भाजपची लाट नाही, त्सुनामी येणार! राजस्थानात भरपावसात फडणवीसांची जोरदार बॅटिंग

Devendra Fadnavis

Rajasthan Election : देशात लोकसभा आणि काही राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले तसे भाजप नेते कमालीचे अॅक्टिव्ह झाले आहेत. निवडणुका असलेल्या राज्यात या नेत्यांचे दौरे वाढले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) त्यात सहभागी झाले असून भाजप विजयासाठी त्यांनी राजस्थान गाठले आहे. फडणवीस काल (14 सप्टेंबर) राजस्थान (Rajasthan Election) दौऱ्यावर होत. भाजपाच्या  (BJP) परिवर्तन संकल्प यात्रेत त्यांनी राजस्थानातील विविध जिल्ह्यांतील नागरिकांशी संवाद साधला. अजमेरमध्ये जनसभा घेतली. या सभेतच पाऊस आला. सगळ्यांची तारांबळ उडाली. मात्र, त्याही परिस्थितीत फडणवीसांनी आपलं भाषण सुरुच ठेवलं. फडणवीस यांच्या डोक्यावर छत तरी होतं पण, नागरिक मात्र भरपावसात सभा ऐकत होते.

या प्रसंगावरून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची गाजलेली पावसातील सभेची आठवण अनेकांना झाली. त्यानंतर फडणवीसांचीही अशीच सभा झाल्याने त्याचीही चांगलीच चर्चा होत आहे. पवार यांनी सभा घेतली आणि तेथील उमेदवारही निवडून आणला. आता फडणवीसांच्या पावसातील सभेने अजमेरमधील उमेदवार विजयी होईल का याचे उत्तर निकालानंतरच मिळेल.

या सभेत फडणवीस म्हणाले, हे परिवर्तन फक्त मुख्यमंत्र्यांचं नाही तर लोकांच्या जीवनात परिवर्तन आणणारं आहे. ही यात्रा यशस्वी होईल आणि राजस्थानात परिवर्तन होईल. आम्ही अजमेरात आलो. इथं यायला पावणे दोन तास लागले. रस्त्यावर हजारो लोकांनी स्वागत केलं. पावसाची पर्वा न करता लोक स्वागत करत होते. आता लोकांनीच ठरवलं आहे की मोदींचं सरकार बनणार. मोदींचं (PM Modi) इंजिन सरळ आहे पण राजस्थानातील गेहलोत (Ashok Gehlot) सरकारचं इंजिन त्याला मागे खेचत आहे. त्यामुळे आता मोदींच्या इंजिनला राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचं इंजिन जोडायचं आहे असे फडणवीस म्हणाले.

राम मंदिराची सीआरपीएफ सुरक्षा हटविणार ! यूपीच्या खास ‘फोर्स’वर आता जबाबदारी

काँग्रेसच्या (Congress) कुशासनात राजस्थान राज्य भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारात पहिल्या नंबरवर आहे. या राज्यातील जनताही गेहलोत सरकारला कंटाळली आहे. सध्याच्या परिस्थितीत पाहिलं तर राजस्थानात भाजपाची लाट किंवा वादळ नाही तर त्सुनामीच येणार आहे. त्यामुळे आता राजस्थानात डबल इंजिन सरकार बनवण्यापासून भाजपला जगातील कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Tags

follow us