कॅप्टन स्मित मछार कोण आहेत? त्यांच्या आडनावाचा उगम आणि गुजरातशी असलेला संबंध चर्चेत

गुजराती साहित्यिक नीलकंठ विनोदिनी यांनी त्यांच्या गुजराती अटकोंनो इतिहास या पुस्तकात विविध गुजराती आडनावांच्या उगमाचा मागोवा घेतला आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 02T164304.338

Who is Captain Smith Machhar? : दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात सहवैमानिकाने (को-पायलट) केलेल्या हल्ल्यात जखमी होऊनही कॅप्टन स्मित मछार यांनी धाडस दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांच्या या शौर्यामुळे विमानातील सुमारे 180 प्रवाशांचे प्राण वाचल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर त्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत असून, त्यांना शौर्य पुरस्कार देण्याची मागणीही होत आहे. मात्र, त्यांच्या शौर्याइतकीच चर्चा त्यांच्या ‘मछार’ या आडनावाचीही सुरू झाली आहे. हे आडनाव नेमके कुठून आले? त्याचा अर्थ काय? आणि कॅप्टन स्मित मछार कोणत्या समाजाशी संबंधित आहेत? असे प्रश्न अनेकांकडून विचारले जात आहेत.

गुजराती साहित्यिक नीलकंठ विनोदिनी यांनी त्यांच्या गुजराती अटकोंनो इतिहास या पुस्तकात विविध गुजराती आडनावांच्या उगमाचा मागोवा घेतला आहे. त्यामध्ये मछार या आडनावाचाही उल्लेख आढळतो. त्यांच्या मते, मछार हे आडनाव गुजरातीतील मत्सर या शब्दापासून विकसित झाले असावे. मत्सर म्हणजे ईर्ष्या किंवा जळफळाट. कालांतराने या शब्दाचे रूपांतर मछारमध्ये झाले असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

दुसरा एक तर्क असा आहे की, ज्या भागात डासांचे प्रमाण जास्त होते, त्या परिसरातील लोकांना ओळखण्यासाठी हे आडनाव रूढ झाले असावे. हिंदीत मछार म्हणजे डास. पूर्वी अनेक समुदायांची ओळख त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून किंवा स्थानिक वैशिष्ट्यांवरून होत असे. त्यामुळे डासांच्या प्रचंड प्रमाणासाठी ओळखल्या जाणाऱ्या भागातील लोकांना मछार हे आडनाव मिळाले असावे. तिसरी शक्यता म्हणजे हे आडनाव विनोदी किंवा टोपणनावाच्या स्वरूपात उदयास आले असावे. गुजराती समाजात शब्दांशी खेळ करण्याची आणि व्यक्तींना वैशिष्ट्यांवरून संबोधण्याची परंपरा जुनी आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला गंमतीने मछार संबोधले गेले आणि पुढे तेच आडनाव बनले असावे.

‘त्याने माझ्यावर अनेक वेळा वार केले’; रक्तबंबाळ अवस्थेतही स्मित मछार प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सतर्क, हल्ल्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल

गुजरातमध्ये मछार हे आडनाव अनोखे वाटत असले तरी अशा प्रकारची अनेक वैशिष्ट्यपूर्ण आडनावे आढळतात. गुजरात विद्यापीठातील समाजशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक गौरांग जानी यांच्या मते, सौराष्ट्र भागात ‘हाथी’, ‘मांकडी’, ‘बकरी’, ‘पोपट’ यांसारखी आडनावेही प्रचलित आहेत. याच संदर्भात एक जुना किस्सा सांगितला जातो. १९६० च्या दशकात माजी खासदार जयसुखलाल लालशंकर हाथी यांचा एका मछार आडनावाच्या व्यक्तीने सत्कार केला होता. त्यावेळी लोकांनी गंमतीने म्हटले होते, काय काळ आला आहे, मछार हाथीचा सत्कार करत आहे! हा किस्सा पुढील पिढ्यांमध्येही सांगितला जातो.

मछार हे आडनाव गुजरातमधील दोन प्रमुख समुदायांमध्ये आढळते, नागर ब्राह्मण आणि लोहाणा. नागर ब्राह्मण समाजाचा उगम मुख्यतः सौराष्ट्र प्रदेशात मानला जातो. हा समाज शिक्षण, साहित्य, प्रशासन आणि सरकारी सेवांमध्ये कार्यरत राहिला आहे. अनेक लेखक, कवी, शिक्षक आणि स्वातंत्र्यसैनिक या समाजातून घडले. महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभावही या समाजावर मोठ्या प्रमाणात होता. तर लोहाणा समाजाची मुळे कच्छ आणि सिंध प्रदेशाशी जोडली जातात. हा समाज परंपरेने व्यापार आणि उद्योगधंद्यांशी संबंधित राहिला आहे. 19 व्या शतकात अनेक लोहाणा कुटुंबे मुंबईत स्थायिक झाली. सिंधमधून स्थलांतरित झालेल्या या समाजाने व्यापारी क्षेत्रात मोठे स्थान निर्माण केले. इतिहासकारांच्या मते, कराचीमधील मछार कॉलनी या नावालाही याच समाजाशी आणि तेथील मत्स्य व्यवसायाशी संबंधित संदर्भ असल्याचे मानले जाते.

ऑक्टोबरपासून निष्क्रिय रेशन कार्डांवर कारवाई, ई-केवायसी नसेल तर कार्ड बंद होण्याची शक्यता

गौरांग जानी यांच्या मते, नागर समाजाचे गुजरातच्या साहित्य, शिक्षण आणि सामाजिक सुधारणांमध्ये मोठे योगदान आहे. १९व्या शतकात महिलांच्या शिक्षणासाठी, सामाजिक सुधारणांसाठी आणि रूढी-परंपरांविरोधात आवाज उठवणाऱ्या अनेक महिला लेखिकाही याच समाजातून पुढे आल्या. मुघल काळापासून ते ब्रिटिश राजवटीपर्यंत नागर समाजातील अनेक व्यक्तींनी मुन्शी, लेखक, लिपिक आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले. त्यामुळे या समाजाची ओळख ज्ञान, लेखन आणि प्रशासनाशी जोडली गेली.

कॅप्टन स्मित मछार यांच्या शौर्याची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या आडनावाचा इतिहास आणि त्यामागील सामाजिक-सांस्कृतिक संदर्भही अनेकांच्या उत्सुकतेचा विषय बनला आहे. गुजरातच्या विविधतेने नटलेल्या आडनावांच्या परंपरेत मछार हे आडनावही एक वेगळी आणि रंजक ओळख जपून आहे.

follow us