राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?

राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकी काय चर्चा झाली?

राज्यातील राजकीय गोंधळ आता दिल्लीत जाऊन पोहोचला. राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) आज दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत बंडखोर नेत्यांवर कारवाई करण्यात आली. सर्वांत महत्वाचं म्हणजे, या बैठकीत सर्व नेत्यांनी शरद पवार हेच आमचे प्रमुख नेते आहेत, असा ठराव घेतला. ही बैठक आटोपताच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पवार यांच्या दिल्लीतील ‘6 जनपथ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ( Rahul Gandhi Meets Sharad Pawar Sonia Duhan said what was discussed in the pawar gandhi meeting)

शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या युवक कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान यांनी माध्यमांशी संवाद साधला. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे त्यांनी सांगितले. सोनिया दुहान म्हणाल्या की, राहुल गांधींनी शरद पवारांना 100 टक्के पाठिंबा असल्याचं सांगितलं. या कठीण काळात संपूर्ण काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे. तसेच सर्व विरोधी पक्ष तुमच्यासोबत असतील, असं राहुल गांधींनी सांगितल्याचं दुहान म्हणाल्या.

पवार-गांधी भेटीत काय चर्चा झाली, असं पत्रकारांनी विचारले असता सोनिया दुहान म्हणाल्या, देशातील सद्यस्थितीत ईडी (अंमलबजावणी संचालनालय), सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग), आयटी (आयकर विभाग) यांचा धाक दाखवून आणि पैशाचं आमिष दाखवून पक्ष फोडले जात आहेत. आमदार, खासदार फोडले जात आहेत. हे वाईट राजकारण सुरू आहे. त्याविरोधात आक्रमक होण्याची गरज आहे. देशातील सध्याची राजकीय परिस्थिती लोकशाहीसाठी चांगली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत असताना संकटात काँग्रेस पक्ष तुमच्यासोबत आहे, अशी चर्चा राहुल गांधी-शऱद पवार बैठकीत झाल्याचं दुहान यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली आहे. त्यांच्यासोबत 40 आमदार असल्याचा दावा केला जातो. शरद पवार यांच्या पक्षावर आलेल्या या संकटाच्या वेळी काँग्रेस त्यांच्यासोबत आहे, अशी राहुल गांधींची भूमिका आहे. अजित पवारांच्या शपथविधीच्या दिवशी राहुल गांधींनी शरद पवारांनाही फोन केला. त्यानंतर आज त्यांनी शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube