ब्रेकिंग : नगरपंचायत अन् नगरपरिषदेचा निकाल 21 डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टानं मागणी फेटाळली
राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले असून 21 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
नगरपंचायत अन् नगरपरिषदेचा निकाल 21 डिसेंबरलाच लागणार असल्याचे सुप्रीम कोर्टानं सांगितले आहे. 2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरपूर्वी लावण्यात यावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, ही याचिका कोर्टाने फेटाळून लावत नागपूर खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवला आहे. या सुनावणीवेळी कोर्टानं प्रलंबित सर्व निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घ्या असा पुनुरूच्चारही कोर्टाने केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मतदानाच्या काही तासांपूर्वी ज्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये 50 टक्के आरक्षणापेक्षा जास्त आरक्षण आहे या नगरपंचायत आणि नगरपारिषदांसाठी मतदान प्रक्रिया रद्द करत 20 डिसेंबर रोजी त्या ठिकाणी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यातील सर्व नगरपंचायत आणि नगरपरिषदांचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात यावे या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडापीठाने राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात यावे असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. मात्र आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला तत्काळ रद्द करुन मतदान झालेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांचे निकाल जाहीर करण्यात यावे या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु, सुप्रीम कोर्टाने नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे 2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या आणि 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांचा निकाल 21 डिसेंबर रोजीच लागणार आहे यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
नागपूर खंडपीठाच्या निकालावर फडणवीसांची नाराजी
नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशावर बोलताना राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बोलताना नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, जवळपास 25 ते 30 वर्ष त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहत आहे पण असं पहिल्यांदा घडतंय, घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत. त्यांचे निकाल पुढे चाललेल्या आहेत. खंडपीठ स्वायत्त आहे त्यांनी दिलेला निकाल तो सर्वांना मान्य करावे लागले. निवडणूक आयोग देखील स्वायत्त आहे पण यातून जे उमेदवार आहेत, जे मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात, त्या सगळ्यांचा एक प्रकारे भ्रमनिरास झालेला आहे आणि सिस्टीमच्या फेल्युअरमुळे त्यांची काही चूक नसताना अशा पद्धतीने काही गोष्टी होण्याचे योग्य नाहीत. मला वाटतं अजून फार निवडणुका निवडणूक आयोगाला घ्याचे आहेत, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आयोगाने सुधारणा केली पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकामध्ये असं होणार हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत आहे असं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
