मोदी सरकार लवकरच कोसळणार; राहुल गांधींचा खळबळजनक दावा, कारणही सांगितलं

बदलती परिस्थिती आणि जनतेचा वाढता असंतोष हे भारतीय राजकारणावर परिणाम करतील, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Modi Rahul Gandhi

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत मोठं राजकीय विधान केलं आहे. पुढील वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार कोसळेल असा मोठा दावा त्यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील देशाची आर्थिक परिस्थिती आणि देशातील वाढता असंतोष हे यासाठी कारणीभूत असतील, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

बदलती परिस्थिती आणि जनतेचा वाढता असंतोष हे भारतीय राजकारणावर परिणाम करतील, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. या बैठकीदरम्यान काही नेत्यांनी ‘मुस्लीम’ऐवजी ‘अल्पसंख्याक’ हा शब्द वापरण्याचा आग्रह धरला. तेव्हा राहुल गांधींनी याला विरोध केला आणि म्हणाले की, घाबरण्याची गरज नाही. अन्यायाला सामोरं जाणाऱ्या कोणत्याही समजाला उघडपणे आपण पाठिंबा दिला पाहिजे. हिंदू, दलित, उच्चवर्णी, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन किंवा बौद्ध किंवा जैन असं कुणीही असो. काँग्रेसने सर्वांच्या हक्कांसाठी नेहमीच आवाज उठवला पाहिजे, असं राहुल गांधींनी नमूद केलं आहे.

पंतप्रधान मोदी अन् गृहमंत्री अमित शाह गद्दार; राहुल गांधी यांची आक्रमक टीका

काँग्रेस नेते इम्रान मसूद या सभेत म्हणाले, मुस्लीम समाज फक्त भाजपला पराभूत करण्यासाठीच मतदान करतो, हा समज पक्षाने बदलला पाहिजे. काँग्रेस पक्षाने मुस्लीम समाजासाठी भरीव काम केलं आहे, असा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे आणि याच आधारावर पाठिंबा मागितला पाहिजे. जेणेकरून भाजपला बहुसंख्याक ध्रुवीकरणाचं राजकारण करता येणार नाही.

या बैठकीत काही नेत्यांनी राहुल गांधींकडे तक्रार केली की ते अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर उघडपणे बोलतात, पण पक्षातील इतर ज्येष्ठ नेते त्यावर बोलणं टाळतात. इतर नेत्यांनीही राहुल गांधींप्रमाणे अल्पसंख्याकांच्या प्रश्नांवर बोलावं, असं त्यांनी सुचवलं. जवळपास दोन तासांहून अधिक वेळ ही बैठक चालली होती. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांनी या बैठकीचं आयोजन केलं होतं.

follow us