जिथं होतं पंडित नेहरुंचं वास्तव्य तिथूनच त्यांचं नाव काढलं; मोदी सरकारच्या निर्णयाने काँग्रेसचा भडका
Modi Government new decision : केंद्र सरकारने काँग्रेसला झटका देणारा आणखी एक निर्णय घेतला आहे. राजधानी दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युजियम अँड लायब्ररीचे नाव केंद्र सरकारने बदलले आहे. आता या लायब्ररीला प्राइम मिनिस्टर म्युजियम अँड लायब्ररी या नावाने ओळखले जाईल. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, मोदी हे संकुचित वृत्ती आणि सूडबुद्धीचे दुसरे नाव आहे. नेहरू मेमोरियल म्युजियम अँड लायब्ररी सोसायटीच्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत ही बैठक घेण्यात आली.
सन 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सर्व पंतप्रधानांना समर्पित असलेले एक संग्रहालय तीन मूर्ती संकुलात उभारण्याचा विचार व्यक्त केला होता. त्यानंतर एनएमएमएल च्या कार्यकारी परिषदेने 25 नोव्हेंबर 2016 मध्ये याला मंजुरी दिली होती. आता हा प्रकल्प पूर्ण झाला आणि प्रधानमंत्री संग्रहालय 21 एप्रिल 2022 रोजी नागरिकांसाठी खुले करण्यात आले.
संस्थेचे नाव स्वतंत्र भारतात राष्ट्र उभारणीत प्रत्येक पंतप्रधानांचे योगदान दर्शवणारे असावे असे कार्यकारी परिषदेला वाटले. यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत संताप व्यक्त केले. मोदी हे संकुचित वृत्ती आणि सूडबुद्धीचे दुसरे नाव आहे. 59 वर्षांहून अधिक काळ, नेहरू मेमोरिय म्युझियम आणि लायब्ररी हे ऐतिहासिक स्थळ आणि पुस्तकांचा खजिना आहे. आता याला प्रधानमंत्री म्युजियम आणि सोसायटी म्हटले जाईल. स्वतःच्या असुरक्षिततेच्या ओझ्याखाली दबलेला एक छोटा माणूस स्वयंघोषित विश्वगुरू म्हणून फिरत असतो, अशी टीका त्यांनी केली.
कर्नाटक सरकारचा भाजप-आरएसएसला झटका
काँग्रेसने कर्नाटकात सत्तेत आल्यानंतर भाजपवर पहिला वार केला आहे. कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने गुरुवारी (15 जून) अनेक मोठे निर्णय घेतले. यात भाजप सरकारच्या काळात आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. एवढेच नव्हे तर, के.बी.हेडगेवार यांच्याशी संबंधित धडा कर्नाटकातील शाळांच्या अभ्यासक्रमातून वगळण्याच्या निर्णयालाही मान्यता देण्यात आली. हे देन्ही निर्णय एकप्रकारे भाजपासाठी काँग्रेसकडून करण्यात आलेले वारच आहेत.
काय आहे इतिहास?
पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान झाल्यानंतर तीन मूर्ती कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास होते. पुढील 16 वर्षे पंडित नेहरू तिथेच वास्तव्यास होते. याआधी हे निवासस्थान भारताच्या कमांडर इन चीफचे होते. 27 मे 1964 रोजी नेहरूंचं निधन झाल्यानंतर तत्कालीन सरकारने हे निवासस्थान पंडित नेहरूंनाच समर्पित करून त्याठिकाणी ग्रंथालय आणि संग्रहालय सुरू केलं. त्यानंतर 14 नोव्हेंबर 1964 रोजी तत्कालीन राष्ट्रपती एस. राधाकृष्णन यांनी तीन मूर्ती हे निवासस्थान देशाला समर्पित केलं आणि तिथे नेहरूंच्या संग्रहालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर दोन वर्षांनंतर 1966 साली त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी एनएमएमएल अर्थात नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीची स्थापना करण्यात आली.