Ashok Gehlot यांच्याविराधात पायलट पुन्हा आक्रमक : मंगळवारी उचलणार हे पाऊल…!
Sachin Pilot : राजस्थानमध्ये अशोक गेहलोत सरकार म्हणजे आपल्याच सरकार विरोधात सचिन पायलट यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या विरोधात मी तक्रार केली होती. परंतु, गेहलोत यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. याच्या निषेध करत ११ एप्रिलला जयपूर येथील हुतात्मा स्मारकावर एक दिवसाचे उपोषण करणार असल्याचे सांगत काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी घरचा आहेर दिला आहे.
सचिन पायलट यांनी पत्रकार परिषद घेत अशोक गेहलोत यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सचिन पायलट म्हणाले की, मी माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंधिया यांच्याबाबत तक्रार केली होती. मात्र, त्याबाबत अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आपल्यावर हातमिळवणी केल्याचा आरोप होऊ शकतो. वसुंधरा सरकारमध्ये भ्रष्टाचारावर कोणतीही कारवाई झाली नाही. विरोधी पक्षात असताना आम्ही चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले होते. निवडणुकीला ६-७ महिने बाकी आहेत. त्यामुळे विरोधक मिलीभगतचा संभ्रम पसरवू शकतात. तसे होऊ नये असे वाटत असेल तर लवकरच कारवाई करावी लागेल. जेणेकरून आमच्या बोलण्यात आणि वागण्यात काही फरक नाही, असे काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटेल, असे देखील सचिन पायलट यांनी म्हटले आहे.
Eknath Shinde म्हणतात… ‘अब तो भगवा लहरायगा पुरे हिंदुस्थान पर’! – Letsupp
सचिन पायलट यांनी पत्रकार परिषदेत आरोप करताना म्हटले की, वसुंधरा सरकारच्या काळात विरोधी पक्षात असताना आम्ही ४५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यांबाबत आवाज उठवला होता. मग आमचे सरकार सत्तेवर आल्यास या घोटाळ्यांची निष्पक्ष चौकशी करून दोषींना शिक्षा करू, असे आश्वासनही दिले होते. आमचे सरकार आल्यावर मी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना आठवण करुन दिली होती. २८ मार्च २०२२ रोजी पहिले पत्र लिहिले. त्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पण, विरोधी पक्ष म्हणून आमची विश्वासार्हता टिकवून ठेवली पाहिजे, असे मला वाटते. मात्र, गेहलोत यांच्याकडून कारवाईबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
केंद्र सरकार गेल्या काही काळापासून विरोधी पक्षांच्या लोकांना लक्ष्य करत आहे. ज्या नेत्यांना नोटीस बजावण्यात आली किंवा ईडीने छापे टाकले त्यापैकी ९५ टक्के नेते विरोधी पक्षातील आहेत. लोकांचा आमच्यावर निवडणुकीत विश्वास आहे, त्यामुळे कारवाई आवश्यक आहे. वारंवार सत्तेत येऊनही आम्ही विरोधी पक्षात असताना केलेल्या आरोपांवर कोणतीही कारवाई करत नाही. जेव्हा आम्ही पुन्हा निवडणुकीत जाऊ, तेव्हा कोणीतरी आमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, म्हणून आम्ही काही पावले उचलणे महत्त्वाचे आहे, अशी आठवण देखील सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना करुन दिली.