Election Result : सहा राज्यांनी घेतली भाजपाची शाळा; राजधानी दिल्लीची ‘वाट’ही केली अवघड
Lok Sabha Election 2024 : यंदाची लोकसभा निवडणूक भाजपाला धक्का देणारी ठरली. निवडणुकीत अनेक दिग्गजांना जनतेनं आस्मान दाखवला. इंडिया आघाडीनेही भाजपाच्या बालेकिल्ल्यांना जोरदार हादरे दिले. ज्या राज्यांत भाजप क्लीन स्वीप करील त्याच राज्यांनी यंदा भाजपाची फिरकी घेतली. या राज्यांत लोकांनी विरोधी पक्षांना काही प्रमाणात कौल देत भाजप नेत्यांना विचारात टाकलं. यामध्ये उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांचा उल्लेख करावा लागेल. या राज्यांत भाजपाची पिछेहाट झाल्यानं केंद्रातील सत्तेचं गणितही डळमळीत झालं आहे. या राज्यांत भाजपाचं समीकरण कसं बिघडलं याचा थोडक्यात आढावा घेऊ या..
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा येतात. या राज्यात जो जिंकेल तोच दिल्लीत सत्ताधीश होईल असं मानलंं जातं. याआधीच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या जनतेनं भाजपला भरभरुन मतदान केलं. 2019 च्या निवडणुकीत भाजपला तब्बल 62 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळेसही उत्तर प्रदेश पाठिशी राहिल असा अंदाज भाजप नेत्यांचा होता. विरोधी इंडिया आघाडीने मात्र भाजपचे सगळेच मनसुबे धुळीस मिळवले. समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांची जादू चालली आणि भाजपला 31 जागांचा फटका गेली. या राज्यात इंडिया आघाडीचे डावपेच, तिकीट वाटपात घेतलेली खबरादारी, भाजपला फायदा होईल असा प्रचार करणं टाळलं या कारणांमुळे समाजवादी पार्टीने राज्यात 35 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली.
लोकसभा जागांच्य दृष्टीने दुसरं मोठं राज्य महाराष्ट्र. या राज्यातही यंदा वारं फिरलं. येथे प्रत्येक मतदारसंघात भाजपला मोठा संघर्ष करावा लागला. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात भाजपाची मोठी पिछेहाट झाली. मागील निवडणुकीत भाजपचे 23 खासदार निवडून आले होते. आता मात्र दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. मोठ्या मुश्किलीने 9 जागा मिळाल्या आहेत. आगामी राजकारणाच्या दृष्टीने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. येथे भाजपसाठी अनुकूल परिस्थिती नाही याचा अंदाज आधीच आला होता. शेतकऱ्यांचा रोष, कांदा निर्यातबंदीचा निर्णय, फोडाफोडीचं राजकारण, मराठा आरक्षण आंदोलन, मित्र पक्षांना दिलेली वागणूक या कारणांमुळे भाजपाच्या राज्यातील जागा घटल्या अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
दक्षिण भारतात भाजपला सर्वाधिक यश मिळालं ते कर्नाटकात. कर्नाटकाच्या जनतेने मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला कौल दिला होता. यंदा मात्र तशी परिस्थिती दिसली नाही. लोकसभा निवडणुकीआधी राज्यात सत्ताबदल झाला. काँग्रेस सत्तेवर आली. त्यामुळे लोकसभेत भाजपाची परीक्षा राहणार असा अंदाज होता अन् झालंही तसंच. या राज्यात यंदा भाजपला आठ जागांचा फटका बसला. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला 28 पैकी 25 जागा मिळाल्या होत्या. यावेळीही कामगिरी चांगली राहिल असे भाजपला वाटत होते. परंतु, फक्त 17 जागांवर समाधान मानावं लागलं.
हिंदी पट्ट्यातील राज्यात आणि महाराष्ट्रात फटका बसला तर त्याची कसर दक्षिण भारतातील राज्ये आणि पश्चिम बंगालमधून भरून निघेल असा भाजपाचा अंदाज होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निवडणूक निकालाच्या आधी दिलेल्या मुलाखतीत बंगालमध्ये आम्हाला चांगलं यश मिळेल असं म्हटलं होतं. राज्यात निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात मतदान वाढलं होता. मतदानाचा वाढलेला हा टक्का भाजप नेत्यांना आनंदीत करत होता. परंतु, याच वाढलेल्या टक्क्याने भाजपला धक्का दिला. मागील 18 खासदार संख्याही सांंभाळता आली नाही. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या वादळात भाजपला फक्त 12 जागा मिळाल्या. येथेही 6 जागा कमी झाल्या.
बिहारमधील निवडणुकीचं चित्र यंदा वेगळंच होतं. महाआघाडीत काँग्रेस आणि अन्य पक्ष होते मात्र प्रचाराची धुरा तेजस्वी यादवांच्या खांद्यावर होती. तेजस्वींनी धुवाधार प्रचार केला त्यांना काँग्रेसचीही साथ मिळाली. जागावाटपातही योग्य ताळमेळ राहिला. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसून आला. राज्यात सत्तेत असताना जेडीयू नेते नितीशकुमार, लोजपाचे चिराग पासवान यांची साथ असतानाही भाजपला पडझड रोखता आली नाही. राज्यात भाजपला तब्बल 12 जागांचा फटका बसला.