पंतप्रधान मोदींना प्रश्न! विदेशी गुप्तहेर असल्याची टीका, जगभरात चर्चेत आलेली ‘ही’ पत्रकार महिला कोण?
या पत्रकार महिलेने चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारला असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच तिला ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विविध देशांच्या दौऱ्यावर आहेत. (Modi) त्यांनी नुकताच नॉर्वेचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांना नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान, ‘ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट’ प्रदान करण्यात आला. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांच्यासह संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत असताना एका महिला पत्रकाराने विचारलेला प्रश्न सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे.
या पत्रकार महिलेने चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारला असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच तिला ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. यानंतर या महिला पत्रकारानेही सोशल मीडियावर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्या समवेत संयुक्त निवेदन दिल्यानंतर नॉर्वेची पत्रकार हेले लिंग यांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्ही जगातील सर्वात मुक्त पत्रकारिता असलेल्या देशातील पत्रकारांचे काही प्रश्न तुम्ही का घेत नाहीत?, असा प्रश्न हेले लिंग यांनी गर्दीतून विचारला. मात्र पंतप्रधान मोदींना सदर प्रश्न ऐकू गेला की नाही? याबाबत नेमकी माहिती कळू शकलेली नाही. कारण पंतप्रधान मोदी सभागृहातून शांतपणे बाहेर पडताना दिसतात.
दरम्यान या प्रश्नानंतर लिंग यांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यानंतर हेले लिंग यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत स्वतःची बाजू मांडली आहे. हेले लिंग म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि मला तशी अपेक्षाही नव्हती. जागतिक मुक्त पत्रकारितेच्या निर्देशांकात नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताचा १५७ वा क्रमांक आहे. लिंग या ओस्लोस्थित ‘डाग्साविसन’ नावाच्या दैनिकात काम करतात. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान मोदींना विदेशात लक्ष्य केले असल्याचा आरोप करण्यात आला.
पीडीएफ दाखविले, एआयचा वापर; प्राध्यापकामुळेच NEET पेपरफुटीचे कांड उघडकीस आलं
अखेर नॉर्वेमधील भारतीय दूतावासाने दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन करत त्यासाठी हेले लिंग यांना आमंत्रित केलं. त्यांच्या एक्स खात्याला टॅग करत पत्रकार परिषदेचे निमंत्रण देण्यात आलं. या पत्रकार परिषदेत हेले लिंग यांनी भारतावर मानवाधिकारांचं हनन केल्याची टीका केली. परराष्ट्र खात्याचे सचिव सिबी जॉर्ज यांनी त्यांच्या पद्धतीने या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्रकार परिषदेत नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. हेले लिंग यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्याला समर्पक उत्तर दिलं नाही, असा त्यांनी आरोप केला. त्यानंतर त्या पत्रकार परिषदेतून मधूनच उठून गेल्या. पुन्हा थोड्या वेळाने त्या हॉलमध्ये येऊन बसल्या. याही घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
विदेशी गुप्तहेर असल्याची टीका
या दोन्ही घटनेनंतर पत्रकार हेले लिंग यांना ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेकांनी त्यांना विदेशी गुप्तहेर असल्याचं म्हटलं. तर काहींनी त्यांना चीनची हस्तक म्हटलं. लिंग यांनी यापूर्वी चीन आणि शी जिनपिंग यांच्याबाबत लिहिलेल्या लेखांचा हवाला देण्यात आला. काहींनी म्हटलं की, पंतप्रधान मोदींनी पत्रकार परिषद घेतलेली नव्हती, मग त्यांना प्रश्न विचारण्याचा उद्दामपणा का करण्यात आला?. तर अनेकांनी हेले लिंग यांची बाजू घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ नंतर एकदाही पत्रकार परिषद घेतलेली नाही. याकडेही काही जणांनी लक्ष वेधलं. ट्रोलिंगचा सामना केल्यानंतर लिंग यांनी पुन्हा एक्स पोस्ट करत आपण गुप्तहेर नसल्याचं म्हटलं आहे. मी पत्रकार असून प्रश्न विचारणं माझे कर्तव्य आहे, असं त्या म्हणाल्या.
हेले लिंग कोण आहेत?
नॉर्वेची राजधानी ओस्लो येथील एका दैनिकात काम करणाऱ्या हेले लिंग या पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यापूर्वी फारशा प्रसिद्ध नव्हत्या. पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यापूर्वी त्यांची शेवटची एक्स पोस्ट १० एप्रिल २०२४ ची होती, अशी माहिती इंडिया टुडेने दिली आहे. यापूर्वी त्यांनी २०२२ मध्ये एक पोस्ट केली होती. तसेच २०२१ साली त्यांनी पंतप्रधान मोदी आणि जागतिक नेत्यांचा जी२० रोम समिटमधील एक फोटो रिपोस्ट केला होता. हेले लिंग सोशल मीडियावर फारशा सक्रिय नव्हत्या. त्यामुळेच त्यांना पंतप्रधान मोदींच्या समोर जाणूनबुजून प्रश्न विचारण्यासाठी पाठवलं गेलं असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसंच, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या दोन दिवस आधी हेले लिंग यांचे एक्स हँडल व्हेरिफाईड झालं होतं, असंही म्हटले जात आहे.
हेले लिंग यांनी मात्र हे दावे फेटाळून लावले आहेत. त्या म्हणाल्या की, मी टीकटॉक आणि इन्स्टाग्रामवर जास्त सक्रिय आहे. “मी एक्स हँडल नुकतेच व्हेरिफाईड केले आहे. कारण मला एक पोस्ट एडिट करायची होती. यासाठी मला पैसे भरावे लागले. त्यानंतर मला ‘ब्लू टिक” मिळाली. पण मी एक्स पेक्षा टीकटॉक, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर जास्त सक्रिय आहे”, अशी पोस्ट त्यांनी केली. तर, हेले लिंग या पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारू शकल्या नसल्या. तरी त्यांना प्रसिद्धी मात्र भरपूर मिळाली आहे. सोमवारी त्यांच्या एक्स हँडलला जेमतेम ८०० फॉलोअर्स होते. मात्र आता त्यांच्याकडे २४ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तसंच ही संख्या वाढत चालली आहे.
हेले लिंग यांना उत्तर देणारे सिबी जॉर्ज कोण आहेत?
भारतीय दूतावासाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताच्या परराष्ट्र खात्याचे सचिव सिबी जॉर्ज यांनी हेले लिंग यांच्या प्रश्नांना उत्तर दिले. तसेच त्या वरचढ ठरत असताना त्यांना शांत केले. जॉर्ज १९९३ च्या भारतीय परराष्ट्र सेवेच्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते परराष्ट्र खात्याचे सचिव (पश्चिम) म्हणून काम करत आहेत. नॉर्वेमध्ये काम करण्यापूर्वी त्यांनी जपानमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. जॉर्ज यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कैरोमध्ये भारतीय दूतावासात राजकीय अधिकारी म्हणून झाली होती. त्यानंतर तीन दशकात त्यांनी स्वित्झर्लंड, होली सी, लिकटेंस्टाईन, कुवैत आणि मार्शल बेटे प्रजासत्ताक याठिकाणी राजदूत म्हणून काम केले.
केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातून येणारे जॉर्ज हे पाला येथील पोडीमट्टम कुटुंबातून येतात. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणात त्यांनी सुवर्ण पदक जिंकले होते. कैरोमधील अमेरिकन विद्यापीठातही त्यांनी शिक्षण घेतले होते. याशिवाय त्यांनी मसुरीमधील लबासना, आयआयएम अहमदाबाद, आयआयएम बंगळुरू, आयएसबी हैदराबाद येथूनही शिक्षण घेतले आहे.