तामिळनाडूत ‘थलपती’ नावाचा ‘ब्लॉकबस्टर’; क्लायमॅक्समुळे राजकीय चाणक्यही गारद
तमिळनाडूच्या जनतेने मुख्यमंत्रीपदासाठी विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्यापेक्षा अभिनेता विजय उर्फ थलपतीवर अधिक विश्वास दाखवला आहे.
Axis My India Exit Poll On Tamilnadu Election : तामिळनाडूच्या निवडणुकांबाबत एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाप्रमाणे सर्वेक्षणाचे निकाल समोर आले आहेत. तमिळनाडूच्या जनतेने मुख्यमंत्रीपदासाठी विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्यापेक्षा अभिनेता विजय उर्फ थलपतीवर अधिक विश्वास दाखवला आहे. नेमका एक्सिस माई इंडियाने अशी कोणती आकडेवारी जाहीर केली आहे. ज्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष तामिळनाडूकडे लागले आहे. त्याबद्दल जाणून घेऊया…
तमिळनाडूच्या राजकारणासह देशात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे सुपरस्टार विजय उर्फ ‘थलपती’ याची. ‘तमिलगा वेट्री कझगम’ म्हणजेच TVK या राजकीय पक्षाद्वारे राजकारणात एन्ट्री करणाऱ्या विजयने पहिल्याच प्रयत्नात राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून टाकले आहे. मतदानानंतर एक्सिस माई इंडियाच्या आकडेवारीत जनतेने विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांना पिछाडीवर टाकत मुख्यमंत्रीपदासाठी थलपती म्हणजेच वियजला पहिली पसंती दर्शवली आहे.
स्टॅलिन ‘आउट’, थलपती ‘इन’
एक्सिस माई इंडियाची ही आकडेवारी एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाप्रमाणेच असून, विजय यांच्या TVK पक्षाला 37% मतांसह तमिळनाडूची पहिली पसंती दिली आहे. तर, त्या खालोखाल विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टालिन हे 35% मतांसह दुसऱ्या स्थानावर फेकले गेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर AIADMK ला केवळ 22% मतांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे जनेतेच्या मनात सिनेमातील अभिनयाप्रमाणेच विजयने पहिल्याच राजकीय इनिंगमध्ये ग्रँड एन्ट्री मिळवण्यात यश मिळवल्याचे बोलले जात आहे.
बॉक्स ऑफिसवरच नाही, आता मतपेटीवरही ‘वन मॅन शो’
ज्याप्रमाणे थलपतीचा सिनेमा रिलीज झाला की, थिएटर हादरून जातं, तसंच काहीसं चित्र सर्वेक्षणात दिसत आहे. एक्सिस माई इंडियाच्या मते, विजयचा ‘तमिलगा वेट्री कझगम’ (TVK) पक्ष 98 ते 120 जागा जिंकून मोठा धमाका करू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. तर, दुसरीकडे, विजयच्या पक्षाकडून थेट 140 ते 170 जागांचा ‘सुपरहिट’ दावा केला करत 4 मे रोजी विजयच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
राजकीय चाणक्यही चकित
एकीकडे विद्यामान मुख्यमंत्री स्टॅलिन यांना पिछाडत विजयने बाजी मारली आहे तर, दुसरीकडे TVK ने राजकीय चाणक्यांनाही धूळ चारल्याचे चित्र आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपचे के. अन्नामलाई यांना कवेळ 2 टक्के आणि नाम तमिळर काचीचे सीमन हे 3 टक्के घेत विजयच्या झंझावातापुढे पार गारद झाले आहेत. त्यामुळे विजय उर्फ थलपतीने पहिल्याच राजकीय इनिंगमध्ये केलेली ग्रँड ‘एन्ट्री’ तमिळनाडूच्या राजकारणातील सर्वात मोठा ‘टर्निंग पॉईंट’ मानली जात आहे. तमिळनाडूच्या या ‘महामुकाबल्याचा’ निकाल 4 मे रोजी लागणार असून, पडद्यावरचा हा थलपती आता खुर्चीवर बसणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
थलपती विजय यांच्या ‘पॉलिटिकल ब्लॉकबस्टर’ लोकप्रियतेची 5 मुख्य कारणं
विजय यांच्या या अनपेक्षित यशामागे केवळ त्यांचा पडद्यावरचा करिश्मा नाही, तर त्यामागे सखोल सामाजिक आणि राजकीय कारणं दडलेली आहेत.
1. तरुणाईची क्रेझ आणि सुशिक्षित चेहरा: विजय यांची फॅन फॉलोईंग प्रामुख्याने तरुणांमध्ये अफाट आहे. राजकारणात एक ‘फ्रेश’ आणि सुशिक्षित चेहरा म्हणून तरुण मतदार त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत.
2. द्रविडी राजकारणातील पोकळी : जयललिता आणि करुणानिधी यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या निधनानंतर तामिळनाडूच्या राजकारणात जी मोठी पोकळी निर्माण झाली होती, ती भरून काढणारा खंबीर नेता म्हणून जनतेला विजय यांच्यात पर्याय दिसत आहे.
3. तळागाळातील समाजकार्य : गेल्या अनेक वर्षांपासून विजय आपल्या फॅन क्लबच्या माध्यमातून गरिबांना मदत, आरोग्य शिबिरे आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत. यामुळे त्यांची प्रतिमा केवळ एक अभिनेता म्हणून न राहता ‘जनसेवक’ म्हणून तयार झाली आहे.
4. भ्रष्टाचारमुक्त राजकारणाचे आश्वासन : प्रस्थापित पक्षांच्या कौटुंबिक राजकारणाला आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेला मध्यमवर्ग एका नव्या पर्यायाच्या शोधात होता, ज्याला विजय यांनी साद घातली आहे.
5. प्रादेशिक अस्मिता आणि तमिळ स्वाभिमान : आपल्या भाषणांमधून आणि पक्षाच्या भूमिकेतून त्यांनी तमिळ संस्कृती आणि स्वाभिमानाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला आहे, जो तामिळनाडूच्या मतदारांच्या मनाला थेट भिडला आहे.