Oommen Chandy Death : केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांचे निधन
Oommen Chandy Passes Away : केरळ राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चांडी (Oommen Chandy) यांचे मंगळवारी निधन झाले. केरळ काँग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन आणि चांडी यांच्या नातेवाईनकांनी ही माहिती दिली. के. सुधाकरन यांनी याबाबत ट्विट केले आहे. ओमान चांडी मागील चार वर्षांपासून आजारी होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत ते दिसले होते. सन 2019 मध्ये त्यांच्या गळ्यासंबंधित आजार वाढल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जर्मनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी त्यांचे वय 79 वर्षे होते.
https://twitter.com/SudhakaranINC/status/1681097138560962560
मागील काही महिन्यांपासून त्यांच्यावर बंगळुरुतील दवाखान्यात उपचार सुरू होते. त्यांच्या मुलाने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. चांडी यांनी 2004-2006, 2011-2016 या काळात केरळ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.
सन 1970 पासून त्यांनी राज्यातील पुथुपल्ली या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यांनी सलग 12 वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. त्यांनी मुख्यमंत्री असताना आयोजित केलेल्या जनसंपर्काच्या कार्यक्रमांमुळे लोकांच्या तक्रारी तत्काळ निकाली काढल्या जात होत्या.
के. करुणाकरन आणि माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्या सरकारच्या काळातही त्यांनी काम केले होते. या काळात त्यांनी वित्त, गृह आणि कामगार या खात्यांची जबाबदारी सांभाळली. चांडी यांना 2018 मध्ये काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस करण्यात आले होते. 2006 ते 2011 या काळात त्यांनी केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारीही सांभाळली.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह राज्यसभेच्या 11 जागा बिनविरोध, भाजप बहूमतापासून दूरच