Rajasthan : गहलोत विरुद्ध पायलट संघर्ष आणखी तापणार? काँग्रेसचा मोठा निर्णय

Rajasthan : गहलोत विरुद्ध पायलट संघर्ष आणखी तापणार? काँग्रेसचा मोठा निर्णय

जयपूर : राजस्थानमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने काँग्रेसने तयारीला वेग दिला आहे. निवडणुकीच्या रणनीतीवर काम करण्यासाठी सोमवारी काँग्रेसच्या राजस्थान राज्याच्या संघटनेत मोठा बदल करण्यात आला आहे. काँग्रेसकडून 25 जिल्ह्यांत नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात एकाही महिला नेत्याला स्थान मिळालेले नाही. (All the names in the Rajasthan Congress executive, 80 percent of the office bearers are supporters of Chief Minister Ashok Gehlot)

या कार्यकारिणीमधील सर्व नावांवर नजर टाकल्यास 80 टक्के पदाधिकारी हे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे समर्थक आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या वर्षात गेहलोत गटाचे संघटनेत वरचढ ठरताना दिसत आहे. याशिवाय प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग दोतासरा यांनीही आपल्या समर्थकांना संघटनेत स्थान मिळवून दिलं आहे. दुसऱ्या बाजूला सचिन पायलट यांच्या समर्थकांना संघटनेत स्थान मिळाले असले तरी त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा गेहलोत विरुद्ध पायलट यांच्यातील संघर्ष तापण्याची शक्यता आहे.

या पायलट समर्थक नेत्यांना स्थान मिळाले नाही :

सचिन पायलट यांचे समर्थक प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, सरचिटणीस वेदप्रकाश सोलंकी, सचिव महेंद्रसिंग खेडी, गजेंद्र सांखला, रवी पटेल यांना नव्या कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही. उलट वेदप्रकाश सोलंकी यांना सरचिटणीस पदावरून हटवण्यात आले आहे.

या पायलट समर्थकांना मिळाले स्थान :

संघटनेत 10 पायलट समर्थकांना स्थान मिळालं आहे. सचिन पायलट यांच्या समर्थकांमध्ये राकेश पारीक, महेंद्रसिंग गुर्जर, प्रशांत शर्मा, इंद्रज गुर्जर, राजेंद्र शर्मा, मुकेश भाकर, राजेश चौधरी, सुरेश मिश्रा, संजय जाटव आणि सोना देवी बावरी यांना सरचिटणीस बनवण्यात आले आहे.

संघटनात्मक बदलावर एक नजर

राजस्थानमध्ये काँग्रेसने 21 उपाध्यक्ष, 49 सरचिटणीस, 121 सचिवांची नियुक्ती केली आहे.यासोबतच 121 सचिवांसह 25 जिल्ह्यांत नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होत्या. जुलै 2020 मध्ये सचिन पायलट यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते, त्यानंतर पहिल्यांदाच संस्थेत इतके बदल करण्यात आले आहेत. आता या टीमसोबतच काँग्रेस निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube