फुफ्फुसाच्या कॅन्सरवर आता फक्त 7 मिनिटांत उपचार! भारतात लॉन्च झालं नवं इम्युनोथेरपी इंजेक्शन
या नव्या इम्युनोथेरपी इंजेक्शनमुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या रुग्णांना उपचारासाठी तासनतास हॉस्पिटलमध्ये बसून राहावं लागणार नाही.
New immunotherapy injection launched in India : कॅन्सर… हे नाव जरी ऐकलं तरी अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. उपचारांसाठी मोठा खर्च, सतत हॉस्पिटलच्या फेऱ्या, शारीरिक त्रास आणि मानसिक ताण, या सगळ्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांवर मोठं ओझं येतं. पण आता भारतात कॅन्सर उपचार क्षेत्रात एक मोठी आणि महत्वाची प्रगती झाली आहे. फुफ्फुसाच्या कॅन्सरवर आता अवघ्या 7 मिनिटांत उपचार देता येणार आहेत. हो, फक्त सात मिनिटं. रोच फार्म इंडिया या कंपनीने त्यांच्या टेंसेंट्रिक या इम्युनोथेरपी औषधाचं नवीन इंजेक्शन भारतात लॉन्च केलं आहे. या नव्या इंजेक्शनमुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरच्या रुग्णांना उपचारासाठी तासनतास हॉस्पिटलमध्ह्ये बसून राहावं लागणार नाही.
आतापर्यंत हे औषध आयव्ही इन्फ्युजन म्हणजे सलाईनमधून दिलं जायचं. उपचार सुरू असताना रुग्णांना अनेक तास बेडवर किंवा खुर्चीवर बसून राहावं लागायचं. काही वेळा तर पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्ये जात असे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, अशक्त रुग्ण किंवा दूरच्या गावातून उपचारासाठी येणाऱ्या लोकांसाठी ही प्रक्रिया खूप थकवणारी ठरायची. पण आता हे नवीन इंजेक्शन थेट त्वचेखाली दिलं जाणार आहे, आणि तेही अवघ्या सात मिनिटांत. त्यामुळे रुग्णांचा वेळ वाचणार आहे, थकवा कमी होणार आहे आणि उपचार अधिक सोपे होणार आहेत.
ही उपचारपद्धती खासकरून नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सरसाठी वापरली जाणार आहे. भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये हा प्रकार सर्वाधिक आढळतो. आता प्रश्न पडतो, हे इंजेक्शन नेमकं काम कसं करतं? तर सध्या भाषेत सांगायचं झालं तर, आपल्या शरीरात रोगांशी लढण्यासाठी एक नैसर्गिक संरक्षण यंत्रणा असते. तिला आपण रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी म्हणतो. पण कॅन्सरच्या पेशी खूप हुशार असतात. त्या शरीराच्या इम्युनीटीपासून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे शरीराला त्या पेशी ओळखता येत नाहीत.
पुण्यातील दगडूशेठ गणपतीला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; धार्मिक पर्यटनाला चालना, परिसराच्या विकासाला मिळणार गती
टेंसेंट्रिक हे औषध शरीराला त्या कॅन्सर पेशी ओळखायला मदत करतं. हे औषध पीडी-एल वन नावाच्या प्रोटीनला ब्लॉक करतं. हेच प्रोटीन वापरून कॅन्सर पेशी शरीराच्या इम्यून सिस्टमपासून लपतात. जेव्हा हे प्रोटीन ब्लॉक होतं, तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होते आणि कॅन्सर पेशींवर हल्ला सुरू करते. म्हणजेच, ही थेरपी थेट कॅन्सरवर हल्ला करत नाही, तर शरीरालाच कँसरविरोधात लढायला मजबूत बनवते.
यामुळे अनेक रुग्णांमध्ये चांगले परिणाम दिसून आले आहेत. काही डॉक्टरांच्या मते, पारंपरिक केमोथेरपीच्या तुलनेत इम्युनोथेरपीचे दुष्परिणाम देखील कमी असू शकतात. मात्र प्रत्येक रुग्णांसाठी ही थेरपी उपयोगी असेलच असं नाही. डॉक्टर आधी काही टेस्ट करतात. विशेषतः शरीराच्या पीडी-एल वन प्रोटीनचे प्रमाण किती आहे, हे तपासलं जातं. ज्या रुग्णांमध्ये हे प्रमाण जास्त असतं, त्यांच्यावर हा उपचार अधिक प्रभावी ठरू शकतो. डॉक्टरांच्या मते, फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या जवळपास निम्म्या रुग्णांना या उपचाराचा फायदा होऊ शकतो.
या नव्या इंजेक्शनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रुग्णांचा हॉस्पिटलमध्ये जाणारा वेळ कमी होणार आहे. आधी एका उपचारासाठी तासनतास हॉस्पिटलमध्ये बसावं लागायचं. आता फक्त सात मिनिटांत उपचार होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना वारंवार होणार प्रवास, लांब प्रतीक्षा आणि थकवा कमी होऊ शकतो. विशेषतः ग्रामीण भागातून शहरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी ही दिलासादायक गोष्ट मानली जात जातेय. कारण अनेक वेळा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी पूर्ण दिवस खर्च करावा लागतो. प्रवासाचा खर्च वेगळा, राहण्याचा खर्च वेगळा आणि मानसिक ताण तर असतोच.
३ मे रोजी परीक्षा, पण २७ एप्रिललाच खेळ झाला होता; वाघमारेकडून CBI च्या हाती लागला मोठा पुरावा?
यामुळे हॉस्पिटलमधील गर्दी कमी होण्यास देखील मदत होऊ शकते. कारण कॅन्सर विभागांमध्ये अनेकदा रुग्णांची मोठी संख्या असते. उपचारासाठी बेड्स आणि इंज्युजन चेअर्स मर्यादित असतात. अशा परिस्थितीत सात मिनिटांचं इंजेक्शन ही मोठी सुविधा ठरू शकते. मात्र या सगळ्यात एक मोठा प्रश्न समोर आलाय, आणि तो म्हणजे या उपचाराची किंमत. या इंजेक्शनच्या एका डोसची किंमत जवळपास 3 लाख 70 हजार रुपये असून काही रुग्णांना असे अनेक डोस घ्यावे लागू शकतात. म्हणजेच एकूण उपचाराचा खर्च सहज लाखोंमध्ये जाऊ शकतो.
भारतात आधीच कॅन्सर उपचार खूप महाग मानले जातात. अनेक कुटूंब उपचारासाठी कर्ज काढतात, बचत खर्च करतात किंवा मालमत्ता विकतात. अशा परिस्थितीत हा आधुनिक उपचार अनेकांसाठी आशेचा किरण असला, तरी तो सर्वसामान्यांना परवडणं हे मोठं आव्हान ठरणार आहे. रुग्णांना काही प्रमाणात मदत मिळावी म्हणून रोच फार्मा इंडियाने ब्लु टी नावाचा सपोर्ट प्रोग्रॅम सुरू केला आहे. तसेच हे औषध केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत म्हणजेच CGHS मध्ये देखील समाविष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे काही पात्र रुग्णांना आर्थिक मदत किंवा परतावा मिळू शकतो.
डिझेल दरवाढीमुळं एसटीच्या तिकीटाचे दर वाढणार?, मंत्री प्रताप सरनाई काय म्हणाले?
पण डॉटर आणि आरोग्य तज्ज्ञांचं स्पष्ट मत आहे की, अशा आधुनिक उपचारपद्धती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार, विमा कंपन्या आणि आरोग्य यंत्रणांनी अधिक मोठ्या प्रमाणावर मदत करण्याची गरज आहे. कारण उपचार फक्त आधुनिक असून उपयोग नाही, ते सामान्य माणसाला परवडणारे देखील असायला हवेत.
तरी देखील या सात मिनिटांच्या इंजेक्शनकडे भारतातील कॅन्सर उपचार क्षेत्रातील एक मोठं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे. वेगवान उपचार, कमी हॉस्पिटल वेळ, अधिक आराम आणि आधुनिक तंत्रज्ञान यामुळे भविष्यात अनेक रुग्णांचा आयुष्य बदलू शकतं. आणि कदाचित, येत्या काही वर्षांत अशा उपचारपद्धती अधिक स्वस्त आणि सहज उपलब्ध देखील होतील.