मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त ठरला! PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा
मुंबई : ओडिसातील रेल्वे अपघातामुळे ब्रेक लागलेल्या मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पणासाठी अखेर नवीन मुहूर्त मिळाला आहे. येत्या 26 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई-गोवासह 5 मार्गांवरील वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. यापूर्वी देशातील जवळपास 17 मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावत आहेत. यात आता मुंबई-गोवा, बेंगळुरू-हुबळी, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर आणि भोपाळ-जबलपूर या 5 मार्गांवरुनही वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. एकाच दिवशी पाच वंदे भारत गाड्या सुरू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.याशिवाय पुरी-हावडा मार्गावरही लवकरच वंदे भारत ट्रेन लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. (Prime Minister Narendra Modi will flag off the Vande Bharat train on 5 routes including Mumbai-Goa on June 26)
या मार्गांवर धावतील वंदे भारत एक्सप्रेस :
मुंबई – गोवा :
गोव्यासाठी पहिली आणि मुंबईतील चौथी वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटणार आहे. शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस ही ट्रेन धावणार आहे. ट्रायल रन दरम्यान, सुमारे 7 तासात 586 किमी अंतर वंदे भारत ट्रेनने कापले होते. दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम या सात स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. सीएसएमटीहून सकाळी 5.25 वाजता सुटून दुपारी सव्वा एकला मडगावला पोहोचणार आहे.
बेंगळुरू-हुबळी-धारवाड :
बेंगळुरू आणि हुबळी-धारवाड दरम्यान आता वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. कर्नाटकसाठी ही दुसरी वंदे भारत ट्रेन असणार आहे. पहिली ट्रेन चेन्नई, बेंगळुरू आणि म्हैसूर दरम्यान धावत आहे. बेंगळुरू आणि हुबळी-धारवाड दरम्यान सेमी-हाय स्पीड ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव मागील अनेक दिवसांपासून विचारधीन होता. परंतु डाउनलाइनच्या विद्युतीकरणामुळे यासाठी विलंब झाला. केंद्रीय संसदीय कार्य मंत्री आणि धारवाडचे खासदार प्रल्हाद जोशी यांनी 31 मे रोजी अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन वंदे भारत ट्रेन सुरू करण्याबाबत चर्चा केली होती.
पाटणा – रांची :
भारतीय रेल्वेने सोमवारी बिहार आणि रांचीच्या पहिल्या सेमी-हाय स्पीड ट्रेनची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. पाटणा जंक्शनपासून सकाळी 06:55 वाजता निघालेली वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 01:00 वाजता रांचीमध्ये पोहचण्याची अपेक्षा आहे. रांचीमधील दक्षिण पूर्व रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ही ट्रेन तातिसिलवाई, मेरसा मार्गे शांकी बरकाकाना, हजारीबाग, कोडरमा, गया अशा स्थानकांवर थांबेल.
भोपाळ – इंदूर :
मध्य प्रदेश भारतीय जनता पार्टी (भाजप) अध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी भोपाळ आणि इंदूरला जोडणाऱ्या सेमी-हाय स्पीड ट्रेनला राणी कमलापती रेल्वे स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवतील. मध्य प्रदेशची दुसरी सेमी-हाय स्पीड दोन शहरांदरम्यान 130 किमी प्रतितास वेगाने धावणार आहे.
भोपाळ – जबलपूर :
पंतप्रधान मोदी राणी कमलापती रेल्वे स्टेशनवरून भोपाळ-जबलपूर या वंदे भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखविणार आहेत. मध्य प्रदेशची ही तिसरी सेमी-हाय स्पीड ट्रेन दोन शहरांदरम्यान 130 किमी प्रतितास वेगाने धावेल. खजुराहोचे खासदार व्हीडी शर्मा म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर ते देशभरातील 10 लाख बूथवरील भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. मध्य प्रदेशमध्ये यंदा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.