साखरेचे भाव गगनाला भिडले, मग पर्याय काय? ऊसाशिवाय ‘या’ पदार्थांपासूनही बनते साखर
जगभरात बीट, खजूर, नारळ, ताड, मका, कसावा आणि मेपलसारख्या विविध स्रोतांपासून साखर, सिरप किंवा स्वीटनर्स तयार केले जातात.
Sugar prices have skyrocketed : चहात साखर कमी करायची म्हटलं तरी गोडवा कमी होतो आणि साखर जास्त घ्यायची म्हटलं तर आता खिशाला चटका बसतोय. देशात सध्या साखरेच्या वाढत्या दरांची चर्चा सुरू असून ऑगस्ट महिन्यातच साखरेच्या किमतीत सुमारे 20 टक्क्यांची वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात मिठाईपासून घरगुती वापरापर्यंत सर्वत्र या दरवाढीचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, साखर केवळ उसापासूनच तयार होत नाही. जगभरात बीट, खजूर, नारळ, ताड, मका, कसावा आणि मेपलसारख्या विविध स्रोतांपासून साखर, सिरप किंवा स्वीटनर्स तयार केले जातात. मात्र, या सर्व पर्यायांच्या किमती आणि वापर वेगवेगळे आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया …
ऊसानंतर बीटपासूनही मोठ्या प्रमाणात साखर
शुगर बीट हा ऊसानंतर साखरेचा मोठा स्रोत मानला जातो. युरोप आणि अमेरिकेत बीटपासून मोठ्या प्रमाणावर साखर तयार केली जाते. त्यावर प्रक्रिया केल्यानंतर मिळणाऱ्या साखरेमध्ये सुक्रोजचे प्रमाण ऊसापासून तयार होणाऱ्या साखरेच्या जवळपास असते. त्यामुळे रंग आणि गोडवा याबाबत बीटपासून तयार केलेली रिफाइंड साखर आणि ऊसाची साखर यांच्यात सामान्य ग्राहकाला फारसा फरक जाणवत नाही.
गोड ज्वारीपासूनही तयार होते गोड सिरप
ज्वारी म्हटलं की, आपल्याला भाकरी आठवते. मात्र, गोड ज्वारी (Sweet Sorghum) नावाची एक वेगळी जातही आहे. या ज्वारीच्या देठांमध्ये गोड रस असतो. हा रस काढून त्यापासून गोड सिरप तयार केला जातो. काही प्रक्रियांच्या मदतीने त्यापासून दाणेदार साखरही तयार करता येते. मात्र, भारतात ऊसाच्या तुलनेत गोड ज्वारीपासून साखर उत्पादनाचे प्रमाण खूपच कमी आहे.
डाळींच्या दरात मोठी उसळी; उडीद, तूर आणि मसूर महागल्याने सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले
खजुरापासूनही तयार होते नैसर्गिक साखर
खजूर केवळ फळ म्हणूनच नव्हे, तर डेट शुगर आणि डेट सिरप तयार करण्यासाठीही वापरला जातो. खजुरापासून तयार होणाऱ्या या पदार्थांना नैसर्गिक गोडवा असतो आणि विविध खाद्यपदार्थांमध्ये त्यांचा वापर केला जातो. मात्र, उत्पादन मर्यादित असल्याने त्याची किंमत सामान्य साखरेपेक्षा जास्त असते.
नारळाच्या फुलांच्या रसापासून ‘कोकोनट शुगर’
नारळाच्या झाडाच्या फुलांमधून मिळणारा रस मंद आचेवर आटवून कोकोनट शुगर तयार केली जाते. तिचा रंग किंचित तपकिरी असून चवीला कॅरॅमलसारखा स्वाद असतो. पण, किंमतीच्या बाबतीत हा पर्याय सामान्य साखरेपेक्षा खूप महाग आहे. बाजारात कोकोनट शुगरची किंमत साधारण 600 ते 800 रुपये प्रति किलो असू शकते.
ताडाच्या रसापासून पाम शुगर
ताडाच्या विविध जातींच्या झाडांमधून मिळणाऱ्या रसावर प्रक्रिया करून पाम शुगर तयार केली जाते. दक्षिण भारतासह आशियातील अनेक देशांमध्ये तिचा पारंपरिक वापर केला जातो. या साखरेची किंमत साधारण 200 ते 400 रुपये प्रति किलो असू शकते. त्यामुळे ती कोकोनट शुगरपेक्षा स्वस्त असली तरी सामान्य उसाच्या साखरेपेक्षा महाग आहे.
मक्यापासून तयार होतो ग्लुकोज सिरप
मक्यापासून थेट ऊसासारखी पांढरी दाणेदार साखर तयार होत नाही. मात्र, मक्यातील स्टार्चवर प्रक्रिया करून ग्लुकोज सिरप आणि हाय-फ्रक्टोज कॉर्न सिरप तयार केले जातात. सॉफ्ट ड्रिंक्स, बिस्किटे, पॅकेज्ड मिठाई आणि अनेक प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये या स्वीटनर्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.
कसावापासूनही तयार होतात स्वीटनर्स
कसावा किंवा टॅपिओका या पिकाच्या मुळांमध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्च असतो. त्यावर प्रक्रिया करून ग्लुकोज आणि इतर गोड पदार्थ तयार केले जातात. बेकरी आणि खाद्य उद्योगात त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
ना नोकरी, ना शिक्षण, ना कौशल्य प्रशिक्षण; साडेआठ कोटीहून अधिक तरुणांबाबत ‘निती’ चा धक्कादायक अहवाल
मेपलच्या झाडाच्या रसापासून सिरप
कॅनडा आणि अमेरिकेतील थंड प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या मेपलच्या झाडांच्या रसापासून मेपल सिरप तयार केला जातो. पॅनकेक, वॅफल्स आणि विविध डेझर्टमध्ये त्याचा वापर केला जातो. मात्र, हा भारतीय स्वयंपाकघरातील सामान्य साखरेला स्वस्त पर्याय नाही. त्याची किंमत तुलनेने जास्त आहे.
सर्वात स्वस्त साखर कोणती?
साखरेचे दर वाढले असले तरी किंमतीच्या बाबतीत ऊसापासून तयार होणाऱ्या साखरेला सध्या पर्याय नाही. चुकंदर, खजूर, ताड, नारळ, मका आणि इतर स्रोतांपासून गोड पदार्थ किंवा स्वीटनर्स तयार करता येतात. मात्र, त्यांचे उत्पादन मर्यादित असल्याने ते सामान्य साखरेपेक्षा महाग पडतात. सध्या बाजारात उसाची साखर साधारण 60 ते 70 रुपये प्रति किलो दराने मिळत असताना, खजूर किंवा ताडाची साखर 200 ते 400 रुपये, तर कोकोनट शुगर 600 ते 800 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे साखरेच्या वाढत्या दरांमुळे पर्यायांचा शोध घेतला जात असला, तरी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा गोडवा देण्याच्या शर्यतीत उसाची साखरच अजूनही आघाडीवर आहे. म्हणजेच, गोडवा देणारे पर्याय अनेक आहेत पण, स्वस्त गोडवा देणारा पर्याय सध्या तरी एकच आणि ती म्हणजे ऊसाची साखर होय…