Yoga Day : योग करा अन् तंबाखूची सवय सोडा; AIIMS च्या संशोधनातून मोठा दावा

International Yoga Day केवळ शारीरिक व्यायामापुरता मर्यादित असलेला 'योग' आता तंबाखूच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी एक प्रभावी औषध ठरत आहे.

  • Written By: Published:
International Yoga Day

Yoga Could Be Helpful For Quitting Tobacco Habit :  योग करा आणि तंबाखूची सवय सोडा, असं कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? पण हे खरं आहे. नवी दिल्लीतील AIIMS ने केलेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर हे संशोधन विशेष चर्चेत आले आहे. या अभ्यासानुसार, नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान करणाऱ्या व्यक्तींमध्ये तंबाखूचे व्यसन सोडण्याचे प्रमाण इतरांच्या तुलनेत तब्बल 50 टक्क्यांनी अधिक असल्याचे आढळून आले आहे. तंबाखूचे वाढते सेवन आणि त्यातून उद्भवणारे आरोग्याचे गंभीर प्रश्न लक्षात घेता, हे संशोधन लाखो व्यसनाधीनांसाठी आशेचा किरण मानले जात आहे.

व्यसनामागे फक्त निकोटीनच नाही, तर भावनांचाही मोठा वाटा

तज्ज्ञांच्या मते, तंबाखू किंवा सिगारेटचे व्यसन हे केवळ निकोटीनमुळे होत नाही. तणाव, चिंता, नैराश्य, भावनिक अस्थिरता आणि दीर्घकाळ जडलेली सवय हीदेखील त्यामागील महत्त्वाची कारणे आहेत. अनेकजण तंबाखू सोडण्याचा निर्धार करतात, मात्र एखादी तणावपूर्ण किंवा भावनिक परिस्थिती निर्माण झाली की पुन्हा त्याच व्यसनाकडे वळतात. अशा वेळी योग महत्त्वाची भूमिका बजावतो. योगामुळे केवळ तणाव कमी होत नाही, तर व्यक्ती भावनिकदृष्ट्या अधिक सक्षम बनते आणि तंबाखूची तीव्र इच्छा अर्थात क्रेव्हिंग नियंत्रित करण्यास मदत होते.

AIIMS च्या संशोधनात काय आढळलं?

‘निकोटीन अँड टोबॅको रिसर्च’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात 629 तंबाखू व्यसनाधीन व्यक्तींवर अभ्यास करण्यात आला. सात वेगवेगळ्या क्लिनिकल ट्रायल्सच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला होता. संशोधनात असे दिसून आले की, नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान करणाऱ्या व्यक्तींना तंबाखूची इच्छा नियंत्रित करण्यात आणि व्यसनापासून दूर राहण्यात अधिक यश मिळाले. योगमुळे मानसिक स्थैर्य वाढल्याने व्यसनाकडे पुन्हा वळण्याची शक्यता कमी होत असल्याचेही या अभ्यासातून स्पष्ट झाले.

भारतासह अनेक देशांतील क्लिनिकल चाचण्यांचा समावेश

या संशोधनामध्ये भारताबरोबरच अमेरिका आणि थायलंडमधील क्लिनिकल चाचण्यांचाही समावेश करण्यात आला होता. सहभागी झालेल्या व्यक्तींना प्राणायाम, ध्यान आणि विश्रांतीची विविध तंत्रे शिकवण्यात आली. बहुतांश लोक केवळ निकोटीनच्या लालसेमुळेच नव्हे, तर भावनिक तणाव आणि जीवनातील कठीण परिस्थितींमुळेही पुन्हा तंबाखूचे सेवन सुरू करतात. पण, योगमुळे भावनिक नियंत्रण सुधारते आणि मानसिक ताकद वाढते. त्यामुळे अशा परिस्थितीतही व्यसनापासून दूर राहणे सोपे होते असे तज्ज्ञांचे मत आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात?

AIIMS मधील हृदयरोग विभागाचे प्राध्यापक आणि सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह मेडिसिन अँड रिसर्चचे संस्थापक व प्रभारी प्रा. गौतम शर्मा यांच्या मते, योग हा शरीर आणि मन या दोन्हींवर परिणाम करणारा समग्र उपचारात्मक दृष्टिकोन आहे. योगमुळे वजन नियंत्रण, भावनिक संतुलन आणि स्वतःची काळजी घेण्याची सवय विकसित होते. या तिन्ही गोष्टी कोणत्याही व्यसनावर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तणाव आणि मानसिक दबाव हे तंबाखूचे सेवन पुन्हा सुरू होण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक आहे. त्यामुळे दररोज योगाभ्यास करणे आवश्यक असल्याचेही प्रा. शर्मा यांनी नमूद केले आहे. प्राणायाम, ध्यान आणि विविध योगासने मानसिक आरोग्य मजबूत करतात. त्यामुळे व्यक्ती तणावपूर्ण परिस्थितींचा अधिक चांगल्या पद्धतीने सामना करू शकते असे ते म्हणाले.

सिगारेट सोडण्यासाठी ‘कोल्ड टर्की मेथड’

सर गंगा राम रुग्णालयातील वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सजीला मैनी यांनी सिगारेट सोडण्यासाठी ‘कोल्ड टर्की मेथड’ सुचवली आहे. दिवसाला 10 सिगारेट ओढणारा व्यक्ती ती संख्या 9 किंवा 8 वर आणण्याचा प्रयत्न करतो, पण हा फारसा यशस्वी मार्ग नाही. सिगारेट सोडायची असेल तर, ती संख्या थेट शून्यावर आणणे अधिक प्रभावी ठरते असे मैनी यांनी म्हटले आहे.

एकूणच, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने समोर आलेले हे संशोधन योगाचे महत्त्व केवळ शारीरिक तंदुरुस्तीपुरते मर्यादित नसल्याचे अधोरेखित करते. तंबाखूसारख्या घातक व्यसनातून बाहेर पडण्यासाठी औषधोपचार आणि इच्छाशक्तीबरोबरच मानसिक स्थैर्यही तितकेच महत्त्वाचे असते. योग, प्राणायाम आणि ध्यान यामुळे तणावावर नियंत्रण मिळते, भावनिक संतुलन सुधारते आणि व्यसनाकडे पुन्हा वळण्याची शक्यता कमी होते.

म्हणूनच, 21 जूनच्या योग दिनानिमित्त केवळ योगासनांचे प्रात्यक्षिक पाहण्यापेक्षा किंवा एक दिवस योग करण्यापेक्षा, योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे अधिक गरजेचे आहे. कदाचित रोजचा काही मिनिटांचा योगाभ्यासच एखाद्याला तंबाखूच्या विळख्यातून कायमची मुक्तता मिळवून देऊ शकतो. निरोगी शरीर, शांत मन आणि व्यसनमुक्त जीवनासाठी योग हा एक प्रभावी आणि सहज उपलब्ध पर्याय ठरू शकतो, हेच या संशोधनातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

follow us