RSS चा जातीय जनगणनेला पूर्ण पाठिंबा! दिल्लीतून फिरली सूत्र, दोन दिवसातच बदलली भूमिका

RSS चा जातीय जनगणनेला पूर्ण पाठिंबा! दिल्लीतून फिरली सूत्र, दोन दिवसातच बदलली भूमिका

नवी दिल्ली : सामाजिक समरसता आणि एकात्मता खंडित होऊ नये, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) भूमिका आहे. त्याला अनुसरुन जातनिहाय जनगणनेसारख्या कार्यक्रमांचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी व्हायला हवा, असे मत संघाचे अखिल भारतीय प्रचार व प्रसार प्रमुख सुनील आंबेकर (Sunil Ambekar) यांनी व्यक्त केले. त्यांनी दिल्लीतून निवेदन प्रसिद्ध करून संघाचा जातनिहाय जनगणनेला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. (Rashtriya Swayamsevak Sangh has released a statement that it fully supports the caste-wise census)

दोन दिवसांपूर्वीच संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी रेशीमबाग येथे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांशी संवाद साधताना जातीनिहाय जनगणनेला विरोध असल्याचे मात्र आरक्षण असले पाहिजे, असे म्हटले होते. त्यानंतर आंबेकर यांनी दिल्लीतून निवेदन प्रसिद्ध करून संघाचा जातनिहाय जनगणनेला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले होते. त्यापार्श्वभूमीवर आंबेकर यांचे निवेदन महत्वाचे मानले जात आहे.

आंबेकर यांनी निवेदनात काय म्हटले?

राष्ट्रीय स्वयंसेवकर संघ कोणत्याही प्रकारचा भेदभाव आणि असमानतेपासून दूर आहे. समरसता आणि सामाजिक न्यायावर आधारित हिंदू समाजाच्या ध्येयासाठी संघ सतत कार्यरत आहे. विविध ऐतिहासिक कारणांमुळे समाजातील अनेक घटक आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागे पडले. त्यांचा विकास, उन्नती आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध सरकारे वेळोवेळी विविध योजना करतात, ज्यांना संघाचा पूर्ण पाठिंबा आहे.

गेल्या काही काळापासून पुन्हा जातीनिहाय जनगणनेची चर्चा सुरू झाली. मात्र, याचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झाला पाहिजे. हे करताना कुठल्याही कारणाने सामाजिक समरसता एकात्मता खंडित होऊ नये हे सर्व पक्षांनी निश्चित करावे, असे आवाहन आंबेकर यांनी या निवेदनात केले आहे.

काय म्हणाले होते श्रीधर गाडगे?

जात आधारित जनगणनेची गरज नाही. कारण एकीकडे आम्ही जातीचा उहापोह करणार, जातीनिहाय गणना करणार आणि दुसरीकडे म्हणणार की जातिभेद नष्ट बस झाला पाहिजे. जर जात विस्मरणात जात असेल विस्मरणात जाऊ द्या. कारण जात ही कोणी निर्माण करत नाही ते जन्मापासून माणसाला मिळत असते. त्याच्यामुळे तिचा मोजदाद करणे आणि मग त्याच्यावरून भांडण निर्माण करणे, देश कमजोर करणे हे काही योग्य नाही.

जातीचा विचार पण संघ करत नाही. म्हणून संघाची जातीय जनगणनेची गरज नाही, अशी भूमिका आहे. लोकप्रतिनिधींकडूनही अशी मागणी होऊ नये अशी अपेक्षा आहे, असे मत विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर दिल्लीतून नवीन निवेदन काढून आंबेकर यांनी संघाचा जातनिहाय जनगणनेला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube