‘हिडन चार्जेस’मुळे भारतीयांचे 28 हजार कोटी गेले; ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांना घाम फोडणारा रिपोर्ट
Online Shopping कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, किराणा, प्रवासाची तिकिटे किंवा हॉटेल बुकिंग... सर्व काही आता एका क्लिकवर उपलब्ध आहे पण...
Online Shopping Rs 28000 Cr Loss In India Due To Hidden Charges : मोठमोठे डिस्काउंट, आकर्षक ऑफर्स, ‘फक्त आजच’ मिळणाऱ्या डील्स आणि एका क्लिकवर होणारी खरेदी… ऑनलाइन शॉपिंगने ग्राहकांचे आयुष्य नक्कीच सोपे केले आहे. मात्र, या सोयीच्या पडद्यामागे ग्राहकांच्या खिशावर मोठा डल्ला मारला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एका नव्या अहवालानुसार, ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर वापरल्या जाणाऱ्या ‘डार्क पॅटर्न्स’मुळे भारतीय ग्राहकांना दरवर्षी तब्बल 25 हजार ते 28 हजार कोटी रुपयांचा फटका बसत आहे. विशेष म्हणजे, देशातील जवळपास 88 टक्के ऑनलाइन ग्राहक या प्रकाराला बळी पडत असल्याचे समोर आले आहे.
नेमकं कसे होते ग्राहकांचं नुकसान?
आपण एखादी वस्तू खरेदीसाठी कार्टमध्ये टाकतो, किंमत पाहून खरेदीचा निर्णय घेतो; पण पेमेंटच्या अंतिम टप्प्यावर अचानक प्रोसेसिंग फी, प्लॅटफॉर्म फी, डिलिव्हरी चार्ज, प्रोटेक्शन फी किंवा इतर काही शुल्क जोडले जाते. ग्राहकाला खरेदी रद्द करणे अवघड जावे, यासाठी अनेकदा अशा शुल्कांची माहिती शेवटच्या क्षणापर्यंत लपवून ठेवली जाते. यालाच तज्ज्ञांच्या भाषेत ‘डार्क पॅटर्न’ म्हटले जाते. ग्राहकांच्या मानसशास्त्राचा वापर करून त्यांच्याकडून अधिक खर्च करून घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या युक्त्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
‘डार्क पॅटर्न्स’ म्हणजे नेमकं काय?
मार्केट रिसर्च संस्था Datum Intelligence च्या अहवालानुसार, ऑनलाइन कंपन्या ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे वसूल करण्यासाठी विविध भ्रामक तंत्रांचा वापर करतात. यात हिडन चार्जेस, बनावट मर्यादित कालावधीच्या ऑफर्स, नकळत सुरू होणाऱ्या सबस्क्रिप्शन सेवा, जबरदस्तीचे अॅड-ऑन्स आणि खरेदीदरम्यान निर्माण केला जाणारा कृत्रिम तातडीचा दबाव यांचा समावेश होतो. अनेकदा ग्राहकांना वाटते की ते मोठी बचत करत आहेत; मात्र प्रत्यक्षात ते आवश्यकतेपेक्षा अधिक पैसे खर्च करत असतात.
दर महिन्याला ग्राहकांच्या खिशातून जात आहेत अतिरिक्त पैसे
अहवालानुसार, देशातील सुमारे 30.4 कोटी ऑनलाइन खरेदीदारांपैकी बहुसंख्य ग्राहकांना दरमहा सरासरी 78 ते 87 रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहेत. ही रक्कम वैयक्तिक स्तरावर कमी वाटू शकते; मात्र देशभरातील ग्राहकांचा विचार करता त्याचे रूपांतर हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक फटक्यात होते.
चेकआऊटच्या वेळीच बसतो सर्वात मोठा धक्का
खरेदी पूर्ण करण्याच्या शेवटच्या टप्प्यावर त्यांना अनपेक्षित शुल्कांचा सामना करावा लागत असल्याची उघड कबुली सर्वेक्षणातील 63 टक्के ग्राहकांनी दिली आहे. चिंतेची बाब म्हणजे 2024 मध्ये हा आकडा 52 टक्के होता. म्हणजेच ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे वसूल करण्याच्या या पद्धती अधिक आक्रमक होत असल्याचे चित्र आहे.
कोणत्या प्लॅटफॉर्म्सबाबत व्यक्त झाली चिंता?
अभ्यासात ई-कॉमर्स, क्विक-कॉमर्स आणि ऑनलाइन ट्रॅव्हल क्षेत्रातील प्रमुख प्लॅटफॉर्म्सचा समावेश करण्यात आला होता. काही प्लॅटफॉर्म्स ग्राहकांच्या विश्वासाच्या बाबतीत पुढे असल्याचे दिसून आले, तर काहींबाबत ग्राहकांनी अधिक अविश्वास व्यक्त केला.
माहिती असूनही ग्राहक फसगत
अहवालातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 81 टक्के ग्राहकांना ‘डार्क पॅटर्न्स’ म्हणजे काय याची माहिती आहे. तरीही 85 टक्के लोकांनी आपण कधीतरी अशा भ्रामक ऑफर्स किंवा शुल्कांच्या जाळ्यात अडकलो असल्याचे मान्य केले आहे. अहवालातील सकारात्मक बाब म्हणजे ग्राहकांचा दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 74 टक्के लोकांनी स्पष्टपणे सांगितले की, पारदर्शक आणि प्रामाणिक सेवा देणाऱ्या प्लॅटफॉर्मसाठी ते जास्त पैसे देण्यासही तयार असल्याचे सांगितले. यावरून ग्राहकांना आता फक्त स्वस्त ऑफर नको आहेत, तर विश्वासार्ह आणि स्पष्ट व्यवहारही तितकेच महत्त्वाचे वाटत आहेत.
त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करताना आकर्षक ऑफर, मोठी सूट किंवा ‘फक्त आजच’ अशा शाब्दिक भूलथापांना बळी पडण्यापूर्वी ‘पेमेंट’ चं बटण दाबण्यापूर्वी एकदा ‘बिलाची’ नीट तपासणी नक्की करा. कारण आता अतिरिक्त शुल्कांबाबत जागरूक होणे गरजेचे झाले आहे. अन्यथा, नकळत तुमच्याही खिशाला मोठा फटका बसू शकतो.