरदारपणे मांडताना दिसतात.
मागच्या काही दिवसात त्यांनी मुस्लिम मतदारांना त्यांच्यासोबत येण्यास सांगितले आहे. तर राज्यातील मुस्लिम मतदारही पारंपारिक समाजवादी पक्षावर नाराज असल्याचे मानलं जात आहे. अशा स्थितीत मायावतींना या नाराजीचा फायदा घ्यायचा आहे आणि या माध्यमातून आगामी निवडणूकामध्ये नवं सोशल इंजिनिअरिंग करून त्या निवडणुका जिंकण्याची तयारी करत आहेत.