पंतप्रधान मोदींच्या नव्या जॅकेटची जोरदार चर्चा, नेमकं कारण काय?
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आपल्या कपड्यांवरुन कायमच चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा मोदींनी घातलेल्या निळ्या रंगाच्या जॅकेटमुळं (Blue Jacket)ते चर्चेत आले आहेत. त्याचं कारणही तसंच आहे, हे जॅकेट कापडाचं नसून रिसायकल केलेल्या प्लास्टिकच्या बाटलीपासून (Recycle Plastic Bottle)तयार केलेलं आहे.
आज बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडण्यासाठी पंतप्रधान मोदी संसदेत पोहोचले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी फिक्कट निळ्या रंगाचं जॅकेट घातलेले दिसून आले. मोदींनी घातलेले जॅकेट प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून तयार केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) ने बेंगळुरूमधील इंडिया एनर्जी वीकमध्ये पंतप्रधान मोदींना हे जॅकेट भेट म्हणून दिलं आहे. या जॅकेटची किरकोळ बाजारात किंमत 2 हजार रुपये आहे.
सिंगल यूज प्लॅस्टिक बंद करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, पेट्रोल पंप आणि एलपीजी एजन्सींवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी असा गणवेश बनवण्याची कंपनीची योजना आहे. त्याला अनबॉटल इनिशिएटिव्ह असं नाव देण्यात आलंय. एका ड्रेससाठी एकूण 28 बाटल्यांचा पुनर्वापर केला जात असल्याची माहिती आहे. कंपनीनं दरवर्षी 100 दशलक्ष पीईटी बाटल्यांचा पुनर्वापर करण्याची योजना आखल्याची माहिती आहे.
Sanjay Raut यांना बेळगाव कोर्टाचा दिलासा ! अटकपूर्व जामीन मंजूर
अशा प्रकारे बाटल्यांच्या पुनर्वापरामुळं पर्यावरणाचं रक्षण होण्यास मदत होणारंय. सोबतच पाण्याचीही मोठ्या प्रमाणात बचत होणारंय. कॉटनला रंग देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो. तर पॉलिस्टरला डोप डाईंग केलं जातं. त्यात पाण्याचा थेंबही वापरला जात नाही. पीईटी बाटल्यांचा वापर करून सशस्त्र दलांसाठी नॉन-कॉम्बॅट युनिफॉर्म बनवण्याची आयओसीची योजना आहे.