विंबल्डनवर भारताची छाप! वापीचा ‘टॉवेल’ खेळाडू परतच करत नाहीत, पण का?
Wimbledon Towels 1987 पासून लक्झरी होम टेक्स्टाईल ब्रँड 'क्रिस्टी' विंबल्डनसाठी अधिकृत टॉवेल तयार करत आहे.
Wimbledon Towels Go Viral Every Season Are Made In India : विंबल्डन म्हटलं की, हिरवंगार सेंटर कोर्ट, पांढरे कपडे आणि ग्रँडस्लॅम विजेते डोळ्यासमोर येतात. पण गेल्या काही वर्षांत आणखी एका गोष्टीची जगभरात मोठी चर्चा होत आहे आणि ती म्हणजे विंबल्डनचा अधिकृत टॉवेल. सामन्यादरम्यान नोव्हाक जोकोव्हिच, जॅनिक सिनर, इगा स्वियातेकसारखे दिग्गज खेळाडू वापरत असलेला हा टॉवेल आज स्पर्धेची वेगळी ओळख बनला आहे. विशेष म्हणजे, या टॉवेलचा भारताशी अतिशय खास संबंध आहे.
गुजरातच्या वापीत तयार होतो विंबल्डनचा अधिकृत टॉवेल
1987 पासून लक्झरी होम टेक्स्टाईल ब्रँड ‘क्रिस्टी’ विंबल्डनसाठी अधिकृत टॉवेल तयार करत आहे. सुरुवातीला हे टॉवेल ब्रिटनमध्ये तयार होत होते. मात्र भारतीय वस्त्रोद्योग कंपनी ‘वेल्सपन’ने ‘क्रिस्टी’ ब्रँडचे अधिग्रहण केल्यानंतर उत्पादन गुजरातमधील वापी येथील आधुनिक कारखान्यात हलवण्यात आले. आज जगातील सर्वोत्तम टेनिसपटू वापरत असलेले हे प्रतिष्ठित टॉवेल भारतात तयार होतात.
18 महिन्यांपूर्वीच सुरू होते तयारी
विंबल्डन स्पर्धेवेळी वापरण्यात येणाऱ्या टॉवेलची निर्मिती ही केवळ कापड विणण्याची प्रक्रिया नाही. प्रत्येक वर्षी स्पर्धेच्या सुमारे 18 महिने आधी डिझाइनवर काम सुरू होते. जागतिक फॅशन ट्रेंड, रंगसंगती आणि विंबल्डनची परंपरा लक्षात घेऊन अंतिम डिझाइन निश्चित केले जाते. एका टॉवेलच्या निर्मितीसाठी सुमारे सात दिवस लागतात.
दरवर्षी बदलते रंगसंगती
यंदाच्या स्पर्धेसाठी पारंपरिक हिरवा आणि जांभळा रंग कायम ठेवण्यात आला आहे. त्यासोबतच स्ट्रॉबेरी थीमवर आधारित विशेष रंगसंगतीही सादर करण्यात आली आहे. यापूर्वी महिलांच्या टॉवेलसाठी फ्युशिया पिंक (Fuchsia Pink) आणि इतर आकर्षक रंगांचाही वापर करण्यात आला होता. हे रंग विंबल्डनच्या परंपरेसोबत बदलत्या फॅशन ट्रेंडचेही प्रतिनिधित्व करतात.
खेळाडूंनाही वापीतल्या टॉवेलची भूरळ
विंबल्डनचा हा अधिकृत टॉवेल आता केवळ खेळासाठी वापरली जाणारी वस्तू राहिलेली नाही, तर तो एक कलेक्टर्स आयटम बनला आहे. अनेक खेळाडू सामना संपल्यानंतर हा टॉवेल स्मरणिका म्हणून स्वतःकडे ठेवत आहेत. काहीजण तो चाहत्यांना भेट म्हणून देतात. त्यामुळे स्पर्धेत वापरल्या जाणाऱ्या हजारो टॉवेलपैकी केवळ सुमारे 15 टक्के टॉवेलच आयोजकांकडे परत येतात.
विंबल्डनचा टॉवेल इतका खास का?
विंबल्डनसाठी बनवले जाणारे टॉवेल उच्च प्रतीच्या कापसापासून आणि शॉर्ट-लूप टेरी वीव्ह तंत्रज्ञानाने तयार केले जातात. त्यामुळे ते अतिशय मऊ, घाम पटकन शोषून घेणारे आणि लवकर सुकणारे असतात. वारंवार धुतल्यानंतरही त्यांचा दर्जा आणि मऊपणा कायम राहतो. त्यामुळे ते केवळ टेनिस कोर्टवरच नव्हे, तर घरात, बीचवर किंवा स्विमिंग पूलवरही वापरण्यास योग्य मानले जातात.
भारतासाठी अभिमानाची गोष्ट
विंबल्डनमध्ये भारतीय खेळाडूंची संख्या कमी असली तरी, सेंटर कोर्टवर जगातील सर्वोत्तम टेनिसपटू वापरत असलेल्या अधिकृत टॉवेलवर मात्र ‘Made in India’ ची छाप स्पष्टपणे दिसते. गुजरातच्या वापीत तयार होणारा हा टॉवेल आज विंबल्डनच्या परंपरेचा अविभाज्य भाग बनला असून, भारतीय वस्त्रोद्योगाची गुणवत्ता आणि जागतिक दर्जा अधोरेखित करणारे हे एक अभिमानास्पद उदाहरण आहे.