Video : राजस्थानमध्ये एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के; स्फोटासारखा आवाज झाल्याने लोक भयभीत

Video :  राजस्थानमध्ये एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के; स्फोटासारखा आवाज झाल्याने लोक भयभीत

Earthquake in Jaipur : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये आज पहाटे भूकंपाचे तीन धक्के बसले. या भूकंपाने लोक भयभीत झाले आणि रस्त्यावर आले. भूकंप इतका जोरदार होता की लोकांना स्फोटाचा आवाज ऐकू आला. या घटनेमुळे जयपूरसह आसपासच्या भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. फक्त 16 मिनिटांच्या कालावधीत तीनदा हे भूकंपाचे धक्के बसले.

नॅशनल सेंटर ऑफ सीस्मोलॉजी वेबसाइटनुसार पहिला धक्का पहाटे 4 वाजून 9 मिनिटांनी बसला. दुसरा धक्का 4 वाजून 22 मिनिटांनी तर तिसरा धक्का 4 वाजून 25 मिनिटांनी बसला. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सुरुवातीला मिळालेल्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र अरावली पर्वत आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.4 नोंदली गेली. राजस्थानमधील काही शहरांत मागील काही दिवसांपासून कंपन जाणवत आहे. याआधी 24 जानेवारी आणि 21 मार्च रोजी भूकंपाचे जोरदार झटके बसले होते. यावेळी लोक घाबरून घराबाहेर आले होते. सीकर जिल्ह्यात झालेला भूकंप तर शक्तीशाली होता.

राज्याचे पर्यटन आणि नागरी उड्डाण मंत्री मुरारी लाल मीना यांनी ट्विट करत म्हटले की जयपूरसह राज्यातील अन्य ठिकाणी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. पण, आता सर्वच सुरक्षित आहेत. राज्याच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ट्विटमध्ये म्हटले की जयपूरमध्ये भुकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. मला आशा आहे की तुम्ही सुरक्षित असाल.

मणिपुरमध्येही जमीन हादरली 

दरम्यान, मणिपूरमध्येही पहाटेच्या सुमारास भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीवनुसार मणिपुरमधील उखरुलमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता 3.5 इतकी मोजली गेली. या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube