‘Bagless Safe Saturday’चे ‘Backless Safe Saturday’; बिहार शिक्षण विभागाच्या अधिकृत परिपत्रकामुळे उडाली खिल्ली

बॅगलेस सेफ सॅटरडे उपक्रमाचा उल्लेख करताना विभागाकडून झालेल्या एका शुद्धलेखनच्या चुकीमुळे मोठी नामुष्की ओढवली आहे.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 07 27T131857.671

Official circular from the Bihar Education Department sparks ridicule : बिहारच्या शिक्षण विभागाचा एक अधिकृत आदेश सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. विद्यार्थ्यांमध्ये अनुभवाधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या बॅगलेस सेफ सॅटरडे उपक्रमाचा उल्लेख करताना विभागाकडून झालेल्या एका शुद्धलेखनच्या चुकीमुळे मोठी नामुष्की ओढवली आहे. अधिकृत परिपत्रकात Bagless या शब्दाऐवजी चुकून Backless असा शब्द वापरण्यात आल्याने Bagless Safe Saturday चे रूपांतर Backless Safe Saturday मध्ये झाले. ही चूक समोर येताच सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असून शिक्षण विभागाच्या कामकाजावर टीका होत आहे.

हा प्रकार जनता दलाचे विधान परिषदेचे सदस्य संजीव कुमार सिंह यांनी बिहार विधान परिषदेत उपस्थित केला. राज्यातील शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी सभागृहात या परिपत्रकाचा उल्लेख केला. ज्या विभागाला स्वतःच्या अधिकृत आदेशातील शुद्धलेखनाची चूक लक्षात येत नाही, तो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता कशी उंचावणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात देखील या विषयावर चर्चा रंगली.

विशेष म्हणजे, बॅगलेस सेफ सॅटरडे हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना पारंपरिक पुस्तकाधारित शिक्षणाच्या चौकटीबाहेर नेण्याचा प्रयत्न करतो. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना काही काळ दप्तराच्या ओझ्यातून मुक्त ठेऊन प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी दिली जाते. विज्ञान प्रयोग, कला-कौशल्ये, स्थानिक उद्योगांची माहिती, शेतीविषयक उपक्रम, पर्यावरण संवर्धन, क्रीडा आणि सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण अधिक रंजक आणि व्यवहार्य बनवण्याचा या योजनेचा उद्देश आहे. मात्र, या महत्वाच्या उपक्रमाचीच चर्चा आता त्याच्या उद्दीष्टांपैकी परिपत्रकातील चुकीमुळे अधिक होत आहे.

सत्तेतील आमदार असलात तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करा; विखेंचा आमदार लंघेंना सल्ला

दरम्यान, बिहार शिक्षण विभाग अशा प्रकारच्या चुका झाल्यामुळे यापूर्वी देखील अनेकदा चर्चेत आला आहे. 2024 मध्ये जमुई जिल्हा शिक्षण कार्यालयाने काढलेल्या एका आदेशात 16 कर्मचाऱ्यांच्या एका दिवसाच्या वेतनकपातीचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांची Bad Performanceम्हणजेच खराब कामगिरी ही कारण नमूद करण्याऐवजी आदेशात चुकून Bed Performance असा उल्लेख करण्यात आला. हा शब्दप्रयोग सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्याची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडाली. अखेर शिक्षण विभागाला स्वतंत्र स्पष्टीकरण जारी करून ती चूक दुरुस्त करावी लागली.

याशिवाय, त्याच वर्षी बिहार शिक्षण विभाग आणखी एका प्रशासकीय गोंधळामुळे अडचणीत आला होता. ई-शिक्षा कोष या डिजिटल पोर्टलवर एका पुरुष शिक्षकाला चुकून प्रसूती रजा मंजूर झाल्याचे उघड झाले होते. या प्रकारामुळेच विभागाच्या तंत्रज्ञान व्यवस्थापनावर आणि पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

शिक्षण क्षेत्राशी संबंधित अधिकृत आदेश, परिपत्रके आणि धोरणात्मक सूचना यामध्ये अचूकता आणि विश्वासार्हता अत्यंत महत्वाची मानली जाते. कारण अशा दस्तऐवजांच्या आधारेच लाखो विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्था निर्णय घेत असतात. त्यामुळे अशा साध्या वाटणाऱ्या चुका प्रशासनाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवतात, असे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावरही या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून अनेकांनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर काहींनी ही बाब गंभीर असल्याचे सांगत अधिकृत दस्तऐवजांचीतपासणी आणि गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त केली आहे. दरम्यान, बिहार शिक्षण विभागाकडून या परिपत्रकाबाबत अधिकृत स्पष्टीकरण येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र ‘बॅगलेस’चा ‘बॅकलेस’ झाल्याने शिक्षण विभाग पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

follow us