जिल्हाधिकारी कार्यालयाला लागलेल्या आगीमागे षडयंत्र; 2208 कोटींच्या घोटाळ्याच्या फायली जळाल्या?

जिल्हाधिकारी कार्यालयाला लागलेल्या आगीमागे षडयंत्र; 2208 कोटींच्या घोटाळ्याच्या फायली जळाल्या?

Madhya Pradesh News : मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्हाधिकारी (Shivpuri District Magistrate Office) कार्यालयात शुक्रवारी रात्री अचानक आग लागली. आगीमुळे कार्यालयातील अनेक विभागांचे रेकॉर्ड जळून खाक झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाला लागलेली आग ही लागली नव्हती तर ती लावण्यात आल्याचं उघडकीस आलं. त्याचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. दरम्यान, या आगीचे धागेदारे 2208 कोटींच्या घोटाळ्याशी जोडली जात आहे.

लोअर उर धरण पाटबंधारे प्रकल्प व अन्य प्रकल्पांच्या 2208 कोटी रुपयांच्या भूसंपादनाचे रेकॉर्ड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नझूल शाखेत ठेवण्यात आले होते, असं सूत्रांनी सांगितले. आता या आगीच्या घटनेनंतर हा रेकॉर्ड जळून खाक झाला आहे. मात्र, दुसरीकडे जिल्हाधिकारी रवींद्रकुमार चौधरी यांनी विविध शाखांच्या बहुतांश फायली सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. तरीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी चौधरी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी दिनेश चंद्र शुक्ला यांना चौकशी करण्याचे निर्देश दिलेत.

पिचोर येथे लोअर उर धरण सिंचन प्रकल्प मंजूर झाला आहे, हा प्रकल्प 2208 कोटी रुपयांचा आहे. त्यासाठी भूसंपादनासह इतर कामे करण्यात आली आहेत. सुमारे ५ वर्षांपूर्वी धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या गावांतील शेतकऱ्यांना जमीन, घरे आदींची भरपाई मंजूर करण्यात आली होती. नझूल शाखेकडून भूसंपादनाच्या प्रकरणात ज्यांच्या मालकीची जमीन नाही अशा लोकांच्या खात्यात भरपाईची रक्कम जमा करण्यात आली होती, असं बोलल्या जात आहे. जमीन भूसंपादनानाच्या बदल्यात नुकसान भरपाई दिलेल्या रक्कमांच्या फाईली या नझूल शाखेत ठेवण्यात आल्या होत्या. आता त्या फायली आगीत जळून खाक झाल्याची शक्यता आहे. सध्या जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टपणे काहीही सांगण्यात आले नाही.

जाळपोळीमागे कोण?
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवार आणि शनिवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत विविध विभागांचे रेकॉर्ड जळून खाक झाले आहे. सीसीटीव्हीत दिसणाऱ्या दोन संशयितांनी थेट नझूल शाखेच्या कार्यालयाबाहेर जाऊन आग लावली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन तरुण संशयास्पद पद्धतीने आग लावताना दिसत आहेत. सध्या पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube