पडद्यामागे काय घडतंय?, उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याआधीच ‘या’ नेत्याने घेतली पंतप्रधान मोदींच्या भेट

पडद्यामागे काय घडतंय?, उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याआधीच ‘या’ नेत्याने घेतली पंतप्रधान मोदींच्या भेट

Uddhav Thackeray visit to Delhi : राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. (Thackeray) महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी घडलेल्या घडामोडी पाहता त्याची प्रचिती समस्त मतदारांना आलेली आहे. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. एकूण तीन दिवस ते दिल्लीत असतील.

आपल्या या दौऱ्यादरम्यान ते खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहेत. तसेच अन्य काही महत्त्वाची कामे ते दिल्लीत करणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते खासदार राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या डिनरला उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीतही ते सहभागी होणार आहेत. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याआधीच समोर महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर येत आहेत. उद्धव ठाकरे दिल्लीला जाण्याआधीच त्यांच्या पक्षाच्या एका खासदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याआधी त्यांच्याच पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यांनी सोमवारीच (4 ऑगस्ट) मोदींची ही भेट घेतली. या भेटीचे फोटोही समोर आले आहेत. ही भेट आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. तर प्रियांका चतुर्वेदी यांनी ही भेट सहज होती. त्या भेटीमागचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणूक, ठाकरेंना टक्कर देण्यासाठी महायुतीचा ;प्लॅन बी; तयार; जाणून घ्या सर्वकाही

राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असताना प्रियांका चतुर्वेदी यांनी मोदींच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीत येणार आहेत. याआधी माझी नरेंद्र मोदी यांच्याशी सहज भेट झाली. त्या भेटीत महाराष्ट्रावर कोणतीही चर्चा झालेली नाही. तसेच माझी भेट राजकारणाशी संबंधित नव्हती, असं स्पष्टीकरण प्रियांका चतुर्वेदी यांनी दिलंय.

दरम्यान, येत्या 6 ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे दिल्लीच्या विमानतळावर उतरतील. त्यानंतर ते संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचणार आहेत. 6 ऑगस्ट रोजीच्याच संध्याकाळी उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते 6 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक घेणार आहेत. 7 ऑगस्ट रोजी खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ते पत्रकार परिषद घेतील.

त्यानंतर सकाळी 11 वाजता संसदेतील पक्ष कार्यालयाला भेट देतील. दुपारी ते राजकीय गाठीभेटी घेतील. 7 ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या डिनर आणि इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतील. त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत नेमकं काय काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या