‘इंडिया’च्या मुंबई होणाऱ्या बैठकीच्या तारखांमध्ये बदल, आता ‘या’ तारखेला होणार बैठक

‘इंडिया’च्या मुंबई होणाऱ्या बैठकीच्या तारखांमध्ये बदल, आता ‘या’ तारखेला होणार बैठक

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांनी इंडिया (INDIA) नावाची आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या दोन बैठका आतापर्यंत पार पडल्या आहेत. बेंगळूरमधील बैठकीत या आघाडीचं नाव इंडिया ठेवण्यात आलं होतं. या आघाडीची तिसरी बैठक आता मुंबईत होणार आहे. ही बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे. (The dates for INDIAs meeting in Mumbai have been decided meeting held on August 31 and September 1)

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या खासदारांची काही दिवसांपूर्वी बैठक घेतली होती. आता विरोधकांच्या आघाडीची पुढील बैठक मुंबईत होत आहे. ही बैठक 25 आणि 26 ऑगस्ट रोजी मुंबईत होणार होती. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. काही नेत्यांनी ऑगस्ट महिन्यात उपलब्ध नसल्याचं सांगितलं होतं. या नेत्यांमध्ये शरद पवार यांचाही समावेश असल्याचं वृत्त समोर आलं. 16 ऑगस्ट रोजी शरद पवार राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे 25 आणि 26 ऑगस्टला शरद पवार मुंबईत उपलब्ध नसल्याचं बोललं जात आहे.

खुशखबर! जिल्हा परिषदांमध्ये १९ हजार पदांची भरती, कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचा 

बैठक कधी होणार?
26 पक्षांच्या विरोधी आघाडी असलेल्या ‘इंडियाची’ पुढील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईत होत आहे. या बैठकीत आघाडीची समन्वय समिती, संयुक्त सचिवालय आणि इतर पॅनेलची नावे निश्चित केली जातील. मुंबईत इंडिया या आघाडीच्या बैठकीचे आयोजन उबाठाचे उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे करणार आहेत. या बैठकीत इंडिया आघाडीच्या वतीने प्रचार, प्रसारमाध्यमे आणि आंदोलनासाठी समित्या स्थापन करण्यात येणार आहेत.

दरम्यान, मुंबईत 11 सदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. प्रचार व्यवस्थापन आणि संयुक्त रॅली आणि उपक्रमांसाठी केंद्रीय सचिवालय स्थापन केले जाईल. 11 सदस्यीय समन्वय समितीमध्ये सर्व पक्षांचे प्रतिनिधी असतील. संवादाचे मुद्दे, संयुक्त मोर्चे, जागावाटप आणि विरोधी आघाडीच्या अशी इतर बाबींसह निवडणूक आणि राजकीय रणनीतीची भविष्यातील वाटचाल ठरवली जाईल. या बैठकीत आघाडीच्या अध्यक्षांची निवड करण्यात येईल, असं कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube