लोकांचे जीवन सुधारण्यासाठी केंद्र सरकार तुमच्यासोबत; मोदींच्या मुख्यमंत्री विजय यांना शुभेच्छा

विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

News Photo   2026 05 10T151617.990

अभिनेता जोसेफ विजय यांनी आज तामिळनाडूचे (CM) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अखेर पाच दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर आज तमिळनाडूत शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय यांना गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी 9 मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी उपस्थित होते.

विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी काय म्हणाले, विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. विजय यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा आहेत. लोकांचे जीवन सुधारण्यासाठी केंद्र सरकार तामिळनाडू सरकारसोबत काम करत राहील, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

जोसेफ विजयने सीएमओ कार्यालयात जाऊन पदभारही स्वीकारला तामिळनाडूत विजय यांच्या टीव्हीके पक्षाला तब्बल 107 जागा मिळाल्या. मात्र, सत्तास्थापनेसाठी आणखी 11 आमदारांची जुळवाजुळव करण्यात त्यांच्या नाकीनऊ आले होते. सुरुवातीलाच काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला. मात्र आणखी 6 आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी टीव्हीकेला 3 दिवस लागले.

काल संध्याकाळपर्यंत त्यांच्या आमदारांची संख्या 116 पर्यंत पोहोचली. तरीही दोन आमदारांचं संख्याबळ कमी असल्यानं सत्तास्थापनेचा पेच सुटला नव्हता. अखेर व्हीसीकेच्या दोन आणि इंडियन युनियन मुस्लीम लीगच्या दोघांनी टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने टीव्हीकेचं संख्याबळ 120 वर पोहोचलं आणि सत्तास्थापनेचा तिढा सुटला. चेन्नई येथील नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये शपथविधी पार पडल्यानंतर लगेचच, विजय यांनी तीन महत्त्वाच्या फाईल्सवर स्वाक्षरी केली.

या स्वाक्षऱ्यांद्वारे, घरगुती ग्राहकांना 200 युनिट्सपर्यंत मोफत वीज पुरवण्यास आणि महिलांच्या सुरक्षेसाठी समर्पित एका विशेष दलाची स्थापना करण्यास विजय यांनी मंजुरी दिली. दरमहा, 200 युनिट्स मोफत वीज, प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थविरोधी पथकाची स्थापना, महिला सुरक्षा दलाची स्थापना हे निर्णय त्यांनी घेतले.

तामिळनाडूतील पक्षीय बलाबल – एकूण 234

TVK (विजय) – 108
DMK – 59
AIADMK – 47
काँग्रेस – 5
PMK – 4
मुस्लिम लिग – 2
कम्युनिस्ट पक्ष – 2
VCK – 2
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी – 2

follow us