‘मोदीजी म्हणतात, मी OBC, पण त्यांचाच जात जनगणनेला विरोध’; राहुल गांधीचं टीकास्त्र
Rahul Gandhi On Narendra Modi : मध्य प्रदेशात निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) हे दोन्ही पक्ष आपली पूर्ण ताकद लावून निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सतना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बीटीआय मैदानावरील जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार निशाणा साधला आहे.
World Cup 2023 : श्रीलंकेला मोठा धक्का; ICC कडून सदस्यत्व रद्द…
मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. कॉंग्रेसकडून मोदींच्या आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका होत आहे. आज सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदीजी म्हणतात मी ओबीसी आहे, दोन-तीन त्यांनी सांगितलं की, भारतात एकच जात आहे, ती म्हणजे गरीब. एकीकडे ते म्हणतात माझे नाव नरेंद्र मोदी, मी ओबीसी आहे आणि दुसरीकडे ते म्हणतात भारतात एकच जात आहे आणि ती म्हणजे गरीब…. ते जातींचा वापर केवळ मत मिळण्यासाठी करतात, असं राहुल म्हणाले.
काँग्रेसने जेव्हा जेव्हा देशात जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा मोदींनी कायम त्याला विरोध केला. मध्य प्रदेशात राज्य चालवणाऱ्या ५३ आयएएस अधिकाऱ्यांपैकी फक्त एक ओबीसी आहे. याचा अर्थ राज्याचे एकूण बजेट १०० रुपये असेल तर ओबीसी अधिकारी केवळ ३३ पैसे किंवा ०.०३ टक्कांवर नियंत्रण असेल, असंही राहुल म्हणाले.
आम्ही सत्तेत आल्यास जनगणना करू
राज्यात सत्तेवर आल्यानंतर मध्य प्रदेशातील ओबीसींची नेमकी संख्या जाणून घेण्यासाठी पहिली जात जनगणना केली जाईल. ओबीसी जनगणना क्ष-किरण सारखी आहे. ज्यामुळं इतर मागासवर्गीयांची संख्या निश्चित होईल, त्यानुसार त्यांच्या कल्याणासाठी धोरणे बनवली जातील, असं राहुल गांधी म्हणाले.
पंतप्रधान मोदींचा पेहराव नेहमीच चर्चेचा विषय असतो. ते ज्या भागाला भेट देतात त्या भागाचा पोशाख ते परिधान करतात. कधीकधी ते दिवसाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी वेगवेगळे कपडे देखील घालतात. यावरूनही राहुल यांनी मोदींवर टीकास्त्र डागलं. मोदी दोन कोटींचा सूट घालतात. ते चहावर बोलून पंतप्रधान झाले, पण आता ते चहावर बोलताना दिसत नाहीत. मोदी दिवसातून किमान एक किंवा दोन सूट घालतात. पण तुम्ही त्यांना दोन दिवसातून एक सुट घातलेलं पाहिलं आहे का? असा असा प्रश्न विचारला असता लोकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. राहुल गांधी म्हणाले, मी हा एक पांढरा शर्ट घालतो.
मी फक्त पांढरा टी-शर्ट घालतो, पण मोदी रोज लाखो रुपयांचे नवीन कपडे घालतात, ते करोडो रुपयांच्या विमानातून प्रवास करतात, असा आरोपही त्यांनी केला.
गेल्या 18 वर्षांत राज्यात सुमारे 18 हजार शेतकऱ्यांनी कर्जामुळे आत्महत्या केलं, भाजप सरकारचं धोरण हे शेतकरी विरोधी आहे. नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा करनेने लहान-मध्यम व्यवसाय आणि व्यापाऱ्यांचं शोषण केलं. जीएसटीकडे कर म्हणून पाहीलं जात नाही तर छोटे व्यापारी आणि व्यावसायिकांवर हल्ला म्हणून पाहतात. आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांकडून पैसे घेतात आणि मोठ्या व्यावसायिक व्यक्तींच्या फायद्यासाठी वापरतात, असा आरोपही राहुल गांधीनी केला.