RBI ने रेपो रेट 0.25% ने वाढवला, कार आणि गृहकर्ज पुन्हा महागणार
मुंबई : देशातील महागाईचा दर खाली आल्यानंतरही रिझर्व्ह बँकेने (RBI) सलग सहाव्यांदा रेपो रेट वाढवण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर रेपो रेट 6.25% वरून 6.50% झाला आहे. त्यामुळे घर कर्जापासून ते वाहन आणि वैयक्तिक कर्जापर्यंत सर्व काही महाग होईल. परिणामी सर्वसामान्य लोकांना जास्त ईएमआय भरावा लागेल.
देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आरबीआय एमपीसीची ही बैठक झाली. या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. आरबीआयने रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्स म्हणजे ०.२५ टक्क्यांनी वाढ केली आहे. आरबीआय गव्हर्नर (RBI Governor) शक्तीकांत दास यांनी बुधवारी तीन दिवसीय एसपीसी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची घोषणा केली.
RBI Governor Shaktikanta Das announces that RBI increases the repo rate by 25 basis points to 6.5% pic.twitter.com/2ZyUSbCxEO
— ANI (@ANI) February 8, 2023
रिझर्व्ह बँकेची घोषणा होण्यापूर्वीच अर्थविश्वातील लोक रेपो दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवत होते. याआधी डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या एमपीसीच्या बैठकीत व्याजदर 5.90% वरून 6.25% करण्यात आले होते. RBI ने गेल्या वर्षीपासून सहा वेळा रेपो दरात वाढ केली आहे, एकूण 2.50% ने वाढ केली आहे.
रेपो रेट म्हणजे काय ?
रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या रेपो रेटचा थेट बँकांच्या कर्जावर परिणाम होतो. त्याचे दर वाढले तर गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यांसारखी जवळपास सर्व प्रकारची कर्जे महाग होतात. रेपो रेट हा दर म्हणजे ज्या दरावर आरबीआय बँकांना कर्ज देते, तर रिव्हर्स रेपो दर हा दर आहे ज्यावर आरबीआय पैसे ठेवण्यासाठी बँकांना व्याज देते. रेपो रेट कमी झाल्यामुळे कर्जाचा ईएमआय कमी होतो, तर रेपो रेट वाढल्याने सर्व प्रकारची कर्जे महाग होतात आणि या क्रमाने ईएमआयमध्येही वाढ होते.